भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 16, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 16

बावीस

मार्गांनी लोक अनाचारास प्रवृत्त झाले होते. टिळाटोपी करून, डोळे मिटून, समाधीचे नाटक करून लोकांना फसवण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. तुकाराम महाराजांनी या सर्व गैर- प्रकारावर अतिशय कडक शब्दांत प्रहार केले आहेत. तुकोबांच्या उपदेशाचे दुसरे अंग असे की, या भोंदू गुरूंच्या नादाने लोकही बिघडत चालले होते. जे परमार्थाच्या मार्गात होते, त्यांचा मार्गच चुकला होता. भलत्याच फंदात ते अडकले होते, आणि जे संसारात रमले होते, त्यांना एका संसाराशिवाय, पैशाशिवाय, बायकोशिवाय दुसरे समजेनासे झाले होते. परद्रव्य व परनारी यांचा अभिलाष मोठ्या प्रमाणावर वाढला होता. लोक आपल्याच नादात, आपल्याच गर्वाने, अभिमानाने केवळ विषयसुखात रमून गेले होते. नाना प्रकारची इंद्रियसुखे भोगण्यात त्यांना सारा जन्म घालवावा असे वाटे. देवधर्माची, कुलधर्माची, संतांची, पवित्र स्थानांची मर्यादा सुटत चालली होती. अशा बिघडलेल्या संसाराची विदारक शब्दचित्रे तुकाराम महाराजांनी काढलेली आहेत. केवळ पैसा, इंद्रियसुख हेच एक ध्येय झाले, म्हणजे मग मनाचा तोल सुटतो. तृष्णेला व लोभाला सीमा उरत नाही. मग कोणतेही पातक करण्यास लोक कचरत नाहीत, कोणत्याही अनाचाराचे त्यांना वावडे उरत नाही. संसारात सदा सर्वकाळ आसक्त राहून लोकांनी ईश्वराचे नावच सोडून दिल्यामुळे या एका आधारावर जे परस्परांचे नाते उभे असते, तेही मग विस्कटून जाते. दुसऱ्यांना त्रास देऊनच स्वतःच्या सुखाची वृद्धी करण्याकडे व सर्व काही मलाच पाहिजे, या लोभाकडे माणसे लक्ष देतात. तुकारामबुवांनी आपल्या उपदेशपर अभंगांतून या सांसारिक पतनाचेही बोलके चित्र उभे करून लोकांना सावध केले आहे.

अभंगवाणीचे स्थूल स्वरूप तुकाराम महाराजांच्या अभंगांचे आत्मपर किंवा अनुभूतीपर आणि उपदेशपर असे दोन प्रमुख विभाग असले तरी, या प्रत्येकाचे आणखी उपविभाग होण्यासारखे आहेत. शिवाय शिव, राम, हनुमंत, गजेंद्र, एकादशी, बाळक्रीडा, गौळणी, विराण्या अशा विविध विषयांवर त्यांची अभंगरचना आहेच. संतमाहात्म्य, पंढरपूरवर्णन, कीर्तनमाहात्म्य, नामाची महती, याही विषयांवर तुकोबांचे पुष्कळच अभंग उपलब्ध आहेत. सद्गुरूंची कृपा, स्वतःच्या दंभित्वाचा निषेध, मंबाजीबुवाकडून विरोध, लोहगावचा वेढा, चिंचवड येथील चिंतामणी देव यांच्याशी संभाषण, स्वतःच्या वैराग्यप्राप्तीचा क्षण, कवित्वाची प्रेरणा इत्यादी विविध अशा प्रासंगिक विषयांवरही बुवांनी रचना करून स्वतःच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे उल्लेख केलेले आहेत. याशिवाय वासुदेव, आंधळा, पांगळा, डाका, गाधळ, लळिता, फुगडी इत्यादीसारखी भारुडात्मक अभंगरचनाही तुकाराम महाराजांची आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचे हे असे स्थूल व बाह्य स्वरूप विविधतेने नटलेले दिसते. प्रत्येक अभंग सुटा खरा, स्फुट खरा, पण काही अभंगांचे गटही काही गाथांत एकत्र आलेले दिसतात. विचारांचे, भावनांचे, तत्त्वांचे एखादे सूत्र त्या त्या गटात दिसतेही. परंतु यासंबंधी निश्चित असा शोध अजून झालेला नाही. तुकारामांच्या अभंगांचे पुढे संपादन करणाऱ्यांनी नामपर, संतपर, करुणापर, प्रेमळकलहपर, सलगीपर अशी वर्गवारी करून काही व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यावरून तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंग स्रवले, ते कोणत्या क्रमाने व कोणत्या प्रसंगांनी याचा बोध होणे दुरापास्त होते.

'तुका झाला पांडुरंग' तुकोबांच्या अभंगवाणीचा एवढा बाह्य परिचय करून घेतल्यानंतर तिच्या अंतरंगाचे तेजस्वी दर्शन जवळ जाऊन घेण्यासारखे आहे. मानवी मन किती आतुर, किती कोमल, किती भावप्रवण होऊ शकते, याची उत्तम उदाहरणे तुकारामबुवांच्या आत्मपर अभंगांतून आपणास मिळतील. वैराग्यामुळे,

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 16, कुल 611 में से · BharatKosha