सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 560, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५१४ | सार्थ तुकारामगाथा
अर्थ - हे हरिनामाचे शेत चांगले हंगामाला आले आहे चारही कोपऱ्यांपर्यंत याची राखण करावी चांगले पीक आले असल्याने याची राखण मात्र नीट केली पाहिजे १ यासाठी या शेताचा नीट सांभाळ करावा पीक उभे आहे, तोपर्यंत काही विसावा घेता कामा नये २ गोफणीस या श्रीहरीच्या नावाचा धोंडा घालून जोराने फेका मग या नामाच्या गर्जनेने नाना विकाराच्या पाखराचे थवेच्या थवे उठून जातात ३ आगटी पेटवून तू जागा बदलून राहावेस एखादे संकट आले तर वळ व बुटी या दोघांचेही साह्य व्हावयास हवे ४ या शेतावरील, खळ्या- वरील धान्याचे दान करून सर्व जगास तू सुखी कर ज्याचा कर त्यास देऊन साराही चुकता कर ५ तुकाराम महाराज म्हणतात, यानंतर काही कार्य मग उरणार नाही कारण निजस्वरूपाचे सत्त्व हाताशी आल्यामुळे व्यर्थ असणारे भूस सांडून गेले तरी हरकत नाही ६
विवरण - तुकाराम महाराजांनी अनेक प्रसंगी जी रूपकात्मक रचना केली आहे, त्यात हे शेतावरील तीन अभंग प्रसिद्ध आहेत हे शेत म्हणजे विठ्ठलाच्या नामरूपाचे होय अथवा मानवी देहालाही शेताचीच उपमा देऊन त्याची नीट राखण करण्याविषयी उपदेश केला असतो पारमार्थिक दृष्टीनेच या शेतावरील रूपकात्मक अभंगाचा अर्थ लावता येण्यासारखा आहे गीतेच्या तेराव्या अध्यायातही या शरीरालाच क्षेत्र म्हणजे शेत म्हटले आहे या क्षेत्राचे म्हणजे पंचमहाभूतांच्या पासून झालेल्या शरीराचे रक्षण कसे व किती करावे, याविषयी यात विचार प्रामुख्याने येतो मनुष्याचा देह हे एक क्षेत्र असून याचा मालक कोण, याची निगा कशी राखावी, या संबंधीचा विचार प्रामुख्याने अध्यात्मशास्त्र करीत असते पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा सूक्ष्म इंद्रिये, मन, पाच कर्मेंद्रिये, त्याचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुख, संघात, चेतना, धैर्य इत्यादी तत्त्वाचा समुदाय म्हणजे क्षेत्र, अशी व्याख्या गीतेने केलेली आहे या क्षेत्राचे विस्ताराने निरूपण श्रीज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या अध्यायाच्या प्रारंभीच केलेले आहे
तुकारामबुवांनी छान मराठमोळ्या भाषेत मराठी शेतकऱ्याचे रूपक या देहाच्या क्षेत्राचे वर्णन करण्यासाठी रंगविले आहे या परमार्थांमधील क्षेत्रावर, शेतावर कुणाला वेठीस धरून कामास जुपावे लागत नाही त्याच्या बन- खर्चाचा प्रश्न येथे नाही येथे बुजाला मारा द्यावा लागत नाही येथे कुणाची जुलूमजबरदस्ती नाही नांगरणी, कुळवणी, पाबार घेऊन पेरणी इत्यादी रूपकात्मक भाषेत त्यांनी या शेतावरील हंगामाचे वर्णन केले आहे खाली मान घालून जो शेती राखेल, त्याचे शेत पाखरे खाऊन जातील असा एक उल्लेख क्र ११४८ च्या अभंगात आहे या संदर्भात तुकारामबुवांनी एका शेतकऱ्याचे व्यावहारिक जगातील शेत कसे राखले, याची आठवण होण्यासारखी आहे या पाखरांपासून शेताचे रक्षण करण्याऐवजी शेतामुळेच, कणसातील दाण्यांमुळेच, पाखरांचे रक्षण झाल्याचे पाहून तुकोबा संतुष्ट झाल्याची एक कथा त्यांच्या चरित्रात आहेच अशा प्रकारे शेताची राखण करूनही तुकोबांचे शेत टपोऱ्या कणसांनी भरून गेलेले आहे, असाच या कथेचा शेवट आहे तरी सुद्धा या 'शेतावरील अभंगात' मात्र त्यांनी 'बोंबण्या सोंकरीं। सेत खादले पांखरीं' असाच इशारा दिलेला आहे
वर डोळे ठेवून, पाखरांकडे लक्ष न देता शेत राखता येणार नाही, असेच त्यांना सांगावयाचे आहे कारण हे शेत नामरूपादीचे अथवा या मानवी देहाचे असल्याने, व पुन पुन न लाभणारे असल्याने महत्त्वाचे आहे काम- क्रोधादी विकारांनी अथवा चोरांनी या शेताची लुबाडणूक करू नये, असाही भावार्थ या अभंगाचा असावा या मानव जन्मात प्राप्त झालेले हे शेत ईश्वरी कृपेने चांगले पिकवावे, चांगला हंगाम काढावा, व खळ्यावरील सर्व धान्य लोकांना देऊन आपण स्वतः तृप्त व्हावे, अशीच शिकवण शेतावरील या रूपकात्मक अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराजांनी दिलेली आहे
११५० नका घालू दूध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥ १ ॥ नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥ २ ॥ तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥ ३ ॥