सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 346, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३१२ सार्थ तुकारामगाथा राहिलो आहे. सर्व लौकिक व्यवहारही सोडून दिला आहे. आपल्या अविनाशी स्वरूपाचा विचार आधी करूनच मी तुमचा आश्रय घेतला आहे. ४ या ठिकाणी धैर्य हे एकच धर्म जाणावयास हवे. या धैर्याच्या बळावर मी हा माझा देह नाशवंत व न टिकणारा आहे असाच मानला. तुझे नाम हेच एक जीविताचे सार मी मानले. ५ सर्व लौकिक वृत्तींच्याकडून सुटका करून घेऊन मी विश्रांतीस पावलो आहे. चित्तात जे धरावयास हवे ते धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे संतांनी सांगितले तेच मी केले. आता मला जपवेस देवा, तू आश्रय द्यावास. ६ ६३३ बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होईजे ॥ १ ॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ २ ॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥ ३ ॥ ऐसिये पावलिलों ठायीं । आतां मी काई हों उतराई । येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझें आई पांडुरंगे ॥ ४ ॥ फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजबिलों बाळ निजस्थानीं ॥ ५ ॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- आतुडे-प्राप्त होते, येते, कवळ-दोष, चाडा-लोभासाठी अर्थ :- बरे झाले; मी या नरजन्मास आलो. हा एक फार मोठा लाभच मला झालेला आहे. यायोगे ईश्वरसान्निध्याच्या सर्व सुखांचा लाभ मला घेता येईल. १ ईश्वराने मला हात, पाय, कान, डोळे, मुख इत्यादी इंद्रिये दिली आहेत यांच्या उपयोगाने नारायणा, मला तुझी प्राप्ती होईल व मला जीवपणाचा व भवरोगाचा जो रोग लागला आहे तो नाहीसा होईल. २ यामुळे तिळतिळ असा पुण्याचा साठा हातून होईल व बहुत जन्मांच्या संचिताने तुझ्या नामाची जोड माझ्या वाचेस प्राप्त होईल. ३ अशा या महत्त्वाच्या ठिकाणी देवा, तुम्ही मला आणले आहे. आता याचा उतराई मी होऊ तरी कसा ? पण पांडुरंगा, तू माझी माउली असल्याने मी माझा एवढा जीव जरी तुझ्या पायी अर्पण केला तरी तो थोडाच होईल. ४ देवा, तू माझ्या डोळ्यांचा दोष नाहीसा केलास, अंतःकरणा- तील गुण-दोषांचा मळ तू धुऊन काढलास आणि तू प्रेमाने मला स्तनपान देऊन तृप्त केलेस, व या बालकाला आपल्या हृदयाशी झोपविलेस. ५ या अलौकिक आनंदास दुसरी जोडच नाही. याची नुसती हकीकत सांगताना सुद्धा गोड लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आमच्या लोभासाठी व आमच्या भक्तीच्या कौतुकासाठी तू या सगुण आकारास आला आहेस. ६ ६३४ अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोथिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥ १ ॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषे मळिलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाही ॥ २ ॥ विविध कर्म चौऱ्यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांठवण ॥ ३ ॥