सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 9, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंतुकाराम महाराजांची अभंगवाणी अलौकिक तेजाचा उगम कसा, कुठे व केव्हा होतो, याचे गणित अजून कुणासही समाधान- कारक रीतीने सुटलेले नाही. 'शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते-योगभ्रष्ट झालेला पुरुष शुचिर्भूत व श्रीमान् लोकांच्या घरी जन्म घेतो' असा निर्वाळा भगवद्गीतेने दिलेला आहे. पूर्वपुण्याई, घराण्याचे संस्कार, शिक्षण, परिस्थिती, संगती इत्यादी अनेक कारणांचे चिंतन विचारवंतानी या बाबतीत केलेले आहे. पुढील अनंत काळावर तीव्रपणे ठसा उमटविण्याचे सामर्थ्य असणारी दिव्य प्रतिभा किंवा अलौकिक शक्ती कोणत्या अवस्थेत जन्मास येते? कशी विकसित होते? या प्रश्नाच्या उत्तराविषयी काही तर्क करिता येतात, काही अनुमाने बांधता येतात, पण शास्त्रीय दृष्टीने उत्तर देणे अजून कुणासही जमलेले नाही! 'अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची' सन १६०८ मध्ये देहूसारख्या खेडेगावच्या मातीच्या कणात व तेथल्याच इंद्रायणीच्या पाण्यात असे कोणते गुणधर्म निर्माण झाले की, ज्यातून एक अलौकिक तेज मुसावले जाऊन तुकाराम या नावाने नावारूपास आले? वृत्तीने वाणी, जन्माने कुणबी, लौकिक शिक्षणाचा म्हणावा असा संस्कार नाही, उच्च वर्णीयाना मिळणारी परंपरागत अशी अनुकूल पार्श्वभूमी नाही, व्यावसायिक व सांसारिक जीवन तसे म्हटले तर प्रतिकूलच पण अशाही परिस्थितीत तुकोबांच्या मनाने जी आकाशास भिडणारी झेप घेतली, ती कशाच्या बळावर? अनेक विद्यांचे संस्कार झाले असले तरी, चार ओळी लिहिताना अडखळणारे, अडणारे आपणास माहीत आहेत. तुकाराम महाराजांना असे काय प्राप्त झाले की, ज्याच्या योगाने त्यांच्या मुखातून अशी अभंगवाणी बाहेर पडली की, तिच्यापासून ते स्वतः तर तृप्त झालेच, पण त्यांच्या भोवतीचे लोकही संतुष्ट होऊन गेले. त्यांच्या नंतरही त्यांच्या अभंगवाणीने साऱ्या मराठी माणसांना मुग्ध केले. 'अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची' असाच रिवाज सर्वांच्या बोलण्यातून निर्माण झाला. स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध, व्यावसायिक, पारमार्थिक, उच्चवर्णीय, मध्यमवर्णीय, सर्वांनाच या तुकाराम महाराजांच्या अभंगाचे एवढे वेड लागलेले दिसते की, प्रत्येकाला तो आपल्या अंतरंगातील जिव्हाळ्याचा ठेवा वाटावा. संसारताप, व्यावसायिक अपयश, परमार्थमार्गातील हुरहूर, असे कोणतेही कारण असो, प्रत्येकास आधार मिळाला आहे तो तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा. तुकाराम- बुवांच्या अभंगातील दहापाच ओळी तरी माहीत नाहीत, असा मराठी मनुष्य सहसा मिळणार नाही. शिक्षणाचा प्रसार नव्हता, तेव्हाही सबंध गाथा पाठ म्हणून दाखविण्याचे चमत्कार करणारे काही थोर भक्त होते. प्रसिद्ध भक्तवर वै. बाबुराव हरि देवडीकर यांचे साडेचार हजार अभंग पाठ होते !