सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 121, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंनाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहूनी बळी रे ॥ २ ॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाई पुष्पवरुपाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥ ३ ॥ लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥ ४ ॥ वर्णाभिमान विसरली याति । एकाएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नयनींतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥ ५ ॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा.- पावटणी-पायाखालची पायरी, अनुपम्य-ज्याला दुसरी तुलना नाही असा, महानुभाव- श्रीचक्रधराच्या पंथातील साधक, अंबर-आकाश. अर्थ:-या वाळवंटात भाई हो, वैष्णवांनी घाईघाईने खेळाला आरंभ केला आहे. नाचताना ते तल्लीन झाले आहेत. या संतानी क्रोध, अभिमान वगैरे विकारांना पायांखालची पायरी करुन सोडले आहे. १ परमेश्वर- प्रेमाच्या आनंदकल्लोळात ते नाचत असून त्याच्या पवित्र नामावळीचा जयघोष करुन गाणे गात आहेत. यांनी या नामाच्या जोरावर प्रत्यक्ष यमावरही मात करण्यासाठी कास कसली आहे. एकापेक्षा एक बलवान असे हे वैष्णववीर आहेत. २ यानी आपल्या अंगाला गोपीचंदनाची उटी लावली आहे. गळयात तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत, हारही घालून ते मिरवीत आहेत. आणि भजनाच्या निमित्ताने टाळ, मृदुंग, फुलांचा वर्षाव यांची एकच घाई उडत आहे येथे. या सुखसोहळ्याचे वर्णनही करता येणार नाही. ३ या नामघोषाच्या नादास लुब्ध होऊन मूढ जनांपासून सर्व स्त्रीपुरुषांचीच समाधी लागलेली दिसते. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभावी, सिद्ध, साधक, यांचे चित्त एकतेने ईश्वराशी जडलेलॆ दिसते. ४ प्रत्येकजण आपल्या वर्णाचा अभिमान, जातीचा अभिमान विसरून गेलेले आहेत; ते एकमेकांची जात विसरून एकमेकांस लोटांगण घालतात; या प्रकारामुळे त्यांचे चित्त लोण्याहूनही मऊ व शुद्ध बनले आहे. त्यांच्या संगतीने पाषाणासही प्रभुप्रेमाचा पाझर फुटणार आहे. ५ यांच्या ईश्वरनामाच्या गर्जनेने सारे आकाश गर्जून राहिले असून हे वैष्णव वीर भक्तित्सुखाच्या नशेत जणू मत्त झालेले दिसतात; तुकाराम महाराज म्हणतात, यांनी भवसागर तरून जाण्यासाठी भक्तीची ही सोपी अशी पाऊल वाटच तयार केलेली आहे ६ १९० एके घाईं खेळतां न पडसी डाईं । दुचाळचानें ठकसील भाई रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोंघांची तरी घरीं सोई रे ॥ १ ॥ खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयाची घाई रे । तेणेंचि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ २ ॥ शिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या संवगडिया शिकवूनि घाईं । तेणें संतांतर फड जागविला रे । एक घाईं खेळतां तो न चुकेचि फोडें । तया संत जन मानवले रे ॥ ३ ॥ ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनों बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनि एकी च घाईं । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥ ४ ॥ रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे ।