भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 199, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 199

सार्थ तुकारामगाथा १६५ अर्थ :- अन्नाच्या नुसत्या घासाने भूक जात असती तर मग परोपरी लोकांनी स्वयंपाक कशासाठी केला असता ? १ म्हणून मी तुम्हास सांगत आहे की तुम्ही आपापले हित साधण्यासाठी वाणीने नित्य रामनामाचे स्मरण करा. २ पाण्याकडे नुसते पाहून कधी तहान जाते का ? अशी तहान भागत असती तर परोपरी पाण्याची साठवण करण्याची जरूरीच नव्हती. ३ झाडाची नुसती सावली पाहून कुणास सुख लाभणार ? त्याच्या तळाशीं जाऊनच सावलीचे सुख भोगले पाहिजे. ४ आपल्या चित्तामध्ये एक भाव असेल तरच त्या ईश्वराच्या स्तुतीचे गाणे गायल्याने, ऐकल्याने सुख वाटेल. ५ तुकाराममहाराज म्हणतात, यासाठी ध्यानात धर की, तुला दृढ भावानेच भक्ती मिळेल. ज्ञानाची खटपट तुला हवी कशासाठी ? ६

३४३ काय उणें आम्हां विठोबाचे पांईं । नाहीं ऐसें काई येथें एक ॥ १ ॥ तें हें भोवतालें ठायीं वांटूं मन । वराडो करून दारोदारीं ॥ २ ॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥ ३ ॥ तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गांवीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - उणे-कमी, वराडी-भिकारी, बळी-बळवंत, आगळा-समर्थ

अर्थ :- या विठोबाच्या पायाशी आल्यावर आम्हास काय कमी आहे ते सांगा. या पायापाशी आल्यावर मिळत नाही असे काही आहे काय ? १ भोवती सर्वत्र मन वाटून, भिकारी होऊन दारोदार फिरण्याची खरे म्हणजे जरूरीच नाही. २ माझ्या या विठ्ठलाखेरीज दुसरा कोणी एवढा बळवंत आहे काय ? असेल तर सांगा ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हास हवा असलेला मोक्ष याच विठोबाच्या पायाशी आहे, याच्या गावी मोक्ष आहे. ही मोक्षाची भांडारे अगदी फुकट लुटावीत ४

३४४ सेवितो रस तो वाटितो आणिका । घ्या रे होऊं नका रानभरो ॥ १ ॥ विटेवरी ज्याचीं पाऊलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ २ ॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुलभरूप ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - रस-भक्तिभाव, मारग-मार्ग

अर्थ - पांडुरंगाच्या भक्तीचा हा रस मी स्वतः सेवन करतोच, पण हा इतरांनाही मी वाटतो हा तुम्ही सारेजण पोटभर घ्या उगाच वणवण करीत साऱ्या रानभर भटकू नका. १ ज्या विठ्ठलाची गोजिरवाणी पावले विटेवर शोभून दिसतात तोच एक दानशूर असा दाता आहे. २ त्याच्या ठिकाणी जर आपली बुद्धी स्थिर राहिली तर, निष्ठा जडली तर, तुमच्या मनातील सर्व संकल्प सिद्धीस जातील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सोपा व सुखाचा सर्वांना सांगण्यासाठी देवाचा निरोप घेऊनच मला त्याने धाडिले आहे. ४

विवरण - आपण आपल्या बळावर बोलत नाही, आपण ईश्वराचे निरोपी आहोत अशी भूमिका तुकाराम महाराजांनी अनेकदा घेतलेली आहे सर्व सत्ता त्या प्रभूची वा श्रीविठ्ठलाची असल्याने तोच आपल्या मुखातून शब्द वदवितो, असेही त्यांनी काही ठिकाणी म्हटले आहे साळुंकी मंजुळ वाणीने बोलत असली तरी तिचा बोलविता धनी वेगळाच असतो असे त्यांनीच एका अभंगात म्हटले आहे 'तुका म्हणे मज बोलवितो देव', 'आपुलीया बळें नाहीं मी बोलत' या ओळीवरून तुकोबांच्या मनामागे प्रेरणा ईश्वराची होती ते ईश्वराचा निरोप सांगणारे होते धन्याचा माल भक्तजनांसाठी भरपूर प्रमाणात वाटण्यासाठी ते आले होते हे स्पष्ट होते त्यांचे कवित्वही याच ईश्वरी प्रेरणेतून आकारास आलेले होते तेव्हा ही वाणी आपल्या पदरची नाही. 'माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो', 'वदवी गोविंद तैंचि वदें' तो गोविंद बोलवील तसे आम्ही बोलणार असा भावार्थ या सर्व वचनांचा.