भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 305, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 305

सार्थ तुकारामगाथा २७१ ५३५ देवोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळी काळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- राउळीं-देवळात. अर्थ :- कमरेवर हात ठेऊन तू उभा आहेस, असा तुझ्या रूपाचा सत्कार मी संतुष्ट मनाने पाहात आहे. १ त्यामुळे माझ्या चित्तास केवढे समाधान होत आहे ! तुमचे चरण सोडावेत असे कधी वाटतच नाही. २ मुखाने मी तुमच्या स्तुतीचे गीत गाऊन आनंदाने टाळी वाजवीत आहे; व तुमच्या देवळात मोठ्या भक्तिसुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामापुढे मला बाकी सर्व तुच्छ वाटते. ४ ५३६ आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण वडवड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळून आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा पाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- येणेंविण-या तुझ्या नामाशिवाय, वांयां-विनाकारण अर्थः- या देवाच्या एका नामाशिवाय आम्हांला कशाचीही जरूरी नाही आता व्यर्थ इतर वडवड तरी कशाला हवी ? १ आता जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगलेच समजून आले आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंतस्वरूप देवाला पाहिली आहे. आता बोलायचे काही कामच उरलेले दिसत नाही. ३ ५३७ बोलों अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥ १ ॥ भोगों त्याग जाला संगांचि असंग । तोडियेलें लाग भाग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हे दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा' ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाग-संबध, तैसा-विचित्रा अर्थ :-जे न बोलण्यासारखे आहे, त्याज्याविषयीच आम्ही बोलू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत. १ सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनात त्यागबुद्धीचा उदय झालेला असून सर्व संगाविषयी असंग निर्माण झाला आहे. किंवा आमच्या दृष्टीने सर्व भोग व सर्व सग नारायणस्वरूपच झाल्यामुळे आपोआपच त्याग वा असंग घडत आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवर दिसतो तसा खरे म्हणजे नाही. माझ्या खऱ्या रूपाविषयी तुम्हांस काही विचारायचे असेल, तर ते या पाडुरंगास विचारा ना. ३ ५३८ अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळो येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पायलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगों उपकार ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-पलीकडे. अर्थ :- ज्याचा जसा अधिकार तसा त्यास मार्ग दाखविलेला आहे. असे त्या मार्गाने वागले असता त्यास समजून येईल. १ एकदा नदीपार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये. कारण मागाहून येणाऱ्यांना तिचा आधार म्हणून खूप उपयोग होण्यासारखा असतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याचे अंगी रोग नसले, तरी जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे बाळगीत असतो. ३ १ विठोबासी.