भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 308, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 308

२७४ सार्थ तुकारामगाथा नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥ ३ ॥ तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढायें जळत आगींतूनि ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा:- विषतुल्य-विषाप्रमाणे, चांग-चांगले, वाणितां-वर्णन करीत असताना, कळा-कला, गोवूं-गुंतवू अर्थ--देवा, मला हा मान नको. हा मान हे काही माझे खरे सुख नाही. पण हे लोक ऐकत नाहीत, त्याला मी काय करू? १ त्यांच्या सुखोपचारांनी माझे हे अंग देवा, पोळून निघते चांगले गोड मिष्टान्न मला विषाप्रमाणे कडू लागते. २ कुणी माझी स्तुती केली, कुणी थोरवी वर्णन केली की ती ऐकावी असे मला वाटत नाही, त्यामुळे माझा जीव फार कासावीस होतो ३ विठ्ठला, मी तुला येऊन मिळेल अशी एखादी कला माझ्या अंगात येऊ दे ना. आता या भ्रान्त मृगजळात मला ओढून घेऊ नकोस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे काही हित करा ना. मला या अग्नीतून जळताना काढा ना. या संसाराच्या अग्नीतून मला मुक्त करा ना. ५ ५४७ न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥ १ ॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेंचि सांगे ॥ २ ॥ विटंबो शरीर होत कां विपत्ति । परि राहो चित्तीं नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तेंचि हित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संतान-संतती अर्थ.- देवा, मला खायला न मिळो, माझी संतती न वाढो, परंतु या नारायणाने मात्र माझ्यावर कृपा करावी. १ अशा प्रकारचा उपदेश माझी वाचा माझ्या मनास वारंवार करीत असते आणखी इतर लोकांनाही असेच सांगत असते. २ माझ्या शरीराची विटंबना होऊ दे. मला आणखी संकटे प्राप्त होऊ दे. पण माझ्या चित्तात त्या नारायणाने राहावे. ३ कारण तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या नारायणाशिवाय सर्व नाशवंत असून गोपाळाची आठवण येणे यातच खरे हित आहे. ४ ५४८ पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करुनियां ॥ १ ॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ २ ॥ क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥ ३ ॥ करवतीलीं देहें कापियेले मांस । गेले वनवासा शुकादिक ॥ ४ ॥ तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पिंड-शरीर, क्षणभंगुर-क्षणात नाहीसा होणारा अर्थ.- केवळ शरीराचे पोषण करावे हे अधमाचे ज्ञान होय. विलास करून, मिष्टान्न सेवन करून आपलाच देह पुष्ट करावा असे त्यांना वाटते. १ शरीराचे रक्षण करणे हाच एक धर्म असे ते बोलतात; पण खरे पाहिले असता, शरीराचे रक्षण करणे काय त्याच्या हातांत आहे ? २ तो तर एका क्षणात नाहीसा होणार आहे. न समज- ताच तो नाहीसा होईल. हातातील घास मी गिळीन इतके म्हणण्याचीही सत्ता त्यास नाही. ३ कित्येक साधकानी देवाच्या प्राप्तीसाठी आपले देह करवतीने कापवून घेतले आहेत; मांस कापून काढले आहे, देहाचे हालहाल केले आहेत. शुकादिकांसारखे तर वनवासाला सुद्धा गेले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, पण जनक राजा राज्य करीत असता अग्नीमध्ये एक पाय जळत असतानासुद्धा त्याला भान राहिले नाही. सारांश, शरीर कष्टविणे किंवा त्याचे लाड करणे यात काही नसून तुमच्या मनातील भावात सर्व काही आहे. ५