भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 325, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 325

सार्थ तुकारामगाथा २९१

शब्दार्थ व टीपा :- भूषण-लौकिक, समाधान, साच-बरोबर, आस-इच्छा अर्थ :- देवा, तुझें नाम गातो, पण माझ्या अंगात म्हणावासा भक्तिभाव नाही. केवळ समाधानाचा लौकिक जगात वाढावा म्हणून मी हे सारे करतो १ पण देवा, तू पतितपावन आहेस ना ? तुझे हे नाव व वचन तू खरे करून दाखोव ना. २ मी तोंडाने तुझा दास, तुझा दास असे म्हणतो; पण मनात मात्र माझ्या माया, लोभ, इच्छा या असतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी हा वरवरचा साधुत्वाचा वेष दाखविला तरी, अंतरंगात मात्र तसा भाव नाही. ४ ५९९ द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥ १ ॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड ' सटवी नव्हती तेव्हां ॥ २ ॥ कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥ ३ ॥ भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥४॥ तुका म्हणे जाण । नर गाढवाहूनी हीन ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- नागवला-लुटला गेला अर्थ :- या माणसाजवळ भरपूर द्रव्य असून हा दानधर्म करीत नाही पण तो राजदरबारातील कटकटी- मुळे मात्र सतत लुटला जातो. १ याच्या आईने जेव्हा यास जन्म दिला, तेव्हा ती सटवी रांड जागी नव्हती असे वाटते; म्हणूनच हा दुष्ट जगून राहिला. २ देवाची कथा सुरु झाली की, यास झोप येऊ लागते; पण धन्याच्या सेवेत मात्र कुत्र्याप्रमाणे सावध राहून जागत असतो. ३ स्वतःच्या स्त्रीस भोग देताना हा अधम मनुष्य संकोच करतो; पण दासीचे लाड एवढे करितो की, तिचे वस्त्रही उशाला घेऊन निजतो हा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा मनुष्य गाढवापेक्षाही हीन अवस्थेला गेलेला असतो. ५ ६०० सुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धनअभिमान ॥ १ ॥ ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ २ ॥ पोटासाठीं संत । झाले कलौंत बहुत ॥ ३ ॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विरळा-क्वचित अर्थ - मुखाने मोठ्या ऐटीत ब्रह्मज्ञान बोलतो हा; पण याच्या मनात मात्र धन व मान यांची इच्छा आहे. १ अशा माणसाची सेवा करिताना जीवाला काय कधी सुख होईल का ? २ या कलियुगात पोट भरण्यासाठी पुष्कळ संत झालेले दिसतात ३ पण खरा संत जर एखादा क्वचित कुठे असेल तर मला दाखवा, मी तुकाराम त्याला साष्टांग लोटांगण घालून त्याचा आदरसत्कार करीन. ४ ६०१ एक वेळ प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडन ॥ १ ॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ २ ॥ अनुतापें स्नानविधि । यज्ञसिद्धि देहहोम ॥ ३ ॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥ ४ ॥