सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 378, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३४४ सार्थ तुकारामगाथा पाठमोरा होतो. परंतु, दासीच्या मुलास मात्र प्रेमभरानें चुंबन देतो. २ साधुसंत पाहताच हा त्यांची थट्टा करतो. त्यांना हसतो; पण दासीच्या चोळघा मात्र प्रीतीने धूत असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या अधम माणसाच्या तोंडावर थुंकावे, हा मनुष्य यमलोकीचे दुर्भाग्य भोगायताच जातो. ४ ६७८ एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥ १ ॥ एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनीं ॥ २ ॥ अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥ ३ ॥ एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥ ४ ॥ एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥ ५ ॥ चहूकंडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥ ६ ॥ रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पायें आतां ॥ ७ ॥ कोण रखी आतां १ ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥ ८ ॥ आइकोनि तुम्ही तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळवळिलां ॥ ९ ॥ आज्ञा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥ १० ॥ ससें एक तेथें २ उठवुनी पळविलें । तया पाठीं गेलीं श्वानें दोन्ही ॥ ११ ॥ मृगें चमकौनी सत्वर चाललीं । गोविंदें रक्षिलीं म्हणोनियां ॥ १२ ॥ ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भक्तांसी जीवलग ॥ १३ ॥ ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाईच्या पती तुका म्हणे ॥ १४ ॥ शब्दार्थ व टीपा - चिरिल्या-लावल्या, वाघुऱ्या-जाळी, वोणवा-अग्नी अर्थ :- देवा, जगजेठी विठ्ठला, प्रेमाच्या हितगुजाची एक गोष्ट सांगतो ऐकतोस का ? सहज आठवली म्हणून सांगतो. १ एक गरीब हरीण आपल्या दोन पाडसांसहित एका वनात मोठ्या आनंदाने चरत होते. २ तो अवचितपणे एक पारधी तेथे आला. त्याच्याजवळ शिकार करणारे भले मोठे दोन कुत्रे होते. ३ त्या पारध्याने एका बाजूस त्या मृगांना पकडण्यासाठी जाळी लावली व दुसऱ्या बाजूस शिकारी कुत्र्यांना ठेविले ४ तिसऱ्या बाजूस त्याने भला मोठा वणवा पेटवून तोही मार्ग बंद करून टाकला आणि उरलेल्या चौथ्या दिशेस तो पारधी स्वतः शिकार टिपण्याच्या उद्देशाने उभा राहिला. ५ देवा, असे ते हरीण आपल्या लहान पाडसांबरोबर चारी बाजूंनी संकटांनी वेढले गेले. त्यावेळी त्यांनी मनोभावे तुझे स्मरण केले ६ त्यांनी मोठ्या कळवळ्याने म्हटले, "रामा, कृष्णा, श्रीहरी, गोविंदा, केशवा, देवाच्या देवा, आता तुम्हीच आमचे रक्षण करावे. ७ बापा जगजेठी, विठ्ठला, आता या संकटप्रसंगी तुझ्यावाचून दुसरे कोण आमचे रक्षण करणार?" ८ या हरणाचे हे आर्त शब्द ऐकून देवा तुमचे अंत करण कळवळून गेले ९ मग तुम्ही त्या वेळी पर्जन्यास आज्ञा करून पाऊस पाडला व एका दिशेचा अग्नी विझवून टाकला १० दुसऱ्या एका दिशेकडून एक ससा निर्माण करून त्याच्या पाठीमागे ते दोन कुत्रे घालवून दिले. ११ तुझ्या या अघटित लीलेने चमकून ही मृगे आनंदित होऊन या गोविंदाने आपले रक्षण केले, असे म्हणून ती सुखरूपपणे तेथून निसटली. १२ असा देवा, तू अतिशय कृपाळू आहेस. आपल्या जिवलग भक्तांवर अशीच कृपा तू करीत असतोस ! १३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी ही तुझी कीर्ती माझ्या जीवास फार आवडते, रखुमाईच्या पती, माझेही रक्षण करा. १४ विवरण :- भक्तीचे माहात्म्य वाढविण्यासाठी, ईश्वर लहान, गरीब, दीन प्राण्याचे रक्षण संकटकाळी कसे करतो, हे दाखविण्यासाठी अनेक प्रसंगी तुकाराम महाराजांनी पुराणातील दाखले दिले आहेत. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या, पक्ष्यांच्याही कल्पित कथा, कधी पुराणाचा आधार घेऊनही दिलेल्या आहेत. मागे अभंग ६०७ मध्ये वृक्षावर १ आम्हा, २ उठोनि चालिले.