भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 405, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 405

सार्थ तुकारामगाथा ३६९ अर्थ:- या श्रीहरीचे गुण कितीही गायिले तरी मनाची कधी तृप्ती होत नाही याचे रूप न्याहाळून पाहताना दृष्टीचे सुखही अपार होते. १ हा पांडुरंग फारच चांगला आहे. याची कांती सावळी व सुंदर अशी आहे २ याचे रूप म्हणजे सर्व मंगल पदार्थांचे सार असून सर्व सिद्धींचे ते एक उत्तम भांडार आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या सुखाला काही सीमा नाही असेच समजा. ४ ७५८ जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥ १ ॥ म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ २ ॥ लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड¹ जैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे याचकभावें । कल्पतरू मान² पावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कैंचा-कसा, कृपानिधी-कृपेचा साठा, लोहो-लोखंडाने. अर्थ:- देवा, मी जर येथे पतित नसतो, तर तुझी पतितपावन म्हणून येथे कीर्ती कशी झाली असती? तू पतितपावन कसा बनला असतास? १ म्हणून माझे पतित हे नाव तुझ्या आधी असून मग तू पतितपावन असा कृपेचा साठा आहेस. २ लोखंडामुळे खरे म्हणजे परिसाला महत्त्व आले आहे. नाहीतर तो दगडाप्रमाणेच झाला असता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी याचकभाव धरून उभा आहे म्हणून त्या कल्पतरूला महत्त्व व मान मिळत आहे नाही तर तो इतर वृक्षाप्रमाणेच झाला असता, तसे देवा, माझ्यामुळे तुम्हास महत्त्व आहे. ४ ७५९ एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥ १ ॥ कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ २ ॥ आठवचि पुरे । सुख अवघें मोहोरे ॥ ३ ॥ तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोहोरे-प्राप्त होते. अर्थ :- या प्रभूविषयी एकनिष्ठेचा भाव चित्तात असावा. मग इतर युक्त्यांची काही जरूरी लागत नाही. १ हे सर्व मला माझ्या शुद्ध भावामुळे समजून आले आहे २ नुसती त्याची आठवण झाली तरी ती पुरी आहे. तिच्यामुळे सर्व सुखांची प्राप्ती होत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा नारायण मनोमय पूजेची इच्छा करीत असतो. ४ ७६० मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥ १ ॥ पाहा विचारुनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ २ ॥ तुज बोल न बोलवे । आम्हां भांडायाची सवे ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सवे-सवय. अर्थ :- देवा, मला या संतांचा तरी केवढा आधार आहे. पण तू मात्र एकटाच असून निर्विकार आहेस १ देवा, तुम्हीच नीट विचार करून पाहा, उगीच आमच्या बरोबर दावा धारण करू नका. २ तुम्हाला एक शब्दही बोलायला नको व आम्हास मात्र भांडण करण्याची सवय आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, यासाठी ऐक्यभाव उरेल असे कर. ४ ७६१ तुज मागणे तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥ १ ॥ आन नेघों देसी तरी । रिद्धि सिद्धि मुक्ति चारी ॥ २ ॥ १ दगडा ऐसा, २ नाम. तु गाथा .४७