भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 80, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 80

५२ सार्थ तुकारामगाथा मुळे रामास वनवासास जावे लागले असे समजताच याने आईस कटू शब्दांनी फार दुखविले व आपण स्वतः ही राज्याच्या त्यागास प्रवृत्त झाला. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवूनच भरत राज्यकारभार पाहात होता १०९ मान अपमान गोवें । अवघें गुंडूनी ठेवावें ॥ १ ॥ हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ २ ॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥ ३ ॥ आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोवें-पाश, गुंडूनी-गुंडाळून, खुंठे-थांबते, ऊर्मी-सुखदुःखांची लाट अर्थ - मान आणि अपमान यांच्या पाशांत गुंतून राहूं नये. हे सारे विकार गुंडाळून ठेवावेत. १ यामुळे अंतःकरण नेहमी समाधानी राहून यातच देवाचे दर्शन झाल्याचे सुख होईल. २ याच ठिकाणी खऱ्या शांततेची वस्ती असून कालचक्राचीही गती येथे खुंटेल. ३ जी जी सुखाची किंवा दुःखाची ऊर्मी येईल ती थोडी सहन करणे, शांतपणे तीस वागविणे, एवढे थोडे असले म्हणजे झाले. ४ विवरण:-मन ईश्वराकडे लावून शाश्वतचे समाधान मिळविण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे मानापमान न मानता स्थिर बुद्धीने राहणे मान आणि अपमान याच्या वृथा जाणिवेमुळे अनेक प्रकारची दुःखे निर्माण होतात. भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची जी लक्षणे आहेत त्यात 'अमानित्वम्' हे पहिलेच लक्षण सांग- ण्यात आले आहे 'पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।' अशी स्थिती आपली असावी. 'चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी' अशी अवस्था ज्ञानी माणसाची असते. उलट मानसन्मानाची हाव धरली की अपमानच होऊ लागतो. 'मान इच्छी तो अपमान पाये' असे तुकारामबुवांनी म्हटले आहे. ११० थोडे आहे थोडें आहे । चित्त साहे जालियां ॥ १ ॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ २ ॥ अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधायें ॥ ३ ॥ तुका म्हणे लटिकें पाहें । सांडों देह अभिमान ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- साहे-साहवतेस, हर्षामर्ष-आनंद, दुःख, सरले-संपले, लटिकें-खोटे, देहअभिमान-देह हा खरा असा अभिमान अर्थ - जर आपले चित्त आपल्या साहण्यात येईल तर ईश्वरप्राप्तीसाठी फार थोडे करावे लागेल. १ ज्याच्या चित्तात सुखदुःखादी विकार उरत नाहीत त्याचे जीवन पांडुरंगातच विलीन झाले असे समजावे. २ सर्व साधनाचे सार हेच एक असल्याने आणखी दुसरे काही शोधावयास नको. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व प्रपंच व ही बाह्य सृष्टी या गोष्टी खोट्या असल्याने मला, तू त्याचा अभिमान सोड. ४ विवरण -मानसन्मान सोडावा, अपमानाची फिकीर करू नये हे जसे खरे, तसेच या मार्गात राहणाऱ्या माणसाने सुखदुःखाचीसुद्धा पर्वा करू नये गीतेत सांगितल्याप्रमाणे 'सुखदुःखे समे कृत्वा' सुख आणि दुःख यांना समान वागवूनच आपण चालले पाहिजे 'सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें' अशी ज्ञानेश्वरांची ही शिकवण आहे. 'सुखदुःखादि धर्मं । कां शुभाशुभे कर्में । दोन्ही ऐसीं मनोधर्मं । नेणोंचि जो।' अशी अवस्था ईश्वरप्राप्तीसाठी सिद्ध झालेल्या माणसाची असते. सुख, दुःख, हर्ष, अमर्ष, लाभ, अलाभ, जयाजय याच्या द्वंद्वातून त्यास पलीकडे जावयाचे असते. १११ आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न फळे ॥ तरी मार्तंडिये खोळे । दगड आला पोटासि ॥ १ ॥ मनुष्यदेहा ऐसा निघ । साधिलीं ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ २ ॥