भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 20, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 20

तरी तें फार दुस्तर असल्यामुळे अखिल मानवप्राण्यांना एकसमयावच्छेदेंकरून तें साध्य होत नाहीं, असें मानवसमाजाच्या आजपर्यंतच्या इतिहासावरून सिद्ध आहे. मानवसमाजांतील बहुतेक प्राणी उपरोक्त मायेनें लिप्त म्हणजे बद्ध स्थितीं- तच असतात. कांहीं थोडे लोक मुमुक्षु बनलेले असतात, व त्यांतूनही थोडे साधक, आणि फारच थोडे—हाताच्या बोटांनीं मोजण्याइतके—सिद्धकोटींत गेलेले असतात. ह्या निरनिराळ्या अवस्थांचीं लक्षणें समर्थांनीं दासबोधांत विस्तृतपणें सांगितलीं आहेत. त्यावरून असें दिसून येतें कीं, मनुष्याची ‘बंधनभ्रांति’ उडून गेली म्हणजे त्याचे ठायीं मुमुक्षेचा उदय होतो. तो झाल्यावर तो मनुष्य सत्त्वगुणसंपन्न व परोपकारी बनतो. त्याचा अहंकार जळाला म्हणजे तो साधक होतो. साधक झाला तरी त्याचे ठायीं ‘तें’ व ‘मी’ ह्या भेदाची जाणीव रहा- तेच. ती नष्ट होऊन ‘तें’ (ब्रह्म) व ‘मी’ एकच अशी भावना जेव्हां होते, तेव्हां तो सिद्धाच्या स्थितीस पोचून मोक्षाचा मालक होतो. सिद्ध व साधक हे जरी थोडे असले तरी बाकीच्या सर्व मानवांना मोक्षमार्गाकडे नेण्यास ते समर्थ असतात; व तसें करणें हें रामदासांच्या मतें त्यांचें कर्तव्यच आहे. कारण त्यांत त्यांचें स्वतःचेंहि हित आहे. सर्व समाज जर बद्ध अतएव विपन्न व दुःखी असेल, तर त्या स्थितीचा स्पर्श अंशतः तरी सिद्ध व साधक यांस होऊन त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा भंग झाल्यावांचून राहणार नाहीं. अर्थात् त्यांनाहि दुःखाचे आवेग सहन करण्याचा प्रसंग येऊन तेहि विपन्न व बद्ध होऊं लागतील! ही स्थिति टाळण्याकरितां म्हणून तरी स्वसमाजाला उन्नतावस्थेकडे नेणें त्यांस भाग आहे. हें कार्य त्यांनीं कसें सिद्धीस न्यावें याचा विस्तृत प्रपंच करण्यांतच समर्थांनीं आपल्या दासबोधाचा बहुतेक भाग व्यापला आहे. हें कार्य साधण्याकरितां तीन उपाय किंवा साधनें समर्थांनीं सांगितलीं आहेत. ते तीन उपाय म्हटले म्हणजे नीति, धर्म व राज्य—अर्थात् स्वराज—यांची समा- जांत स्थापना करून त्यांची अभिवृद्धि करणें हे होत. सगुणोपासना किंवा हरि- कथा आणि वर्णाश्रमधर्मांचें निरूपण करून त्यांनीं नीति व धर्म यांच्या स्थापनेचा मार्ग दाखवून दिला आहे. परंतु धर्म व नीति यांस जर राज्यसंस्थेचें पाठबळ नसेल तर त्यांची अभिवृद्धि होण्यास मोठी अडचण पडते. ती कशी याचें स्पष्ट चित्र त्या वेळच्या समाजस्थितीच्या रूपानें समर्थांच्या डोळ्यांपुढें होतें. तें त्यांनीं

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 20, कुल 467 में से · BharatKosha