भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 156, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 156

१२८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- पोटपोसा-कसेबसे पोट भरणारा, वाचाळ-बडबड्या, न यजातां-न गेले तर. अर्थ - लोक कसे नेहमी दोन्ही बाजूंनी बोलत असतात याचे फार समर्पक वर्णन करताना तुकोबा म्हणत आहेत, हा बाह्य लौकिक नीट राखायचा म्हटले तर तो कधीच साधता येणार नाही. पतितपावना देवा, लौकिक राखणे अवघड काम आहे. १ कारण पाहा की; संसार सोडून द्यावा तर म्हणतात हा आळशी आहे. कसे तरी पोट भरण्याची ऐपत नाही याला. २ काही वेदविहित असे आचार करावेत तर लोक म्हणणार काय कर्मकांडाचा पसारा मांडला आहे; बरे, काहीच आचारधर्म पाळिला नाही तरीही निंदा करतात. ३ साधुसंतांची संगत धरावी तर म्हण- तात हा लागला आता लोकांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला; तसे न केले तर म्हणतात हा मतिमंदच, याला कुठली बुद्धी येणार? या अभाग्याला दान होणारच नाही. ४ जवळ धन नसले तर लोक हा मूळचाच करंटा असे म्हणतील, बरे धनवान झाला तर फार धनमत्त झाला असे जिथे तिथे बोलतील. ५ फार बोललो तर म्हणतील हा फारच बडबड्या दिसतो; बरे अनियात न बोलावे तर हा अहंमन्य, गर्विष्ठ आहे असे लोक म्हणतील ६ कुणाच्या भेटीस जर गेलो नाही तर म्हणतील हा मनाचा फारच निष्ठुर आहे; आणि भेटीस जाऊ लागलो तर हे म्हणतील जातायेता खाऊनपिऊन याने आमचे घर बुडविले हो. ७ लग्न करावे तर हा फारच माजला हूं असे म्हणतील. बरे न करावे तर हा कसले लग्न करणार? नपुंसकच आहे असेही म्हणणार. ८ मुले बाळे झाली नाहीत तर म्हणतात हा निपुत्रिक चांडाळ आहे; आणि चार मुलेबाळे झाली तर म्हणतील काय हो पोरवडा ! पातकाचे मूळच की. ९ येणारी ओशारी जशी थांबविता येत नाही तसे लोकांचे बोलणे थांबविता येत नाही. अभक्त असेल त्याला संतसंगदेखील जिरायचा नाही. १० म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकच वचन ऐका, की या दुटप्पी बोलणाऱ्या सामान्य लोकांची संगत सोडा व भक्ती करायला लागा. ११

२६० धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥ १ ॥ वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ २ ॥ न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥ ३ ॥ तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आटी-खटपट, श्रम, लंड-नास्तिक अर्थ:- आपल्या कार्याचे स्वरूप सांगताना या प्रसिद्ध अभंगात बुवांनी सांगितले आहे, धर्माचे रक्षण करण्या- साठीच आम्हास अशा प्रकारचे परिश्रम करावे लागतात १ वेदांनी सांगितलेली नीती आम्ही आमच्या वाणीने लोकांना सांगू व संतानी जसे आचरण केले तसेच आम्हीही करू. २ अंगी आत्मस्थिती बाणली नसताना जो कर्म सोडून देतो तो एक नास्तिकच म्हणावा लागेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो हरीच्या भक्तीला दूषण लावतो तो अधमच होय ४

२६१ चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं साठविला ॥ १ ॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं ऋद्धिसिद्धी ॥ २ ॥ असुर जयानें घातले तोरडीं । तो आम्हांसि जोडी कर दोन्ही ॥ ३ ॥ रूप नाहीं रेखा जयासि आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥ ४ ॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥ ५ ॥ ऋद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥ ६ ॥ तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवूनि आशा ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळगती-येतात, उपस्थित राहतात, तोरडीं-सुरगाल अर्थ:-ज्याच्या पोटात चौदा भुवने साठविली आहेत तोच श्रीहरी आम्ही आमच्या कंठात साठविलेला आहे. १ मग आमच्या घरी काय कमी आहे? आमच्या दारात ऋद्धीसिद्धीसुद्धा झुकतात २ ज्याने मोठमोठे राक्षसही