भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 157, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 157

बंदिवासात घातले तो आमच्या पुढे हात जोडून उभा आहे. ३ ज्याला रूप नाही, रंगाचा आधार नाही, तो परमेश्वर आम्ही भक्तीच्या साह्याने सगुण व साकार केला ४ ज्याच्या अंगात अनंत ब्रह्मांडमुद्रा सामावतात तो आम्हासाठी मुंगीसारखही होऊ शकतो ५ ज्याने रिद्धीसिद्धींना सुद्धा दूर केले आहे तो या प्राकृत व साध्या संसाराची चिंता कशाला करील ? ६ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाहूनही बलवान आहोत कुठलीही आशा मनात न ठेवता आम्ही निराळेच झालो आहोत. ७ २६२ केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय देव म्हणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी समावे ॥ १ ॥ तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हास ॥ २ ॥ केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥ ३ ॥ केली कांसाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणे । कांसे राहे कांसेपणे ॥ ४ ॥ ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्यानेचि घेणे । आम्ही पाषाणरूप राहणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - किंकर-दास, काशाची-कांस धातूची, कांजी-पेज अर्थः- मातीचा पशुपती म्हणजे महादेव तयार करून त्याची पूजा केली, पण या मातीस का देवपण द्यायचे? ज्या शिवाच्या भावनेने पूजा केली होती त्या शिवास ती पोचली. माती मातीस मिळाली १ त्याचप्रमाणे काही लोक आमची पूजा करतात; पण आमचे महत्त्व नाही; पूजा घेणारा तो भगवंतच आहे-आम्ही केवळ संतांचे दास किंवा सेवक आहोत, आम्हास संतपदवी नको आहे. २ पाषाणाचा विष्णु केला तरी तो पाषाण काही विष्णु नव्हे, विष्णूची पूजा विष्णूला प्राप्त होते व पाषाण पाषाण रूपानेच राहातो ३ काशाची देवी जगदंबा केली व तिची पूजा केली; पण तिच्यातील कांसे हे काही जगदंबारूप नव्हे. अंबेची पूजा अंबेला मिळते, कांसे कांसेच राहते ४ तुकाराम महाराज म्हणतात, पूर्णब्रह्म असणाऱ्या ईश्वराच्या ठिकाणी माझी भक्ती ही कांजीच्या पेजाप्रमाणे आहे, या भावनेने पूजा झाल्यास ती त्याची त्यास म्हणजे परमेश्वरास पोचते व आम्ही मात्र पाषाण- रूपाने उरतो. ५ विवरण :- तुकाराम महाराज हे सगुणोपासक असल्याने त्यांना मूर्तिविषयी व तिच्या सौंदर्याविषयी अपार प्रेम असणे साहजिकच आहे निर्गुण, निराकार परमेश्वराची मनोमय पूजा करण्याचे काम फार क्लेशकारक असल्याने व अव्यक्ताची उपासना सर्वांना सहजसुलभ अशी नसल्याने सगुण उपासनेस व मूर्तिपूजेस महत्त्व मिळाले. परंतु या सगुणोपासनेवर व मूर्तिपूजेवर पूर्वापासून आक्षेप होते निर्गुण, निराकार व अव्यक्त स्वरूपाची उपासना थोर असा आग्रह धरणाऱ्यांच्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न तुकोबारायासारख्या साधुसंतांनी वारंवार केला आहे. मातीचा महादेव केला, पाषाणाचा विष्णु केला व त्याची पूजा केली तरी ती ईश्वरास मिळते त्या पूजनापाठीमागे एक भाव असेल तर पाषाण, माती, कासे कशाचा का देव असे ना, त्याच्या मूर्तीच्या निमित्ताने ती पूजा शेवटी परमेश्वरालाच प्राप्त होते या मूर्तीच्या वा प्रतिमाच्या रूपांनी तो परमेश्वरच पूजा घेत असतो. भक्तीचा पाचवा प्रकार म्हणून अर्चनभक्ती सांगितली आहे हे अर्चन सगुणाचेच होऊ शकते सगुणावर मन स्थिर करणे सोपेही असते भगवंताच्या विभूती ज्या ज्या ठिकाणी आहेत ती ती स्थाने किंवा त्या त्या वस्तू प्रतिमारूपाने तयार झाल्या की त्याचे पूजन सर्वसाधारण माणसांस सुलभ होते सूक्ष्म व अव्यक्त अशा रूपाचा परिचय करून घेण्यासाठी आधी सगुण मूर्तीची आराधना उपयुक्त होण्यासारखी असते असाही एक विचार आहे. तु. गाथा...१७