सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 22, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसर्वत्र त्याचीच पावले दिसू लागली 'देव झाले अवघे जन । दोषगुण हरपले ।' अशी अवस्था होऊन गेली 'आमुचा स्वदेश । भुवनत्रयामध्ये वास' अशी विशाल दृष्टी होत राहिली 'जेथे देखे तेथे तुझांच पाऊलें । विश्व अवघें कोंदाटलें ।' ईश्वराच्या भेटीची, साक्षात्काराची, आत्मानुभूतीची बोलकी व सजीव चित्रे, तुकाराम महाराजांच्या अभंगांतून स्पष्टपणे जाणवतात एकदा त्यांनी म्हटले आहे, 'माझे माथा तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥ ऐसी पडियेली गाठीं । शरीरसंबधाची मिठी ॥' अशा प्रकारे स्वानंदाचा लाभ तुकारामांना झाला ईश्वराची भेट झाली सर्वोत्तम सुखाचे साधन हाताशी आले ते त्याच्या स्वरूपाशी जाऊन भिडले तो व आपण एकच, ही अनुभूती आली आत्मा-परमात्मा, जीवशिव, याच्यातील भेद संपला पुढे काय ? ज्या अद्वैताच्या अनुभूतीसाठी तुकाराम महाराजांचा जीव तळमळत होता, ती प्राप्त झाली ईश्वर अगदी जवळून भेटला दूरत्व संपले दुजाभाव नाहीसा झाला अणुरेणूहूनही लहान असणारा तुका आकाशाएवढा झाला परंतु पुढे काय ? जीविताची हीच सार्थकता असल्यावर पुढे काय ? हा प्रश्नच निरर्थक म्हणावयाचा की काय ? 'मग या सतसंगा पाहूं कोठें ?' परंतु संतांच्या पारमार्थिक जीवनात याही प्रश्नास महत्त्व आहे आत्मस्थितीचे ज्ञान झाले, ब्रह्माची अनुभूती आली, मोक्षसुखाची चव सापडली म्हणजे मग सर्व संपले की काय ? वैकुंठास किंवा मोक्षास पोचल्यावर मग काय उरणार ? मुक्ती मिळाल्यावर मग आणखी काय हवे ? अद्वैताच्या अनुभूतीपेक्षा आणखी श्रेष्ठ काय आहे ? तुकारामबुवांनी उत्तर दिले आहे, या ब्रह्मज्ञानापेक्षाही भक्तीची आर्तता श्रेष्ठ आहे तू व मी एकच या भावापेक्षा, तू देव, मी भक्त, हे ऐक्यभावावरचे दुजेपण अधिक गोड व रमणीय वाटते त्यांना ऐक्यभावाचे ज्ञान झाल्यावर, विठ्ठलाशी मीलन झाल्यावर, वेगळे होता त्यावेळच्या सुखाची आठवण त्यांना होते सर्व एकच आहे अशा अनुभूतीत स्तवन कुणी कुणाचे करायचे ? कुणी कुणाच्या पायावर डोके ठेवायचे ? आर्त वाणीने पुकार कुणी करायचा ? कुणी कुणास दुःख सांगायचे ? कुणी कुणाची सेवा करायची ? कुणी कुणाचे रक्षण करायचे ? कुणी कुणावर रुसायचे ? कुणी कुणाशी भांडायचे, लटक्या भावाने रागवायचे ? या मी-तूंपणाच्या भावातील गोडीचे सुख मग संपलेच की काय? मुक्तीच्या स्थितीत, ऐक्यभावात, मोक्षसुखात तळमळ नाही, विरह नाही, आर्त वाणी नाही, स्मरण नाही, उत्कंठा नाही, हुरहुर नाही, आणि म्हणून या अवस्थेतील सुखही नाही संताची संगत नाही, की डोळे भरून सुंदर रूप पाहणे नाही म्हणूनच एकदम नामदेवतुकरामा- सारखे संत बोलून जातात, 'झणी मुक्तीपद देशी पांडुरंगा । मग या सतसंगा पाहू कोठें ?'