सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 329, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २९५ आरंभी तुलाच वंदन असते. सर्वजन असेच सांगतात. देव, ऋषी, मुनी इत्यादींनी पुराणग्रंथांतून हेच निवेदन केले आहे. ३ तुझ्या बुद्धीचे व गतीचे मी वर्णन काय करावे ? माझ्या अल्प मतीत एवढे सामर्थ्य कुठे आहे ? तुला दीनानाथ म्हणतात ना ? मग मी दीन आहे. तू तुझे हे नाव खरे करून दाखीव ना. ४ मी या वृथा मायेच्या पुरात वाहात असताना, या भवसागराच्या डोहात बुडत असताना, तुझ्याशिवाय माझे रक्षण कोण करणार ? तुकाराम महाराज म्हणतात, गणपते, तू माझ्यावर लवकर कृपा कर. ५ ६१० प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥ १ ॥ तो देव नटला गौरीबाळ । पांयीं बांधोनि घागऱ्या घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥ २ ॥ नटारंभीं थाटियेला रंग । भुजा नाचवी हालवी अंग । सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥ ३ ॥ जया मानयती देव ऋषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी । असुर जयाच्या चरणीं । आदीं अवसानीं तोचि एक ॥ ४ ॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका म्हणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - दातार-दाता, फरशधर-परशू धारण करणारा, पार-सीमा, अंत, गौरीबाळ-पार्वतीचा मुलगा गणपती, मेळे-समुदाय, नटारंभीं-नृत्यनाट्याच्या आरंभी, चांग-चांगला, धनी-तृप्ती, आदीं-जन्माच्या वेळेस, अवसांनीं-मरणाच्या वेळेस. अर्थ -- सर्व कार्याच्या आरंभी प्रथम या गणपतीला नमन असो. सर्व सिद्धींचा दाता हा गणपती आहे. हा चार हातांचा असून याच्या एका हातात परशू म्हणजे कुऱ्हाड आहे. याच्या सामर्थ्याचा अंत लागत नाही. १ गौरीचा हा मुलगा आता चांगला नटलेला आहे. त्याच्या पायात घागऱ्यांचे चाळ बांधलेले आहेत. नारद तुंबरांचा समुदाय जमला आहे. याच्या सामर्थ्यामुळे इतर संकटांना पळता भुई थोडी झाली आहे. २ नृत्यनाटकाच्या आरंभी याचे रंगरूप नटलेले आहे. हा गणपती नृत्यात अंग विविध प्रकारांनी हालवत असून आपले हातही नाचवीत आहे. शेंदराच्या विलेपनाने याचे अंग चांगलेच माखले गेले असल्याने मोठे चांगले दिसत आहे. याच्या मुकुटावर नाग शोभून दिसतो ३ देव, ऋषी, मुनी याला मनापासून मान देतात, याचे रूप कितीही पाहिले तरी डोळ्यांची तृप्ती होत नाही. सारे असुर याच्या चरणी लीन होऊन असतात आपल्या जन्माच्या वेळेपासून अखेरपर्यंत याचेच एक रक्षण असते. ४ सर्व सिद्धींचा हा दाता असल्याने तो आमचा दाता आहे. याच्या रूपास अंत नाही. याच्या कृपेने मनुष्य भवसागर तरून जाईल. ५ विवरण - वरील दोन अभंगांत तुकोबांनी गणपतीस नमन केले आहे. गणपती हा सुखकर्ता, दुखहर्ता असल्यामुळे प्रत्येक कार्याच्या आरंभी त्यास नमन करण्याची चाल आहे. तो बुद्धीचा व सर्व सिद्धीचा दाता असल्या- चेही वर्णन अनेकांनी केले आहे तुकारामबुवांचे आराध्य दैवत श्रीकृष्ण वा विठ्ठल असले तरी त्यांनी गणपती या देवतेवरही अभंग केलेले दिसतात ज्ञानेश्वररामदासादी संतांनीही गणपतीचे अति सुरेख व भक्तिभावपूर्वक असे वर्णन केलेले आढळेल. या पुढचे व वरील दोन असे ६३ अभंग नाटाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. नाट म्हणजे एकप्रकारचे नृत्य, नाट्य वगैरे तुकोबांच्या वेळीही अशा प्रकारचे खेळ होत असावेत. त्याच्या निमित्ताने हे अभंग झालेले दिसतात. 'देव नटला गौरीबाळ .. भुजा नाचवी हालवी अंग ' इत्यादी वर्णनावरून या नृत्यनाट्याच्या प्रसंगी गणपतीचे रूप घेऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्याची रीत त्याही काळी असावी असे दिसते.