भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 369, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 369

असतो त्याच्या लीला सर्वत्र असतात. २ हा देव उभा असला तरी, त्याबद्दलचे दुःख कधी मानीत नाही. भक्तांचा उद्धार करिताना हा भेदभाव मानीत नाही. समर्थांच्या घरी, श्रीमंताच्या घरी जसे सर्वांना एकाच प्रकारचे अन्न मिळते, त्याप्रमाणे भुकेने दुःखीकष्टी झालेल्यांना हा देव क्षणोक्षणी सांभाळीत असतो. ३ मोठ्याच्या घरी नाना रुचींचे, नाना प्रकार अन्नाचे केलेले असतात, मोठ्या आदराने वाढायला आणतात. त्यावेळी थोरांना थोर पदार्थ, लहानांना किरकोळ पदार्थ, असा भेदभाव कुणी करीत नसतात. ४ हा देव नुसत्या बळाने कधी हातात सापडत नाही. डोळ्यांनी त्याच्याकडे निरखून पाहताच सारे मनच तदाकार होऊन जाते. आपल्या भक्तांच्या मनांतील उद्देश हा हृदयनिवासी विठ्ठल जाणून असतो ५ कुणी प्रेमी भक्त आल्यास प्रेमपान्हाास कधी अंतर पडत नाही. तो पान्हा कधी संपतो असे घडतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या आयत्या प्रेमपान्ह्याचे सेवन मी त्याच्या चित्तात माझे चित्त मिळवून करीत आहे. ६

६६४ ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥ १ ॥ न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ २ ॥ रामकृष्णध्यान वामननरसिंहों । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥ ३ ॥ गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥ ४ ॥ ठाण हें साजिरे सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥ ५ ॥ जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळ चरणसेवक¹ ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :- उपजे-निर्माण होणे, धणी-तृप्ती.

अर्थ :-या श्रीहरीचे मुख इतके सुंदर आहे की, याकडे पाहताच सर्व ताप दूर होतात. भवरोगासारख कठीण दुःखही दूर होते. याला पाहताच मोठे सुख निर्माण होते. माझ्या दृष्टीपुढेच हे सुख उभे आहे १ याला कितीही पाहिले तरी, डोळ्याची तृप्ती होत नाही. याच्या कृपेची खाण मोठी आहे याचे स्तवन करिताना वेदवाणीही पुरी पडत नाही. असा हा सारख्या पावलाचा श्रीहरी, कृपेचा साठा श्रीविठ्ठल उभा आहे. २ रामकृष्ण हे रूप वामनासारखे या नरसिंहासारखे प्रथम उग्र, मग सौम्य, अथवा प्रथम सौम्य मग उग्र असे काहीच नाही. याच्याकडे भक्तीच्या प्रवाहाने येणाऱ्या व भक्तिभावाने पाहणाऱ्या सेवकांनाच हा प्राप्त होतो. शुद्ध भाव हाच याचा प्रेमाचा खाऊ आहे ३ हा श्रीहरी गुणांनी गंभीर, चतुर, सुजाण, शूर, धीर, उदार असून त्रिभुवनांत भरून राहिलेला आहे. याचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. ४ या नारायणाचे हे स्थान अतिशय सुंदर व शोभिवंत असे असून ते अविनाशी व अविकारी आहे. त्याचे स्वरूप अनंत व अपार असूनही हा देव कमरेवर हात धरून उभा आहे. ५ याची वाणी म्हणजे फुलांची माळच आहे. त्याची कृपा म्हणजे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे अमृतच होय. तुकाराम महाराज म्हणतात, या अनंताच्या अंगी अनंत कला असून याच्याजवळ हा सेवक उभा आहे. ६


१ चरण सेवे.

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 369, कुल 611 में से · BharatKosha