भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 371, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 371

सार्थ तुकारामगाथा ३३७ ६६६ उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी समचि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥ १ ॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पीतांबर उटी शोभे गोरेपणे । लोपली तेणें रवितेजें ॥ २ ॥ श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ । दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥ ३ ॥ कर्डी फडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां¹ । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥ ४ ॥ सुंदरपणाची साम्यता । काय वर्णू ते पावे आतां । तुक्याबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- जडितमेखळा-रत्नजडित कंबरपट्टा, चिद्रत्नें-चैतन्यरूपी रत्ने, ढाळ-तेज, दशांगुळी- दहा बोटात, मुद्रिका-मुद्रांकित अंगठ्या, कर्डी-करदोरा, बाहीं-दंडावर, बाहुवटे-बाहुभूषणे, मृगनाभी-कस्तुरी अर्थ :- हा श्रीविठ्ठल मी आज भीमेच्या तीरावर उभा राहिलेला पाहिला. याने आपले हात कमरेवर ठेवून मिरविले आहेत. याची पावले समान असून अत्यंत शोभिवंत अशी आहेत. याचे नाव अनंत रूपात असून अतिशय गोड असे आहे. १ शंख, चक्र इत्यादींनी अंकित झालेली भूषणे याने घातली आहेत. चैतन्याच्या रत्नानी याचा कंबरपट्टा जडविलेला आहे. याच्या गोरेपणामुळे याचा पीतांबर व याच्या अंगाची उटी या गोष्टी शोभून दिसतात. याच्या तेजाने सूर्याचेही तेज लोपून गेलेले दिसते २ याच्या कानात कुंडले शोभत असून त्याचा प्रकाश पडत आहे. याच्या दहाही बोटात रत्नजडित अंगठ्या असून याच्या गळ्यात माळ आहे. याच्या मुखातील दातांची ओळ हिऱ्या- प्रमाणे चमकत आहे. याचे मुख निर्मळ असून ते एक अथांग अशा सुखाच्या राशीप्रमाणे आहे. ३ याच्या कमरेस करगोटा आहे. याच्या दंडांवर वाक्या व इतर बाहुभूषणे शोभून दिसतात. याच्या गळ्यात पदक शोभत असते. मृगाच्या नाभीतून मिळालेल्या कस्तुरीचा टिळा याच्या कपाळावर आहे. याचे डोळे विद्युल्लतेप्रमाणे चमकणारे आहेत. ४ या श्रीहरीच्या सुंदरपणाची साम्यता काय वर्णन करावी ? तुक्याबंधू म्हणत आहे की, अरे अच्युता, जी माता तुला प्रसविला ती धन्य होय. ५ ६६७ एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥ १ ॥ नको दुजी बुद्धि आणीक । रिद्धिसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ २ ॥ मना येईल तो जन्म देईं । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाही । हृदयींहुनी तूं न वजें ॥ ३ ॥ इतुले करीं भलत्या परी । भलत्या भावे तुझे द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वेखरी नित्य नाम ॥ ४ ॥ नको विचारूं दुसरें आतां । शरण आलो जी पंढरीनाथा । तुक्याबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :-खंडणा-विरोध, सांकडे-संकट, न वजे-दूर होत नाहीस, कामारी-सेवक, वेखरी-वाणी. १ माळा. तु. गाथा...४३

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 371, कुल 611 में से · BharatKosha