सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 385, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंआपुलेंचि मन । करवी आपणां बंधन ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तुम्ही फोडीं हीं उगवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- झाफुळिलें-झाकून टाकले, उगवा-सोडवा. अर्थ :- सर्व विश्वात भरून टाकणारी जी माया, तिने छायेप्रमाणे सर्व जगाला झाकून टाकले आहे. १ त्यामुळे जगातील सत्य वस्तूचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. अविद्येचे अथवा मिथ्या वस्तूचे महत्त्व मात्र एकसारखे वाढत आहे २ आपलेच मन आपल्याला या संसारबंधनात जखडून टाकीत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या मिथ्या मायेची कोडी तुम्हीच सोडवा. ४
६९१ पोटों जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥ १ ॥ रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥ २ ॥ तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- आप्तवर्ग-जवळचे नातेवाईक. अर्थ :- आपल्या पोटात अनेक रोगाचा जन्म झाला; म्हणून काय त्यांना आपण आपल्या मुलांप्रमाणे, आप्तवर्गाप्रमाणे मानतो की काय ? १ रानात पुष्कळ वनस्पती औषधाच्या असतात; म्हणून काय त्या निष्फळ झाल्या ? २ आपल्या शरीराचे व आपले नाते तसेच असते. तेवढाच त्याच्या क्रियाचा व आपल्या नात्याचा संबंध असतो. ३
६९२ नव्हे शब्द एक देशी । सांडी गविशी कोणाला ॥ १ ॥ जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ २ ॥ मोकलिलें जावें बाणें । भाता जेणें वाहिलें ॥ ३ ॥ आतां येथें केंचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गविशी-सापडून देणारा, सिका-शिक्का. अर्थ :- एकाच अर्थाला सोडून देणारा किंवा सापडून देणारा असा माझा शब्द एकदेशी नाही. १ खरे म्हणजे माझी वाणी सर्वव्यापक असून विश्वंभरासही भरून राहिली आहे. २ ज्याने बाणांचा भाता खांदयावर वागविला आहे, त्याच्याकडून सुटलेले बाण हवे तिकडे जाऊ शकतात. ३ आता येथे नुसत्या तुकारामाचे बोल तुम्ही समजू नयेत. त्यावर स्वामीचा, पांडुरंगाचा शिक्का मारल्यामुळे ते माझे आहेत असे नाही. ४
६९३ गायनाचे रंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥ १ ॥ हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ २ ॥ अंगीं प्रेमाचें भरतें¹ । नाहीं उतार चढतें ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खाणी-खाण. अर्थ :- देवा, तुझे गुणगान ज्यात आहे, असे संगीत गायन फार श्रेष्ठ असते. त्याच्या रंगात अद्भुत शक्तीचा निवास असतो. १ आणि देवा, हे तर तुमचेच देणे असल्यामुळे अशी सेवा तुम्ही आमच्याकडून नेहमी घ्यावी. २ ज्या सेवेत प्रभू प्रेमाचे भरते असते, त्यात कधी चढउतार असू शकत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरीचे चिंतन करणारी ही वाणी, संगीतवाणी अमृताची मोठी खाणच होय. ४ १ भाते.