सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 386, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३५० • सार्थ तुकारामगाथा ६९४ माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥ १ ॥ देवा अभिमान नको । माझे ठायीं देऊं सको ॥ २ ॥ देशीं चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥ ३ ॥ हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मवितें-मोजने, धणी-मालक. अर्थ - धान्याचे माप उगाचच म्हणत असते की, मी धान्य मोजते; पण खरी गोष्ट अशी आहे की, मोजणारा जो मालक आहे तोच ते माप भरीव असतो व रिकामे करीत असतो. १ देवा, माझ्या ठिकाणी असला अभिमान नको २ ज्या नाण्यावर राजाचा शिक्का आहे, तेच त्या देशात चालते शिक्याशिवाय असणाऱ्या खोट्याख्या नाण्याला कोण विचारणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे, त्याचीच थोरवी जिकडे तिकडे असते. ४ ६९५ कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ १ ॥ नेलें वाऱ्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ २ ॥ कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥ ३ ॥ तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसले भय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निरसले-सपले. अर्थ :- माझ्या या विठ्ठलाचे वैभव देशोदेशी सांगण्यासाठी कोण उपदेश करायला गेले होते ? १ माझा मायबाप जो विठ्ठल, त्याच्याच कृपेने वाऱ्याबरोबरच त्याचे नाम सर्व देशभर पसरून राहिले २ माझी वाणी हा उपदेश करीत आहे, तो तरी कुणाच्या सत्तेवर ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच निश्चयामुळे माझे भय दूर झाले आहे. ४ ६९६ सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥ १ ॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । घरें पारखुन बाधा गांठी ॥ २ ॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥ ३ ॥ तुका म्हणे चाली जाली चहूं देशीं । उतरला कसीं खरा माल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाली-चलती अर्थ - सगळ्यांच्या पायाशी माझीही एक विनंती मस्तक चरणावर ठेवून करीत आहे १ अहो श्रोतेहो, व वक्त्यांनो, सर्व लोकहो, कोणतीही गोष्ट नीट पारखून घ्या व आपल्या संग्रही ठेवा २ मी परमार्थविचाराचे हे भांडार खुले केले आहे, पण हा सर्व माल त्या परमेश्वराचा असून मी फक्त ओझे वाहणारा हमाल आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मालाची चांगली चलती झाल्यामुळे, याची प्रसिद्धी चारी देशांना होऊन हा ईश्वराच्या नामरूपाचा माल चांगला कसांत उतरला आहे ४ विवरण :-तुकाराम महाराजांचा हा एक अतिशय प्रसिद्ध अभंग असून, त्यांतील मी देवाचा केवळ भारवाही हमाल आहे, हे परमार्थविचाराचे धन त्याचेच असून मी फक्त भांडार चालविणारा सेवक आहे, ही भावना त्यांच्या इतर अभंगांतूनही प्रकट झाली आहे तुकोबा स्वत वाण्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे भांडार फोडणे, माल वाहून नेणे, तो कसांस उतरणे, या शब्दप्रयोगाची त्यांना चांगलीच अनुभूती आहे ईश्वराच्या घरचे, श्रेष्ठ तत्त्वाचे भांडार आपल्या हाती आले, याचा सार्थ अभिमान कधी कधी त्यांनी प्रकट केला आहे 'भांडाराची किल्ली माझे हातीं आहे। पाहिजे तो वाग तेथें' असे बुवानी आणखी एका ठिकाणी म्हटले आहे