सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 387, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३५१ ६९७ कोण त्याचा पार पायला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥ १ ॥ अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्याही खुंटलिया ॥ २ ॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तद्वरास अनेक किती ॥ ३ ॥ दाविलें अनंतें अर्जुनासि पोटां । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥ ४ ॥ तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-अंत, सीमा. अर्थ :- या विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभराचा अंत कुणासही लागण्यासारखा नाही. कितीही त्याचा शोध घेतला तरी त्याचा ठाव सापडत नाही. १ तो अणुरेणूइतका सूक्ष्म असून त्याच्या विस्तारलेल्या स्थूलपणास तर सीमाच नाही. वेदश्रुतीही त्याचा शोध घेता घेता, 'नेति नेति...असा नाही, असा नाही' म्हणून खुंटल्या आहेत. २ हे विश्व तरी केवढे आहे ? फळातल्या कीटकास वाटते, फळाएवढेच सीमित आकाश. पण अशी फळे त्या झाडास कितीतरी असतात. झाडे कितीतरी असतात आणि किडेही कितीतरी असतात. ३ या विश्वात पसारा केवढा असतो, हे त्या श्रीकृष्णानें अर्जुनास दाखवून आपल्या पोटात अनेक सृष्टी, अनेक कृष्ण, अनेक लोक याचे स्थान कसे आहे हे स्पष्ट केले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हांस जर या अनंत विश्वाचा अर्थ समजावून घ्यायचा असेल तर संतांची संगत धरा. त्याचा आश्रय घ्याल तरच तुमचा जीव वाचेल. ५ ६९८ जें जें कांहीं करितों देवा । तें तें सेवा समर्पे ॥ १ ॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ २ ॥ आम्ही दुजें नेणों कोणा । हेंचि मना मन साक्ष ॥ ३ ॥ तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सर्वात्मना-सर्वांच्या मनांत असणाऱ्या. अर्थ :- देवा, मी जे जे काही करीत आहे, ते ते सर्व तुमच्या सेवेसाठी समर्पित करीन. १ नारायणा, आता तुमच्या-माझ्यात भेद नाही. देवा, तुझाच वास सर्वांच्या मनांत असतो ना ? २ देवा, तुम्हाशिवाय आम्ही दुसऱ्या कुणासच जाणीत नाही. हीच साक्ष आमची आमच्या मनास आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जगन्नाथा, मी जे हे सर्व म्हणत आहे ते काही व्यर्थ नाही. ४ ६९९ स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥ १ ॥ परी हे वंखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ २ ॥ रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी संध वाचा जाली नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वंखरी-वाणी, साचा-खरोखर. अर्थ :- देवा, तुमची स्तुती करायला जावे तर ती समर्थ अशा वेदाकडूनही होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत माझे काय विचारावे ? १ पण ही माझी वाणी देवा, तुमच्या सुखासाठी व नामाच्या गोडीने गोडावलेली आहे. माझी जिव्हा तुमच्या नामामृताच्या रसाचीच इच्छा करीत आहे. २ देवा, तुमचे रूपवर्णन करण्यास पुरेल एवढी तरी मला बुद्धी आहे कुठे? कारण आपल्या स्वरूपाच्या एका केसाच्या अग्रावर हजारो ब्रह्मांडांची घडामोडी होत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा या अचाट स्वरूपाचा तूच एक खरोखर आहेस, असे वर्णन तर आजपर्यंत कुणीही केलेले नाही. ४ ७०० तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥ १ ॥ सहस्रमुखें शेष शिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ २ ॥