सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 393, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३५७ असताना आपले अंग किंवा पायही कधी भिजू देत नाही. २ यापूर्वी या नावेच्या साहाय्याने पुष्कळ थोर साधुसंत संसारसागर तरून गेले, पैलतीरावर कित्येकजण पोचले. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्वरेने आपणही त्यांच्या मागे जाऊ या. ४ ७१७ नाहीं साजत हा मोठा । मज अळंकार खोटा ॥ १ ॥ असें तुमचा रजरेण । संतां पायांची वाहाण ॥ २ ॥ नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तिभाव करीं देखों ॥ ३ ॥ नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥ ४ ॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा तें काई ॥ ५ ॥ कांहीं नव्हे तुका । पायां पडेन¹ हें ऐका ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- साजत-शोभत, रजरेण-धुळीचा कण. अर्थ :- मला फार मोठा संत समजू नका. मला हा एवढा मोठा दागिना शोभून दिसत नाही हो. कारण हा गौरवाचा अलंकारच खोटा आहे. १ मी तुमच्याच पायांवरील धूळीचा एक कण असून संतांच्या पायीची वाहाण आहे. २ मला त्या स्वस्वरूपाची ओळखही नसून भक्तिभावाविषयी म्हणाल तर, मी तो दुसऱ्यांचा पाहिला आहे फक्त. त्याप्रमाणे मी करतो. ३ शून्याच्या आकाराची किंवा क्षराक्षर स्वरूपाची ओळखसुद्धा माझी नाही. ४ आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, यासंबंधीचा काहीही विवेक मी कधी केलेला नाही. ५ माझ्या ठिकाणी कसलाही अधिकार नसून, संतांच्या पाया पडणे हे मात्र मी जाणतो, ते नीट ऐका. ६ ७१८ सत्य साच खरें । नाम विठोबाचें वरें ॥ १ ॥ जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ति जेणें ॥ २ ॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥ ३ ॥ तुका म्हणे भोळा । जिंकूं जाणे कळीकाळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- उठाउठी-त्वरित. अर्थ :- विठ्ठलाचे नाव हेच एक खरे; हे त्रिवार सत्य आहे. १ या नावाचा आश्रय केल्यानेच सर्व बंधने तुटतात. यामुळे या लोकी व परलोकीही कीर्ती फार मोठी वाढते. २ ज्याच्या ठिकाणी भाव असतो, त्याला याच्या प्राप्तीचा लाभ त्वरित होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या भोळ्या भावाने ईश्वरास शरण जाणारा प्रत्यक्ष काळासही जिंकतो. ४ ७१९ सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥ १ ॥ आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ २ ॥ आला भोग अंगा । न लवूं उसीर त्या त्यागा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विकल्प-संशय. अर्थ:- जी गोष्ट सत्य आहे तीच आवडते. वृथा संशय धरल्यास भाव मात्र नाहीसा होतो. १ देवा, तुमच्या कृपाप्रसादाने शुद्ध सोने कोणते, अशुद्ध कोणते, हे आम्ही नीट जाणतो. २ जो भोग दैवयोगाने प्राप्त होईल, त्याचा त्याग करण्यासाठी आम्ही उशीर कधी करणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची सेवा हेच खरेखोटे जाणण्याचे एक प्रभावी असे अंजन आहे. ४ १ पडणे