भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 75, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 75

सार्थ तुकारामगाथा ४९ १०२ भक्ताविण देवा । कैंचे रूप घडे सेवा ॥ १ ॥ शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ॥ २ ॥ देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥ ३ ॥ तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - येरयेरा-एकमेकाना, निष्कामता-निष्काम भक्ती, स्नेहजाल-एकमेकात गुंतलेले प्रेमाचे धागे अर्थ - भक्त असल्याखेरीज देवाला त्याचे रूप कसे प्राप्त होईल ? भक्त आहे म्हणून देव आहे १ सोन्याच्या कोदणात हिरा असतो म्हणून त्याची शोभा ना ? हिरा व सोने यानी एकमेकास सुशोभित केले आहे एकट्याची काय किंमत ? २ देव जर नसेल तर भक्त मग निष्काम भक्ती तरी कुणाची करणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, नात्याची ही नाजूक सुतामृत किंवा प्रेमाचे हे नाजूक धागे आई व मूल याच्या नात्यातील स्नेहाप्रमाणे आहेत आईमुळे मूल आहे व मुलामुळे आईस आईपणा आहे ४ विवरण - श्रेष्ठ भक्तीच्या एका विशेष अवस्थेचा फार मार्मिक संदर्भ या अभंगात आहे जीवाने शिवाची, आत्म्याने परमात्म्याची सेवा किंवा भक्ती करायची त्याला वंदन करायचे त्याच्याजवळ करुणा भाकायची, त्याची कृपा संपादन करायची हे ठीकच, पण भक्तीच्या पुढच्या अवस्थेत एक प्रश्न निर्माण होतो, तो असा की, भक्तानेच, सेवकानेच, जीवानेच का भक्ती करायची ? जीवास जशी शिवाची ओढ असते, तशीच शिवालाही असते ना ? पर- मेश्वरासही आपल्या भक्ताची ओढ असते ना ? काही कासावीस होतो ना ? खरं म्हणजे असंच व्हावयास हवे त्याला एकाकी करमत नव्हते, म्हणून तो हे चराचर विश्व प्रसवला तो या जगाची माता-पिता आहे मूलस्थानी तो व व्यक्त झालेले विश्व एकच होते पण बीजाचा विस्तार झाला, एकाच सुवर्णाचे नाना अलंकार झाले, एकाच पाण्यावर नाना लहरी उठल्या, म्हणून काही भेद मानावा असे नाही मग भेद नाही असे ठरल्यावर कोण कुणाचे स्तवन करणार ? भक्तास जसा ईश्वराचा ध्यास, तसा ईश्वरासही भक्ताचे अनुसंधान असतेच ना ? या उच्च भूमिकेवरून तुकारामाच्या याही अभंगातून विचार प्रगट झाले आहेत या अभंगात एक अति गोड भाव असा व्यक्त झाला आहे की मी भक्त आहे म्हणून देवा, तुला देवपण आहे बाळ आहे म्हणून स्त्रीस आईपण प्राप्त झाले आहे 'तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते-प्रत्यक्ष ब्रह्मदेवासही आम्हीच जन्म दिला आहे' या तुकाराम महाराजांच्या उक्तीमधील सामर्थ्य फार मोठे आहे दुसऱ्या एका ठिकाणी बुवांनी म्हटलं आहे 'जरि मी नव्हतो पतित । तरि तू पावन कैंचा तेथ ?' मी येथे पतित असल्यामुळे विठ्ठला, तू पतितपावन म्हणून लौकिकवान झालास, असा प्रेमाच्या भांडणाचा लडिवाळ मुद्दा उपस्थित केला आहे लोखंड आहे म्हणून परिसाला महत्त्व मी भक्त आहे म्हणून देवा तुमचे महिमान असा भावार्थ दोघेही परस्परांना पोषक आहेत १०३ विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥ १ ॥ ऐसा भक्ताचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ २ ॥ निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे आले । रूपा अव्यक्त चांगले ॥ ४ ॥

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 75, कुल 611 में से · BharatKosha