भारतकोश
संग्रह पर लौटें

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज डॉ. प्र. न. देशपांडे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

प्रथमावृत्ती : १५ ऑगस्ट २००२ प्रकाशक : सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत, १७२, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर, मुंबई ४०० ०१४ © प्रकाशकाधीन मुद्रक : लोकवाङ्मय गृह, भूपेश गुप्ता भवन, ८५, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ मुखपृष्ठ : राजा बडसल किंमत : रु. ४८/- या पुस्तकात व्यक्त केलेली मते स्वतः लेखकाची असून या मतांशी साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र शासन सहमत असेलच असे नाही.

निवेदन लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते. शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा-सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे. अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली; न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्मांना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.” हा या चरित्रग्रंथाचा डॉ. प्र. न. देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचे स्पष्ट होते. डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत. रा. रं. बोराडे मुंबई अध्यक्ष दि. १६ जुलै, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

अनुक्रम १. शिवपूर्वकाल १ २. शहाजीची कामगिरी ८ ३. शिवरायाचा उदय १६ ४. स्वराज्याचा विस्तार २१ ५. बलाढ्य शत्रूवर मात ३२ ६. जयसिंगाची स्वारी ४० ७. शिवाजी आणि औरंगजेब ४८ ८. चढाईचे राजकारण ५६ ९. मुगलांची पिछेहाट ६६ १०. शिवराज्याभिषेक ७२ ११. कर्नाटक स्वारी ८० १२. सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९० १३. शिवरायाच्या कार्याचे स्वरूप १०६

१. शिवपूर्वकाल प्रास्तविक मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये ‘मऱ्हाष्ट्र राज्याची’ स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली. कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्यांप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापना केले नव्हते. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद्द शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जातीधर्माच्या लोकांना, साधुसंतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येयधोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठ्यांची अस्मिता जागृती केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांमध्ये संघटन निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राजवटींना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपति शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पटते. सतराव्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेला अत्यंत प्रतिकूल होती. राजकीय परिस्थिती तेराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. १

उत्तरेमध्ये सुलतानशाही तेराव्या शतकाच्या प्रारंभी प्रस्थापित झाली असली तरी दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता. इ. स. १२९५ मध्ये दिल्लीचा सुलातान जलालउद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव करून रामदेवरावास आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपला चुलता जलालउद्दीन याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकाविली. खिलजीच्या स्वारीमुळे दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला. इ. स. १३१७ मध्ये मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला. या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली त्यानंतर काही वर्षांतच म्हणजे इ. स. १३२४ मध्ये दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. महंमद तघलकाच्या काळात दक्षिणेतील मथुरेपर्यंतचा भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला. परंतु तघलकांचे वर्चस्व दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही. इ.स. १३४७ मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट होता. एकसंधी बहमनी राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकून राहिले. याकाळात दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने (इ.स. १३३६ ते १५६५) बहामनीशी झुंज देऊन आपली संस्कृती संपन्न स्थानिक सत्ता टिकवून धरली परंतु महाराष्ट्रात मात्र बहामनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते. प्राचीन वैभव कोसळून गेले होते. चैतन्य आटून गेले होते. बहामनींची राजकीय पकड फार घट्ट असल्यामुळे स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नगण्य स्थान होते. अशा परिस्थितीत इ.स. १४९० च्या सुमारास एकसंधी बहमनी राज्याला तडा गेला आणि त्याची पाच शकले झाली. पाच स्वतंत्र शाही राजवटी प्रस्थापित झाल्या. निजामशाही (अहमदनगर), आदिलशाही (विजापूर), कुतुबशाही (गोवळकोंडा), बरीदशाही (बिदर) आणि इमादशाही (वऱ्हाड). दक्षिणेत एकसंधी बहमनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारूकी घराण्याची स्वतंत्र राजवट होती. ही राजवट इ.स. १६०१ पर्यंत म्हणजे मुगलांचा दक्षिण भारतात प्रवेश होईपर्यंत टिकून राहिली. बहमनी राज्याचे विभाजन होऊन ज्या पाच शाही राजवटी निर्माण झाल्या त्यांचे आपापसात सतत संघर्ष चालू होते. ह्या संघर्षात इमादशाही हे राज्य नष्ट होऊन गेले. दक्षिण भारतात शाही राजवटींचे हे संघर्ष चालू असतानाच उत्तर भारतामध्ये इ.स. १५२६ मध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा म्हणजे लोदी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर २ छत्रपती शिवाजी महाराज

प्रस्थापित केली, दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. त्याच सुमारास पोर्तुगीजांनी इ.स. १५१० मध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली, पोर्तुगीजांनंतर पुढे डच्च, इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्याकडून परवाने मिळवून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी वखारी घातल्या. आणि काही बंदरांवर घट्ट पकड निर्माण केली. अशाप्रकारे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल व पोर्तुगीज या सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. इ. स. १५६५ मध्ये आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली. दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालीकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली. या घटनेनंतर शाही राजवटीतील आपापसातील संघर्ष पुन्हा उफाळून आले. दरम्यान उत्तर भारतामध्ये मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते. सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राजवटींपुढे आव्हान निर्माण केले. अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इ.स. १६३६ मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतूबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढ्य राजसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या. सामाजिक परिस्थिती एकसंधी बहमनी साम्राज्याच्या कालखंडात (इ.स.१३४७ ते १४९०) दक्षिणेतील, विशेषतः महाराष्ट्रातील समाजजीवन तेजोहीन बनले होते. क्षात्रवृत्तीच्या मराठ्यांना बहमनी राजवटीत कोणतेही राजकीय स्थान मिळू शकले नाही. फारसी भाषा ही राजदरबारी भाषा असल्यामुळे व्यवहारामध्ये तिचा उपयोग सुरू झाला. फारसीबरोबर दखनी, हिंदी व उर्दू भाषेचे महत्त्व वाढले. शिक्षणव्यवस्था नसल्यामुळे सर्वसामान्य समाज निरक्षर राहिला या समाजामध्ये 'अज्ञान वाढले. अंधश्रद्धा वाढल्या. बहमनी राजवटीतील लोकांच्या धर्मश्रद्धा अत्यंत चिवट होत्या. चातुर्वर्ण्य, जाती, उपजाती यांचे प्राबल्य सर्व समाजावर होते. जातीयव्यवस्थेमुळे शिवपूर्वकाल ३

हिंदु समाज एकसंघी राहू शकला नाही. हलकी कामे करणाऱ्या जातींनी अस्पृश्य समजण्यात येऊ लागले. परिणामी हा समाज पूर्ण दरिद्री व अज्ञानी राहिला. स्पृश्य जातीकडून अस्पृश्य जातीवर अन्याय होत असे. त्यामुळे अस्पृश्यांचे जीवन अधिकच केविलवाणे झाले होते. जाती व्यवस्थेच्या या दुष्परिणामामुळे हिंदु धर्मियांचे संघटन होऊ शकले नाही. शस्त्र आणि शास्त्र यापासून बहुजन समाज वंचित राहिला. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. बालविवाह, विषमविवाह, सतीची चाल, विधवांना उपेक्षित स्थान, निरक्षरता, पुरुषजातीचे वर्चस्व यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झालेले होते. बहमनी राजवटीत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन फारसे बदलले नाही. परंपरागत गावकीचे अधिकार पाटील-कुलकर्णी आणि देशमुख-देशपांडे यांच्याकडे अबाधित राहिले होते. वतनदारांच्या दृष्टीने केवळ राज्यकर्ते बदलले होते, त्यांच्या अधिकारात कोणताही बदल झाला नव्हता. बहमनी राज्यकर्त्यांनी परंपरागत ग्रामीण जीवनात कसलाही हस्तक्षेप केला नाही. महसूल गोळा करण्याचे काम वतनदाराकडे ठेवणे त्यांना सोईचे वाटले. प्रांताचे अधिकारी आणि वरिष्ठ अंमलदार ही पदे मात्र विश्वासातील मुसलमानाकडे राहतील याची खबरदारी बहमनी राज्यकर्त्यांनी घेतली. लष्करामध्य स्थानिक हिंदूंना कसलेही स्थान नव्हते. एवढेच नव्हे तर दक्षिणेत स्थायिक झालेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये विशेष स्थान राहिले नाही. तुर्कस्थान,अरबस्थान, इराण या देशातून आलेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये स्थान मिळू लागले आणि त्यातूनच पुढे परदेशी मुसलमान आणि स्थानिक मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष पेटू लागला. बहमनी राज्यकर्त्यांची महाराष्ट्रातील समाज जीवनावर घट्ट पकड असतांनाही, वारकरी संप्रदायाचे भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडविण्याचे आणि समाज संघटन करण्याचे कार्य अविरतपणे चालू होते. संत भानुदास, दामाजी, कान्होपात्रा, सेना न्हावी यांसारख्या संतांनी ज्ञानेश्वर नामदेवापासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे चालू ठेवली. वारकरी संप्रदायाचे कार्य अतिशय मोलाचे असून त्यामुळे समाजजीवनात स्थैर्य कायम राहिले. एकसंघी बहमनी राजवटीत सूफी पंथाचे अनेक साधु दक्षिण भारतात स्थायिक झाले. राजाश्रयाच्या आधाराने त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. परंतु हा प्रसार विशेषतः शहरी भागापुरता मर्यादित राहिला. शाही राजवटीतील महाराष्ट्र मागे सांगितल्याप्रमाणे पंधराव्या शतकाच्या अखेरीस एकसंघी बहमनी ४ छत्रपती शिवाजी महाराज

साम्राज्याची शकले होऊन पाच शाही राजवटी उदयाला आल्या त्या म्हणजे बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि अहमदनगरची निजामशाही. यापैकी दोन शाही राजवटी स्थानिक मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. उरलेल्या तीन राजवटी पैकी एक राजवट जॉर्जियामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी आणि दोन राजवटी तुर्कस्थानमधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. शेवटच्या दोन शाही राजवटीचे संस्थापक हे मूलतः हिंदू होते. आणि स्थानिक जनतेला त्यांचेविषयी आपुलकी वाटत होती. या पाचही राजवटीत आपापसात संघर्ष करीत राहिल्या आणि अशा या संघर्षमय काळात सोळाव्या शतकाच्या अखेरीस बलाढ्य मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केला. तेव्हा आपापसात लढणाऱ्या शाही राजवटींना आणखी एका बलाढ्य शत्रूशी लढा देणे क्रमप्राप्त झाले. आपापले सामर्थ्य वाढविण्यासाठी शाही राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदूंची मदत घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच महाराष्ट्रात मराठ्यांचा उदय झाला. शाही राज्यकर्त्यांच्या लष्करातही मराठ्यांना स्थान प्राप्त झाले. इ.स. १६२६ मध्ये आदिलशहाने बिदरची बरीदशाही खालसा केली. त्यापूर्वीच इ. स. १५७४ मध्ये मुर्तजा निजामशाह याने वऱ्हाडची इमादशाही नष्ट करून तो प्रदेश आपल्या राज्यास जोडला होता. अशाप्रकारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारतात आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या तीन शाही राजवटी अस्तित्वात होत्या. मुघलांशी या राजवटींचे संघर्ष चालू होते. मराठ्यांच्या उदय आणि उत्कर्ष होण्यास ही परिस्थिती कारणीभूत ठरली. मराठ्यांचा उदय बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदूंना शाही राजवटीत काही प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केला आहेच. मात्र सोळाव्या शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदूंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते. ‘बुरहाने मासीर’ या समकालीन ग्रंथावरून दलपतराय, कान्हु नरसी, साबाजी इत्यादी हिंदु व्यक्तींनी शाही राजवटीत अधिकारपदे भूषविली होती असे दिसून येते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी स्थानिक हिंदूंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभारले. गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अतिशय निष्णात होते. आदिलशाही शिवपूर्वकाल ५

प्रमाणे निजामशाहीही मराठ्यांना लष्करात प्रवेशतर मिळालाच, पण त्याचबरोबर अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या. प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना शाही राजवटीत मर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला. आदिलशाही मध्ये चंद्रराव मोरे, झुंझारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक-निंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला. निजामशाही मध्ये जाधवराव आणि भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो. अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे वऱ्हाडातील सिंदखेड या गावचे होते. देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधीत होते असे म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते. त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची पत्नी आणि शिवाजीची आई होय. निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्त्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे. या घराण्याचा संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा इतिहासकारांचा तर्क आहे. मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते. या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ.स.१४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष 'राणा' ऐवजी 'राजा' ही पदवी धारण करू लागले. बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ या गावचे पाटील होते. निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे विशेष महत्त्व वाढले, बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची जहागीर बाबाजी भोसले यास मिळाली. पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही व निजामशाही यांचा सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजीजवळ असल्यामुळे निजामशहाने त्याला ही जहागिरी दिली असावी. बाबाजी हा चार-पाच गावाचा मोकदम आणि दोन गावाचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्चितच चांगली होती. बाबाजीची दोन मुले-विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले. इ.स.१५८८-८९ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजविला. बुऱ्हाण निजामशहाने या दोन्हीही भावांना दीड ६ छत्रपती शिवाजी महाराज

दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांचेकडे वहिवाटीस आला. या सुमारास मालोजीचे वय केवळ चौदा-पंधरा वर्षांचे होते. इ.स. १५९१ ते १५९५ या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता. या संघर्षात निजामशहाच्या वतीने मालोजीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला. त्याबद्दल बुऱ्हाण निजामशहाने त्याचा सरंजाम पाच हजारपर्यंत वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला. बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले. मलिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा निर्माण झाल्या. मूर्तजा निजामशहाला मलिकअंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले. म्हणून त्याने मिआन राजू वर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले. त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गढीमध्ये तो वास्तव्य करून होता. मिआन राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला गेला. त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ पाच-सहा वर्षांचा होता. मालोजीच्या मागे विठोजीने १६११ पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली. मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते. तिला शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती. त्या मुलांच्या नावासंबंधी बखरीत दिलेल्या कथांना कोणताही आधार नाही. □□□ शिवपूर्वकाल ७

२. शहाजीची कामगिरी ज्यावेळी जहागिरीची जबाबदारी आली त्यावेळी शहाजी केवळ १२ वर्षांचा होता. आपल्या कर्तबगारीवर शहाजीने मलिक अंबरचा विश्वास संपादन केला आणि काही वर्षांतच तो मातब्बर सरदार झाला. त्याचे वडील मालोजी व चुलते विठोजी हे दोघेही पराक्रमी होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा मालोजीने जिर्णोध्दार केला तसेच शिखर शिंगणापूर येथे यात्रेकरूंच्या सोईसाठी एक तलाव बांधला. औरंगाबाद मध्ये मालपूरा आणि विठपुरा अशा दोन पेठा आहेत. ही नावे मालोजी विठोजी यांच्यावरून पडली असावीत असे मानले जाते. श्रीगोंद्याच्या शेख महंमद या संतास मालोजीने बारा बिघे बागायती जमीन दान म्हणून दिली होती. श्रीगोंदयास जी पेठ मालोजीने बसविली तिला मकरंदपुरा असे म्हणतात. मालोजीस मकरंद अशी पदवी मिळाली होती हे ऐतिहासिक पुराव्यावरून स्पष्ट होते. शहाजीचा उत्कर्ष विठोजी भोसल्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीवर आली. मालोजीची पंचहजारी शहाजीला मिळाली. लहान वयातही ही जबाबदारी शिरी घेण्याची कुवत शहाजीमध्ये होती. शहाजीची ही कुवत पाहून निजामशाहीतील सप्तहजारी सरदार लखुजी जाधवराव याने आपली कन्या जिजाबाई हिचा विवाह शहाजीबरोबर केला. या संदर्भात बखरीत दिलेली रंगपंचमीच्या सणाची कथा निराधार असून शहाजीच्या विवाहाप्रसंगी मालोजी हयात नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. शहाजीचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. इ.स.१६२० पासून शहाजीच्या कर्तबगारीला बहर आलेला दिसून येतो. मलिक अंबरचे कर्तृत्व बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर ८

पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रम गाजवून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून १९ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगर जिंकून घेतले. राजधानीचे शहर अहमदनगर हातचे गेल्यानंतरही मलिक अंबरने धीर सोडला नाही. मूर्तजा निजामशहा दुसरा याला मराठवाड्यातील परिंड्याच्या किल्ल्यात सुरक्षित ठेऊन दौलताबादजवळ असलेल्या खडकी या गावी मलिक अंबरने आपली नवी राजधानी उभारली. हे खडकी गाव पुढे औरंगाबाद या नावाने प्रसिद्धीस आले. निजामशाही वाचविण्याचे प्रयत्न चालू असतांना मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असलेल्या मिआन राजूने मलिक अंबरला सर्वतोपरी सहाय्य केले. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेल्या जहांगीरने निजामशाहीचा उच्छेद करण्यासाठी शहानवाजखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठविले. शहानवाजखानाने रोशन गावला मलिक अंबरचा पराभव करून फेब्रुवारी १६१६ मध्ये खडकी हे गाव लुटले. मलिक अंबरने मुघलाशी तह करून बालाघाटचा प्रदेश जहांगीरला दिला. अशाप्रकारे एक मोठा पराभव मलिक अंबरला पत्करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत लखुजी जाधवरावाने निजामशाही सोडली आणि तोही मुघलांना जाऊन मिळाला. अशा या आणीबाणीच्या काळामध्ये मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. भातवडीची लढाई अकबरानंतर जहागीर मुघल सम्राट झाल्यावर त्याने दक्षिण भारतात राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले. लखुजी जाधवराव मुघलांना मिळाल्यामुळे निजामशाहीची बाजू लंगडी पडली होती. या परिस्थितीची फायदा घेऊन विजापूरच्या आदिलशहाला जहांगीरने निजामाविरुद्ध चिथावले. त्यामुळे मलिकअंबर अडचणीत येईल असा जहांगीरचा कयास होता. परंतु धूर्त मलिक अंबरने गोवळकोंड्याच्या कुतुबशहाबरोबर तह करून आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर थेट बीदरपर्यंत चढाई करून आदिलशाही फौजेचा मोठा पराभव केला. त्यानंतर मलिक अंबरने थेट विजापूरपर्यंत मोहिम काढून आदिलशहाच्या राजधानीलाच वेढा दिला. परंतु मुघलांची मदत मिळाल्यामुळे आदिलशहाने निकराचा लढा दिला. तेव्हा नाईलाज होऊन मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठविला आणि अहमदनगरकडे त्याने प्रयाण केले. या संधीचा फायदा घेऊन आदिलशहा व मुघल यांच्या फौजांनी मलिक अंबरला भातवडीजवळ गाठले. शहाजीची कामगिरी ९

१. शिवजन्म, बालपन व रोहिडेश्वर स्वराज्य प्रतिज्ञा

ऑक्टोबर १६२४ मध्ये मोठा रणसंग्राम होऊन मालिकअंबरने आदिलशाही व मुघली फौजांना पराभव केला. या लढाईत मालिकअंबरप्रमाणे शहाजीनेही मोठा पराक्रम गाजविला. शहाजीचा भाऊ शरीफजी यानेही या लढाईत मोठा पराक्रम गाजविला. या लढाईत त्याला वीरमरण आले. भातवडीच्या लढाईत मुघल आणि आदिलशहा या दोघांनाही माघार घ्यावी लागली. भातवडीच्या अपूर्व यशानंतर निजामशाहीला उर्जितावस्था येण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु मलिक अंबर व शहाजी यांच्यामध्ये अचानक बेबनाव निर्माण झाला. परिणामी शहाजीने निजामशाही सोडून आदिलशाहीचा आश्रय घेतला. त्यामुळे मलिक अंबर व शहाजी यांच्यात प्रत्यक्ष संघर्षास सुरुवात झाली. तथापि या संघर्षात मलिकअंबरला यश मिळू शकले नाही. त्यामुळे विजापूरच्या दरबारात शहाजीचे वर्चस्व वाढले. शहाजीमुळे अनेक मातब्बर मराठ्यांना आदिलशाहीच्या दरबारात मानाच्या जागा मिळाल्या. स्वतंत्र वृत्तीचा शहाजी १६२७ मध्ये दक्षिणेतील आणि उत्तरेतील राजकारणात दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. १४ मे १६२७ रोजी मलिक अंबरचा मृत्यू झाला व त्यामुळे निजामशाहीची जबरदस्त हानी झाली. त्याचप्रमाणे २८ ऑक्टोबर १६२७ रोजी मुघल सम्राट जहांगीर मृत्यू पावल्यामुळे दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान विराजमान झाला. या दोन घटनांचा उत्तरेतील व दक्षिणेतील राजकारणावर दूरगामी परिणाम झाला. शहाजी जरी आदिलशाहीमध्ये मानाचे स्थान मिळवून होता, तरीपण अंतर्यामी निजामशाहीची त्याला ओढ होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाही पोरकी झालेली पाहून शहाजीचे मन निजामशाहीकडे ओढ घेऊ लागले. अशा परिस्थितीत १२ सप्टेंबर १६२७ रोजी इब्राहिम आदिलशहा मृत्यू पावला. त्याच्या जागी आलेल्या मुहम्मदशहाशी शहाजीचे जमले नाही. त्यामुळे स्वतंत्र वृत्तीच्या शहाजीने १६२८ च्या पावसाळ्यापूर्वी आदिलशाही सोडली आणि निजामशाहीत प्रवेश केला. या सुमारास मुघलांची चाकरी सोडून लखुजी जाधवराव हाही निजामशाहीत दाखल झाला. वास्तविक पहाता लखुजी जाधवराव व शहाजी भोसले हे दोन बलाढ्य सरदार निजामशाहीस मिळाल्यामुळे या राजवटीचा उत्कर्ष होण्याची मोठी संधी प्राप्त झाली होती. परंतु प्रत्यक्ष निजामशाही मध्ये अंतर्गत कटकरी, हेवेदावे इतके वाढले होते की शाही- दरबारात संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्ष निजामशहाला लखुजी १० छत्रपती शिवाजी महाराज

जाधवारांविषयी संशय व तिरस्कार वाटू लागला. त्यातूनच २५ जुलै १६२९ रोजी लखुजी जाधवराव, त्याची २ मुले अचलोजी व रघोजी आणि नातू बसवंत यांच्यावर निजामशहाने मारेकरी घातले आणि भर दरबारात हत्याकांड घडून आले. हा भीषण प्रकार पाहिल्यानंतर शहाजीला निजामशाहीचा वीट आला आणि त्याने निजामशाही सोडून मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शहाजीचा मनोदय ओळखून बादशहा शहाजहानने शहाजीस पंचहजारी देऊ केली. त्याचा मुलगा संभाजी यालाही दोन हजारी व चुलतभाऊ मालोजी याला दोन हजारी असा सरंजाम देण्याचे मान्य केले अशाप्रकारे शहाजी फिरून मुघलांकडे आला. मुघलांकडे आल्यावर बंडखोर पठाण सरदार दर्याखान याचे पारिपत्य करण्याची जबाबदारी शहाजीवर शहाजहानने सोपविली. या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई प्रसूत होऊन शिवाजीचा जन्म झाला. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत शहाजीला शिवनेरीवर जाण्याची सवड मिळाली नाही. पावसाळा सुरू झाल्यावर शहाजी शिवनेरीला गेला आणि पुत्रमुख त्याने पाहिले. इ. स. १६३० मध्ये महाराष्ट्रात विशेषतः बालाघाट प्रदेशात भीषण स्वरूपाचा दुष्काळ पडला. समकालीन साहित्यामधून या भीषण दुष्काळाची वर्णन आढळतात. 'बादशहानामा' या ग्रंथात या भीषण दुष्काळाचे तपशीलाने वर्णन आलेले आहे. शहाजी मुघलांकडे गेल्यानंतर निजामशाही जवळजवळ मोडकळीस आली. मलिक अंबरचा मुलगा फतेखान याने निजामशाही सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. उलट कटकारस्थानांना कंटाळून ऑक्टोबर १६३१ मध्ये फतेखानाने निजामशहाला ठार मारले. त्यामुळे निजामशाहीची अवस्था मोठी दयनीय झाली. आता निजामशाही मुघलांच्या आहारी जाणार हे शहाजीच्या लक्षात आले आणि म्हणून कोकणात असलेला निजामशहाचा एक वारस शोधून काढून शहाजीने त्याची प्रतिष्ठापना जुन्नर येथे केली. निजामशाही वाचविण्याचे त्याने प्रयत्न सुरू केले. शहाजीच्या या हालचाली मुघलांना धोकादायक वाटल्या. तरीपण आपण मुघलांशी एकनिष्ठ आहोत असे शहाजी वरकरणी भासवत होता. शहाजीचा स्वतंत्र लढा मुघलांकडे असतांना शहाजीने नाशिक, त्र्यंबक, संगमनेर व जुन्नर हे परगणे आपल्या वर्चस्वाखाली आणून कोकण पर्यंतचा प्रदेश हुकमतीखाली आणला. त्यानंतर शहाजीने स्वातंत्र्य पुकारले. बादशहानाम्यामध्ये असा उल्लेख आहे शहाजीची कामगिरी ११

की, “शहाजीने निजामशहाचा एक नातलग हाती धरून त्याला निजामशाहीतील एका बळकट गडावर नेऊन ठेवले आणि स्वातंत्र्य पुकारले.” यावरून असे स्पष्ट दिसते की नाममात्र बादशहा गादीवर बसवून शहाजीला स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा असावी. स्वतंत्र झाल्यावर आणि आपली बाजू बळकट झाल्यावर महत्त्वाकांक्षी शहाजीची नजर दौलताबाद किल्ल्याकडे वळली. कारण हा किल्ला ताब्यात आला तर शहाजीचा मोठा फायदा होणार होता. आपल्या पूर्वजांचे मूळ गाव असलेले वेरूळ आणि मराठवाड्याचा बराचसा प्रदेश शहाजीच्या वर्चस्वाखाली येणे शक्य होते. यावेळी दौलताबादचा किल्ला फतेखानाच्या ताब्यात होता. आदिलशाहाच्या मदतीने दौलताबादचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू केला. शहाजीच्या हालचाली पाहून फतेखानाने मुघल सरदार महाबतखान यास दौलताबादचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी बोलाविले. महाबतखानाने जून १६३३ मध्ये दौलताबादचा किल्ला जिंकला. फतेखानाने शरणागती पत्करली. निजामशाहीचा नामधारी वारस मुघलांच्या ताब्यात आला. शहाजहानने या नामधारी वारसाची हुसेनशहाची रवानगी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरील तुरुंगात केली. अशाप्रकारे निजामशाही पूर्णपणे संकटात आली. तरीपण हताश न होता निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू ठेवला. शहाजीची ही झुंज जवळजवळ ३ वर्षे चालू होती. शेवटी प्रत्यक्ष शहाजहान बादशहाला शहाजीचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत यावे लागले. शेवटचा लढा दौलताबाद मुघलांच्या ताब्यात गेल्यावर जुन्नरच्या गडावर बंदोबस्तात ठेवलेल्या निजामशाहीच्या वारसास शहाजीने नगर जिल्ह्यातील पेमगड या ठिकाणी ठेवले. आदिलशाहाकडून मुरारपंत आणि मातब्बर सरदार रणदुल्लाखान शहाजीच्या मदतीसाठी आले. आदिलशाहा व शहाजी एकत्र आलेले पाहून शहाजहानला चिंता वाटू लागली. या सुमारास आदिलशाहीच्या दरबारातच सुंदोपसुंदी सुरू झाली. खवासखान आणि मुस्तफाखान या दोन सरदारांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यात खवासखानने आपल्या रक्षणासाठी उत्तरेतून शहाजहान बादशहाला बोलविले. जानेवारी १६३६ मध्ये शहाजहान नर्मदा ओलांडून दक्षिणेमध्ये आला. निजामशाही नष्ट करण्याचा त्याचा अंतस्थ हेतू होता. दक्षिणेत येताच त्याने कुतूबशहास सामोपचाराने आपल्याकडे वळविले. आदिलशाहाच्या १२ छत्रपती शिवाजी महाराज

वतीने रणदुल्लाखानाने मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पराभव झाला. अशाप्रकारे कुतूबशहा व आदिलशहा यांना नामोहरम करून शहाजहानने आपला मोहरा शहाजीकडे वळविला. ६ मे १६३६ रोजी शहाजहान व आदिलशहा यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण तह झाला. हा तह दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. या तहातील २ कलमे महत्त्वाची असून एका कलमाप्रमाणे आदिलशहा हा शहाजहानचा मांडलीक झाला. दुसऱ्या कलमाप्रमाणे निजामशाही खालसा करून ते राज्य मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घ्यावे असे ठरले. या तहामुळे शहाजीला आदिलशहाचा असलेला आधार तुटला. निजामशाही वाचविण्यासाठी आता दोन बलाढ्य शत्रूशी आपल्याला सामना द्यावा लागेल याची शहाजीला जाणीव झाली. ज्या रणदुल्लाखानाने शहाजीला मदत केली त्यालाच आदिलशहाने शहाजीविरुद्ध पाठविले. शहाजहानने खान झमान यास शहाजीविरुद्ध चालून जाण्यास सांगितले. अशा बिकट परिस्थितीतही निकराची झुंज देण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू केला. गनिमीकाव्याने लढण्यासाठी त्याने डोंगराळ प्रदेशाची निवड केली. प्रथम त्याने सिंहगड व राजगड या किल्ल्यांचा आश्रय घेतला. रणदुल्लाखान आणि खान झमान पाठलागावर होतेच. तेव्हा शहाजीने कोकणात उतरून माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. मुघलांनी माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला. शहाजीने शर्थीची झुंज सुरू केली. परंतु निजामशाहीच्या वारसाच्या-मूर्तजाच्या-आईने शहाजहानशी तहाची बोलणी लावल्यामुळे अखेर शहाजीला शरण जाणे भाग पडले. ऑक्टोबर १६३६ मध्ये शहाजहानने माहुलीचा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला आणि आदिलशहाची चाकरी पत्करून तो कर्नाटकाकडे निघून गेला. या घटनेबरोबर निजामशाहीचाही अंत झाला. शहाजीचे कार्य कर्नाटकाकडे जाण्यापूर्वी शहाजीने आपल्या पुणे जहागिरीची व्यवस्था लावली. दादाजी कोंडदेव यास कारभारी नेमले. जिजाबाई व बालशिवाजी यांना पुणे जहागिरीतच ठेवले. आदिलशहाने कर्नाटकातील छोट्या मोठ्या हिंदू राजवटींवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची कामगिरी शहाजीवर सोपविली होती. शहाजीने या लहान मोठ्या राजवटींवर आपले वर्चस्व निर्माण केले, त्यांच्याकडून खंडण्या वसुल केल्या. परंतु एकही राज्य खालसा केले नाही त्यामुळे महंमद आदिलशहास शहाजीचा वारंवार संशय येत होता. शिवभारतकाराने असे म्हटले शहाजीची कामगिरी १३

आहे की, 'कर्नाटकातील हे छोटे मोठे राजे माझ्या ऐवजी शहाजीलाच मोठे मानतात अशी खंत आदिलशहाला वाटत होती.' शिवाजीने स्वराज्य कार्य सुरू केल्यावर त्याला प्रतिबंध करण्यासाठी आदिलशहाने जुलै १६४८ मध्ये शहाजीला कैद केले. शिवाजीकडून सिंहगडचा किल्ला परत मिळाल्यावर शहाजीची सुटका करण्यात आली. यावेळी त्याने आपल्याबरोबर असलेल्या कान्होजी जेधे या देशमुखास शिवाजीच्या सहकार्यासाठी जावे असे सांगितले. सुटका झाल्यानंतर शहाजी पुन्हा कर्नाटकात येऊन आदिलशहाच्या वतीने कारभार पाहू लागला. जरी आदिलशहाला शहाजीचा वारंवार संशय येत असला तरी तो शहाजीला वचकून होता. शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराचे प्रयत्न चालू असतांना शहाजीची त्याला आतून मदत होत होती का? असा एक प्रश्न इतिहासात निर्माण होतो. जरी शिवाजीला प्रत्यक्ष मदत शहाजीने केल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नसला तरी शिवाजीच्या कार्यात त्याने कधीही अडथळे आणले नाहीत ही गोष्ट लक्षणीय मानली पाहिजे. इ. स. १६६१ मध्ये दक्षिणेतील हिंदू नायकांना एकत्रित करून उठाव करण्याचा प्रयत्न शहाजीने केला असावा हे डच कागदपत्रांवरून सिद्ध होते. या कटाच्या संशयावरून आदिलशहाने शहाजीस पुन्हा कैद केले होते. पण जुलै १६६३ मध्ये त्याची परत सुटका केली. त्यानंतर केवळ ५-६ महिन्यातच कर्नाटकातील होद्देगिरी याठिकाणी शिकारीला जात असतांना घोड्यावरून पडून २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीच्या मृत्यू झाला. शहाजीच्या कार्याचे मूल्यमापन अनेक इतिहासकारांनी केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी तर स्वराज्य स्थापनेची मूळ कल्पना व योजना शहाजीचीच होती असा निष्कर्ष काढला. बहुतेक इतिहासकार शहाजीचे कार्य शिवाजीला पुरक ठरले असा निष्कर्ष काढतात. राजवाडे म्हणतात, "शिवाजीचा पूर्वावतार जो शहाजी त्याच्या कर्तबगारीवर शहाजीचा पश्चादवतार जो शिवाजी त्याने आपल्या कर्तबगारीची इमारत उठविली.” (राधा माधव विलास चंपू, पृष्ठ ३६.) शहाजीच्या चरित्राचे साक्षेपी अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शहाजी हा स्वतंत्र बाण्याचा आणि स्वाभिमानी वृत्तीचा पुरुष होता. इतिहासाचार्य राजवाडे लिहितात, 'मूळ धन्याचे मांडलिकत्व पत्करिता पत्करिता ते प्रसंगी झुगारून स्वराज्य स्थापण्याचा प्रकारही असाच स्वामिद्रोहाच्या आरोपास पात्र होता. कर्नाटकांतील स्वराज्य स्थापनेतील हे गौणत्व शहाजी जाणून होता. करतां, मिंधेपणाचा गंध हि ज्या स्थापनेत आढळून येणार नाही, असे स्वराज्य दादाजी कोंडदेव, जिजाबाई व शिवाजी यांच्या द्वारा शहाजीने चौथ्यानदा १४ छत्रपती शिवाजी महाराज

स्थापिण्याचा उद्योग बंगळूराहून पुणे प्रांती करविला. निजामशाही टिकविण्यासाठी शहाजहानविरूद्ध त्याने जो लढा दिला त्यावरून त्याच्या स्वतंत्र आणि स्वाभिमानी वृत्तीची कल्पना येते. त्याने जे डावपेच खेळून मुघलांविरूद्ध लढा दिला ते डावपेच शिवाजीला स्वराज्यकार्यात मार्गदर्शक ठरले यात काही शंका नाही.' □□□ शहाजीची कामगिरी १५