भारतकोश
संग्रह पर लौटें

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

धरणगावची लूट हेनरी ऑक्सिंडेन शिवाजी महाराजांना भेटल्यापासून काही दिवस इंग्रज आणि शिवाजी यांचे संबंध मित्रत्वाचे राहिले. परंतु हा सलोखा फार काळ टिकू शकला नाही. १६७४ च्या डिसेंबर महिन्यात मुघलांच्या वर्चस्वाखाली असलेल्या खानदेश सुभ्यात मराठ्यांनी आक्रमण केले आणि हे आक्रमण चालू असतांना धरणगाव येथील इंग्रजांची वखार मराठ्यांनी लुटली. त्यावेळी सॅम्युअल ऑस्टिन हा धरणगावच्या वखारीचा प्रमुख होता. तो वखारलुटीनंतर मुंबईला गेला. तेथील अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून नुकसान भरपाई मागण्यासाठी सप्टेंबर १६७५ मध्ये तो रायगडावर आला. प्रत्यक्ष भेटीमध्ये वखारीच्या लुटीबद्दल आपणास काहीच माहिती नाही म्हणून शिवाजी महाराजांनी नुकसान भरपाई देणे अमान्य केले. निदान यापुढे तरी इंग्रजांच्या वखारींना संरक्षण मिळावे म्हणून ऑस्टिनने शिवाजीकडे याचना केली. नुकसान भरपाईचे बाबतीत शिवाजी महाराजांनी ताठर धोरण स्वीकारलेले आढळते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आधुनिक तोफा आणि बंदुका महाराजांना इंग्रजांकडून हव्या होत्या. परंतु त्याबाबत इंग्रजांनी नेहमीच टाळाटाळ केली. तेव्हा इंग्रज वरकरणी फक्त गोड वागतात याची शिवाजी महाराजांना खात्री पटली होती. शिवाय आपले कट्टर शत्रू सिद्दी यांना इंग्रज मदत करीत होते याचा अनुभव महाराजांना आलेला होता. सिद्दींच्या गलबतांना मुंबईकर इंग्रज आश्रय देतात हे महाराजांना माहिती होते, म्हणून इंग्रजांशी तह करतांना कोणत्याही मोठ्या सवलती देण्याचे शिवाजी महाराजांनी टाळले. जेव्हा दंडाराजपुरीवर मराठ्यांनी हल्ले केले तेव्हा सिद्दींना इंग्रजांनी आश्रय दिला. त्यामुळे शिवाजी महाराज इंग्रजांविषयी सावध झाले. सिद्दींच्या अगोदर इंग्रजांचाच बंदोबस्त केला पाहिजे असा निश्चय शिवाजी महाराजांनी केला. त्यादृष्टीने मुंबई बंदराजवळ असलेल्या खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. खांदेरीची लढाई खांदेरीला शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मायनाक भंडारी यांच्या देखरेखीखाली तटबंदी बांधण्याचे काम मराठ्यांनी सुरू केले. खांदेरीला जर मराठ्यांनी तटबंदी बांधली तर मुंबईचे आपले केंद्र धोक्यामध्ये येईल असे इंग्रजांना वाटू लागले. तेव्हा बांधकामाला साहित्य मिळू नये म्हणून इंग्रजांनी मराठ्यांची रसद तोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मराठे व इंग्रज यांच्यात तीव्र संघर्ष सुरू झाला. इंग्रजांनी सप्टेंबर १६७५ मध्ये खांदेरी बेटावर तोफांचा सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज १०३

भडीमार सुरू केला. शिवाजी महाराजांचा आरमारप्रमुख दौलतखान शीघ्र गतीने इंग्रजांच्या प्रतिकारासाठी खांदेरीपर्यंत आला. मायनाक भंडाऱ्याने इंग्रजांची काही गलबते पकडली. तसेच काही इंग्रजांना कैद केले. तेव्हा मुंबईहून केग्विन याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांचे सुसज्ज आरमार निघाले. या आरमारामध्ये एक मोठे जहाज आणि सात गलबते होती. दौलतखानाजवळ वीस गुराबांचे आरमार होते. इंग्रजांच्या आरमारी हालचाली होण्यापूर्वीच दौलतखानाने आरमारी हल्ले सुरू केले. इंग्रजांची गलबते निकामी केली. रिव्हेंज, फ्रिगेज हे मोठे जहाज इंग्रजांजवळ असल्यामुळे त्यांना आपण मराठ्यांचा सहज पराभव करू अशी घमेंड होती. मुंबईहून निघण्यापूर्वी आपण नक्की विजयी होणार अशी फुशारकी केग्विनने मारली होती. परंतु प्रत्यक्षात केग्विनचे आरमार टक्कर देऊ शकले नाही. नोव्हेंबर १६७९ मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये मोठे आरमारी युद्ध झाले. स्वतः केग्विनने तक्रार केली होती की, मराठ्यांची गलबते चलाख असल्यामुळे आपली लढाऊ गलबते कुचकामी ठरली. यासुमारास मराठ्यांची आरमारी शक्ती नष्ट करण्याच्या इराद्याने सिद्दीनी स्वतंत्रपणे मराठ्यांविरुद्ध आरमारी चढाई केली. परंतु इंग्रज आणि सिद्दी या दोघांच्याही आरमाराचा मराठ्यांनी अक्षरशः धुव्वा उडविला. शेवटी इंग्रजांनी माघार घेतली. खांदेरी उंदेरी यापुढे शिवाजीच्याच ताब्यात राहणार याची इंग्रजांना खात्री पटली. खांदेरीचे युद्ध संपले. पण मुंबईकर इंग्रजांना खांदेरी मराठ्यांच्या ताब्यात असल्यामुळे नंतरही बरीच वर्षे भीती वाटत होती. हे १६८२ च्या एका पत्रावरून स्पष्ट होते. इंग्रजांप्रमाणे डच आणि फ्रेंच यांच्याशीही शिवाजी महाराजांचा संबंध आला. डचांनी प्रथमपासूनच शिवाजीबरोबर मैत्री राखण्यात यश मिळविले. फ्रेंचांचे मुख्य केंद्र पाँडेचेरीला असताना शिवाजी महाराजांचा त्यांच्याशी फार संबंध आला नाही. शिवाजी महाराजांनी दक्षिणेची स्वारी काढली त्यावेळी पाँडेचेरीचे फ्रेंच अत्यंत सावध होते. तेथील प्रमुख अधिकारी मार्टीन याने शिवाजी महाराजांच्या दक्षिण स्वारीची माहिती लिहून ठेवलेली आढळते. लांब पल्ल्यांच्या तोफा फ्रेंचांकडून मिळविण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. त्याचप्रमाणे किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी आणि भक्कम तटबंदी बांधण्यासाठी महाराजांनी फ्रेंचांकडे वास्तुविशारदांची मागणी केली. परंतु या दोन्ही मागण्यांबाबत शिवाजीला यश आले नाही. पाश्चात्य वखारवाले स्थानिक राज्यकर्त्यांशी पुरेसे संरक्षण मिळावे म्हणून सलोख्याचा संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत असत. पण त्याचबरोबर आपल्या तंत्रज्ञानाचा किंवा शस्त्रास्त्रांचा स्थानिक राज्यकर्त्यांबाबत १०४ छत्रपती शिवाजी महाराज

विशेषत्वाने उपयोग होणार नाही याची खबरदारी घेत असत. पाश्चात्यांचे हे दूरदृष्टीचे राजकारण शिवाजी महाराजांना मात्र उमगले होते हे त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतिक मानता येईल. □□□ सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज १०५

१३. शिवरायाच्या कार्याचे स्वरूप इ. स. १६८० च्या प्रारंभी शिवाजी महाराजांनी आपल्या बहुतेक शत्रूंना नामोहरम केल्याचे आढळून येते. फेब्रुवारीमध्ये मुघलांचा पराभव करण्यामध्ये महाराजांना यश आले. इंग्रज लोक सिद्दींना मदत करत आहेत हे लक्षात आल्यावर महाराजांनी इंग्रजांनाही धडा शिकविला. आपला निभाव लागणार नाही हे ओळखून इंग्रजांनी जानेवारी १६८० मध्ये शिवाजी महाराजांशी तह केला व यापुढे सिद्दींना मदत करणार नाही असे आश्वासन दिले. सिद्दी कासीम मात्र मुघलांच्या मदतीमुळे समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. खांदेरीवर शिवाजी महाराज तटबंदी बांधत आहेत हे पाहून तेथून जवळच असलेले उंदेरी हे बेट सिद्दी कासीमने जिंकून घेतले. त्यामुळे सिद्दी आणि मराठे यांच्यामधील संघर्ष १६८०च्या उन्हाळ्यातही चालू राहिला. एक सिद्दी जर सोडला तर महाराजांचे बाकीचे सर्व शत्रू एकतर नामोहरम झाले होते किंवा महाराजांशी तह करून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत होते. अशा प्रकारे आपल्या सर्व शत्रूंचा बंदोबस्त झाल्यावर फेब्रुवारी १६८० मध्ये शिवाजी महाराज रायगडावर परतले. ७ मार्च १६८० रोजी राजारामाचा उपनयनविधी करण्यात आला. त्यानंतर १५ मार्च रोजी राजारामाचा विवाह प्रतापराव गुजराच्या मुलीबरोबर करण्यात आला. अशाप्रकारे मंगल कार्यामुळे रायगडावर मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अचानकपणे शिवाजी महाराज रक्तातिसाराने आजारी पडले आणि हे दुखणे विकोपास जाऊन चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ म्हणजे ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला. स्वराज्यावर मोठा आघात झाला. रायगडावर शोकसागर उसळला. ऐन उमेदीच्या वयात झालेला महाराजांचा मृत्यू म्हणजे चौफेर विस्ताराची वाटचाल करणाऱ्या स्वराज्यावर मोठा आघात होता. शिवाजी महाराजांचे कार्य शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचे अलौकिक कार्य शिवाजी महाराजांनी १०६

करून दाखविले. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याचे मोठे वैशिष्ट्य असे होते की हे राज्य भोसले वंशाचे राज्य असूनही सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले राज्य होते. लोककल्याणाचा विचार करणारा राज्यकर्ता त्या काळामध्ये जगात इतरत्र झालेला आढळत नाही. म्हणूनच १७व्या शतकातील महान राजा या दृष्टीने शिवाजी महाराजांचेच नाव घ्यावे लागते. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या काव्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केलेले आढळते. फक्त एकाच ओवीमध्ये महाराज कसे होते ते रामदास स्वामींनी स्पष्ट केले आहे, निश्चयाचा महामेरू । बहुत जनासि आधारू ॥ अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥ शिवाजीचे निकटवर्ती सहकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन करताना असे म्हटले आहे, 'राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला... नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधिश छत्रपति जाहाला. ये जातीचा कोणी मागे जाहाला नाही. पुढे होणार नाही.' रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रामध्ये शिवाजीचे कर्तृत्व सांगताना म्हटले आहे की, 'त्यांनी केवळ नुतन सृष्टीच निर्माण केली' समकालीन हिंदी कवी भूषण महाराजांविषयी लिहितो की, 'साहि के सपूत सिबराज, समसेर तेरी दिल्ली दल दाबि कै। दवाल राखी दुनी मै ॥' शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले म्हणून ते फार थोर होते असे म्हणता येणार नाही. राज्य स्थापन करून राज्याचा विस्तार केला हे त्यांच्या पराक्रमाचे लक्षण आहे. पण आपल्या राज्यातील रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारा महान पुरुष म्हणून शिवाजी महाराजांची योग्यता मोठी होती. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा आपल्या राज्यातील साधुसंतांना आणि स्त्रियांना काडीचाही उपद्रव लागू नये म्हणून अत्यंत प्रयत्नशील होता. परमुलुखातील स्त्रियांना आणि बालकांना उपद्रव देणाऱ्या आपल्या सैनिकाची गय केली जाणार नाही. असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले होते. 'परमुलुखात बायका पोरं जो धरील त्याची गर्दन मारली जाईल' हे शिवाजीचे ब्रीदवाक्य होते. शिवाजीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक धोरणाचा आढावा घेतल्यास लोककल्याण हेच त्यांच्या धोरणाचे मूलतत्त्व होते असे दिसून येते. शिवरायांच्या कार्याचे स्वरूप १०७

शिवाजी महाराजांचे कुटुंब शिवाजी महाराजांनी एकंदर ८ विवाह केले. या ८ राण्यांची नावे पुढीलप्रमाणे :- १) सगुणाबाई, २) सईबाई ३) सोयराबाई, ४) पुतळाबाई, ५) लक्ष्मीबाई, ६) सकवारबाई, ७) काशीबाई आणि ८) गुणवंताबाई. महाराजांना २ मुले होती १) संभाजी २) राजाराम. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या ४ राण्या हयात होत्या. संभाजीची आई सईबाई तो केवळ अडीच वर्षांचा असताना मरण पावली. राज्याभिषेक होण्याच्या प्रसंगी पट्टराणी होण्याचा मान सोयराबाईस मिळाला. परंतु युवराज होण्याचा मान संभाजीला मिळाला. त्यातूनच रायगडावर तंटेबखेडे सुरू झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ १ महिन्याने राणी पुतळाबाई सती गेली. शिवाजी महाराजांना ६ मुली होत्या. या सर्व मुलींचे विवाह नामांकित घराण्यातील पुरुषांशी झाले. परंतु शिवाजी महाराजांचा एकही जावई त्यांच्या स्वराज्यकार्यात सहभागी झालेला आढळत नाही. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ही महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत म्हणजे जून १६७४ पर्यंत हयात होती. आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊलीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर केवळ १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा पाचाड येथे राहात्या घरात मृत्यू झाला. स्वराज्याचे प्रशासन सभासद बखरीमध्ये असे म्हटले आहे की, 'आपला अंतकाळ जवळ आल्यावर आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी जवळ बोलाविले आणि स्वराज्याचा कारभार पुढे कसा करावा याचे मार्गदर्शन केले.' आपल्या राज्याचा विस्तार सांगताना महाराजांनी असे स्पष्ट केले की, 'राज्य म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पुणे महाल होता, त्यावरि एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले.' स्वराज्यामध्ये समाविष्ट असलेल्या सुभ्यांच्या उत्पन्नाची माहिती देणारा एक शिवकालीन जाबता उपलब्ध आहे. त्यामध्ये स्वराज्यातील सुभ्यांचे एकूण उत्पन्न १,३२,६६,६३५ एवढे दर्शविले आहे. स्वराज्यात मोडणारा प्रदेश एकूण १४ सुभ्यांचा होता. शिवाजीच्या स्वराज्याची भौगोलिक मर्यादा स्पष्ट करताना रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की, 'सालेरी अहिवंतापासून चंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादन केले.' साधारणपणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भौगोलिक सीमा पुढीलप्रमाणे सांगता येतील. उत्तरेकडे बागलाण प्रदेश, दक्षिणेकडे नाशिक व पुणे भागातून सातारा आणि कोल्हापूर १०८ छत्रपती शिवाजी महाराज

भागापर्यंत स्वराज्याची सरहद्द होती. ही सरहद्द सरळ रेषेत थेट कारवारपर्यंत येऊन भिडली होती. त्याशिवाय कर्नाटकातील बेळगाव, कोप्पल, बल्लारी, चित्तुर, अर्कोट, वेलोर आणि जिंजी या भागातील काही प्रदेश स्वराज्यामध्ये मोडत होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रशासनव्यवस्था अत्यंत काटेकोर पद्धतीने केलेली होती. राजा हा सर्वश्रेष्ठ असून मुलकी, लष्करी तसेच न्यायविषयक प्रशासनाचे अधिकार राजाच्या हाती केंद्रीत झाले होते. राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती. राज्याभिषेकसमयी ८ प्रधान नेमून त्यांच्याकडे प्रशासनाची जबाबदारी वाटून देण्यात आली. १. पेशवा किंवा पंतप्रधान : हा सर्वात जबाबदार प्रधान असून मुलकी आणि लष्करी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याच्याकडे सोपविले होते. त्यादृष्टीने राजपत्रावर शिक्का मारण्याचा त्याला अधिकार होता. राजाच्या आदेशाप्रमाणे प्रदेशाची व्यवस्था लावणे, प्रदेशाचे संरक्षण करणे आणि स्वतः युद्धप्रसंगी हजर रहाणे ही अत्यंत महत्त्वाची कामे प्रधानाकडे सोपविली होती. राज्याभिषेकप्रसंगी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पंतप्रधान म्हणून नेमले. २. अमात्य : हा दुसरा महत्त्वाचा प्रधान असून त्याच्याकडे राज्याची अर्थव्यवस्था पहाण्याचे काम सोपविण्यात आले होते. शिवाय युद्धप्रसंगाला त्यालाही रणांगणावर हजर रहावे लागत असे. शिवाजी महाराजांनी प्रथम नारो निळकंठ व नंतर रामचंद्र निळकंठ यांना अमात्यपद बहाल केले होते. ३. सचिव : तिसरा प्रधान म्हणजे सचिव. राजकीय पत्रव्यवहाराची जबाबदारी, तसेच नव्याने जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याचे काम सचिवाकडे होते. त्यालाही युद्धप्रसंगी हजर रहाण्याची जबाबदारी देण्यात आली होती. महाराजांनी अण्णाजी दत्तो यास सचिव म्हणून नेमले होते. ४. मंत्री : चौथा प्रधान म्हणजे मंत्री. राजकारणाविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार या प्रधानाकडे सोपविण्यात आले होते. महाराजांनी दत्ताजी त्रिंबक याला मंत्री म्हणून नेमले होते. ५. सेनापती : हा लष्कराचा प्रमुख असून राज्य रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. युद्धप्रसंगी हजर रहाणे हे तर त्याचे आद्यकर्तव्य होते. शिवाजी शिवरायाच्या कार्याचे स्वरूप १०९

६. दक्षिण दिग्विजय, स्वराज्य विस्तार व उपसंहार

महाराजांनी हंबीरराव मोहिते याला सेनापतीपद दिले होते. ६. पंडितराव : या प्रधानाला धर्मविषयक सर्व अधिकार देण्यात आले होते. त्याचप्रमाणे विद्वानांचा सत्कार करणे, अनुष्ठाने करणे, दानधर्माची आखणी करणे इत्यादी कामे त्याच्याकडे सोपविली होती. महाराजांनी रघुनाथ पंडीत याची पंडितराव म्हणून नियुक्ती केली होती. ७. न्यायाधीश : न्यायदानाची जबाबदारी याच्यावर असून निवाडापत्रावर याचे संमतीचिन्ह आवश्यक मानले जात असे. या पदावर निराजी रावजी याची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली होती. ८. सुमंत : परराज्याशी सामान्य व्यवहार करण्यासाठी या प्रधानाची नियुक्ती करण्यात आली होती. महाराजांनी रामचंद्र त्रिंबक यास सुमंत म्हणून नेमले होते. या सर्व प्रधानांचे वेतन निश्चित करण्यात आले होते. पेशव्यास दरवर्षी १५,००० होन तर अमात्यास दरवर्षी १२,००० होन असे वेतन ठरवण्यात आले होते. इतर प्रधानांना दरवर्षी १०,००० होन असे वेतन निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक प्रधानाला ८ कारकून म्हणजे अधिकारी देण्यात आले होते. १) दिवाण, २) मुजुमदार, ३) फडणीस, ४) सबनीस, ५) कारखानीस, ६) चिटणीस, ७) जामदार व ८) पोतनीस. या ८ अधिकाऱ्यांचे वेतनही निश्चित करण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचे प्रशासन जास्तीत जास्त निर्दोष आणि स्वच्छ असले पाहिजे म्हणून काही दंडक घालून दिले होते. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी प्रधानांचे आणि अधिकाऱ्यांचे पगार निश्चित केले. त्यांच्या बढतीचे अथवा बडतर्फीचे अधिकार स्वतःकडे राखून ठेवले. दुसरा दंडक म्हणजे कोणत्याही प्रकारचे अधिकार एकाच प्रकारच्या अधिकाऱ्याकडे केंद्रित न करता ते दोन किंवा तीन अधिकाऱ्यांकडे विभागून देण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनामध्ये एक शिस्त निर्माण झाली होती. आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार एक व्यक्तीच्या हातामध्ये ठेवलेला नव्हता. मुलकी व्यवस्थेप्रमाणे लष्करी व्यवस्थेतही महाराजांनी या तत्त्वाचा उपयोग केला होता. मुलकी व्यवस्था स्वराज्यामध्ये एकूण चौदा सुभ्यांचा समावेश होता. त्या सुभ्यांना प्रांत असे म्हटले जाईल. प्रांताचा अधिकारी म्हणजे सुभेदार किंवा देशाधिकारी. ११० छत्रपती शिवाजी महाराज

प्रांताची विभागणी महालात करण्यात आली होती. महालावरील अधिकाऱ्याला हवालदार म्हणत. महालाची विभागणी परगण्यात करण्यात आली होती. परगण्याचे अधिकारी म्हणजे देशमुख आणि देशपांडे. खेडे हा शेवटचा घटक होता. त्याचे अधिकारी म्हणजे पाटील आणि कुलकर्णी. खेड्याच्या अधिकाऱ्यापासून ते प्रांतांच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची जबाबदारी महसूल वसुलीची होती. त्याशिवाय आपल्या विभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, किल्ल्यांच्या रक्षणासाठी तत्पर असणे आणि आपआपल्या घटकापुरते न्यायनिवाड्याचे काम करणे इ. कामे संबंधीत प्रधानांच्या आणि राजाच्या आदेशाप्रमाणे करावी लागत असत. सुभेदाराने आपआपल्या प्रांतातील. रयतेची सर्वप्रकारची काळजी घेतली पाहिजे असा शिवाजी महाराजांचा दंडक होता. नवा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाल्यावर त्या प्रदेशातील रयतेची सर्वप्रकारची सोय करावी, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात अशा आज्ञा सुभेदाराला केलेल्या असत. शिवाजी महाराजांचे प्रशासन कल्याणकारी राज्याच्या स्वरूपाचे होते. त्यांनी वेगवेगळ्या सुभेदारांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध झालेली आहेत. या पत्रांमधून रयतेविषयी महाराजांचीं किती तळमळ होती हे स्पष्ट होते. रयतेला काडीचा जरी उपद्रव झाला तरी महाराज तो सहन करणार नाही असा इशारा महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला लिहिलेल्या एका पत्रामध्ये आढळतो. स्वराज्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या प्रदेशाबाबत सभासद लिहितो की, 'नवी रयत येईल त्यास गुरेढोरे द्यावी. बीजासाठी दाणापैका द्यावा.' एका पत्रात महाराजांनी सुभेदारांना म्हटले आहे की, 'ज्याला शेत करावयाची कुवत आहे पण ज्याच्याकडे बैल, नांगर, बी- बियाणे नाही, त्यांना सर्व साहित्य पुरवावे. गरीब शेतकऱ्यांना दिलेले कर्ज त्यांच्या सवडीप्रमाणे वसूल करावे, त्यासाठी कोणतीही बळजबरी करू नये. शिवाजी महाराजांचे हे धोरण पाहिल्यास महाराज हे मध्ययुगीन कल्याणकारी राज्याचे प्रवर्तक होते असे म्हणता येईल. वतनदारी यादव कालापासून महाराष्ट्रात वतनदारांची परंपरा निर्माण झाली होती. इस्लामी राज्यकर्त्यांनी या वतनदारी पद्धतीची जोपासना केली. हे वतनदार राज्यकर्त्यांना खूष करण्यासाठी प्रजेचा छळ करीत असत. बहमनी काळात वतनदारांनी महसूल गोळा करण्यासाठी रयतेवर किती निष्ठूरपणे अत्याचार केले हे तत्कालीन कागदपत्रावरून दिसते. त्याचप्रमाणे संत एकनाथांच्या काव्यामधूनही ते चित्र स्पष्ट होते. शिवाजी महाराजांना रयतेचा छळ करणाऱ्या शिवरायाच्या कार्याचे स्वरूप १११

वतनदारांचा मनस्वी तितकारा होता. वतनदारी पद्धती बंद करावी असा कठोर विचारही शिवाजी महाराजांनी केला होता हे सभासद बखरीतील उल्लेखावरून वाटते. परंतु हा कठोर विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. पहिली अडचण म्हणजे वतनदारी पद्धती वंशपरांगत पद्धतीने चालत आली होती. दुसरी अडचण म्हणजे पाटील कुलकर्ण्यापासून देशमुख- देशपांड्यापर्यंत सर्व अधिकारी वतनदार होते. या सर्वांची वतने नष्ट केली तर अराजक निर्माण होईल व हे असंतुष्ट वतनदार शत्रुपक्षाला जाऊन मिळतील अशी कायमची धास्ती वाटत होती. शिवाजीने स्वराज्य स्थापन केल्यापासून अनेक मराठे वतनदार त्याच्याविरुद्ध गेले. काहीजणांना राजे हे किताब असल्यामुळे ते स्वतःला शिवाजीपेक्षा श्रेष्ठ समजत असत. अशा वतनदारांविरुद्ध शिवाजी महाराजांना लढावे लागले. अफझलखानाने जेव्हा महाराजांविरुद्ध स्वारी काढली तेव्हा त्याने मावळ आणि वाई भागातील देशमुखांना शिवाजीविरुद्ध चिथावले. तीच गोष्ट पुढे मिर्झाराजे जयसिंगाने केली. तेव्हा वतन रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला तर हे सर्व लोभी वतनदार बंड पुकारतील, आदिलशहा किंवा मुघलांना मिळतील आणि त्यामुळे स्वराज्यकार्यात दुर्धर समस्या निर्माण होतील याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. म्हणून त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. सरसकट सर्व वतने रद्द करण्याऐवजी जे वतनदार पुंड झाले आहे व जे रयतेवर जुलूम करीत आहेत, त्यांना वठणीवर आणण्यासाठी अशा वतनदारांची वतने रद्द करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. समकालीन काही विश्वसनीय पत्रांतून बंडखोर व जुलुमी वतनदारांना शिवाजी महाराजांनी कसे नामोहरम केले याचे उल्लेख सापडतात. वतनदारांनी रयतेला गुलाम समजू नये असे महाराजांचे स्पष्ट मत होते. सभासद लिहितो की, 'मुलखात जमीनदार, देशमुख व देसाई यांचे जप्तीखाली कैदेत रयत नाही. याणी 'साहेबी' करून नागवीन म्हटलियाने त्यांच्या हाती नाही.' आहे ती वतने चालवावीत, परंतु नवी देऊ नये असे महाराजांचे एकूण धोरण होते. अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहितात, 'आहे वतन ते चालवून यांची सत्ता असू न द्यावी... नवी इनामे, देऊ नयेत. वतनदारांना स्नेह आणि दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे.' अमात्यांच्या विवेचनावरून शिवाजी महाराजांच्या धोरणाची पूर्ण कल्पना येते. किल्ल्यांची व्यवस्था अमात्यांनी आज्ञापत्रात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' या एका वाक्यात किल्ल्यांचे महत्व स्पष्ट केले आहे. गड, कोटांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी ११२ छत्रपती शिवाजी महाराज

स्वराज्य स्थापना केली आणि राज्यविस्तार केला. कोणत्याही राज्यकर्त्यापेक्षा महाराजांनी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले. शिवकालामध्ये किल्ल्यांचे ३ प्रमुख प्रकार होते. १) गिरिदुर्ग २) स्थलदुर्ग ३) जलदुर्ग. यामध्ये शिवाजी महाराजांनी गिरिदुर्गांचे महत्त्व वाढविले. त्यांच्या बहुतेक राजकीय हालचाली गिरिदुर्गावरूनच झालेल्या आढळतात. आपल्या राजधानीसाठी प्रथम राजगड आणि नंतर रायगड या गिरिदुर्गांचीच निवड महाराजांनी केली होती. स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत भिडल्यानंतर जलदुर्गांची उभारणीही महाराजांनी केली. १६६७ मध्ये मालवणजवळ सिंधुदुर्ग हा किल्ला बांधून महाराजांनी आपली सागरी राजधानी येथे केली. स्वराज्यामध्ये एकंदर दोनशेचाळीस किल्ले होते. प्रत्येक किल्ल्यासाठी तीन अधिकारी नेमले जात. हवालदार, सबनीसं आणि कारखानीस. अशा र्या तीन अधिकाऱ्यांकडे किल्ल्यांचा कारभार सोपविलेला असे. हे तिन्ही अधिकारी एकाच दर्जाचे असून कोणताही निर्णय घेताना तिघांचीही संमती आवश्यक मानली जात असे. गडावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असत. हे सर्व अधिकारी पगारी होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी लढाऊ शिबंदी ठेवली जात असे. याशिवाय किल्ल्याच्या कामासाठी व किल्ल्यावरील लोकांच्या सोयीसाठी सुतार, लोहार, पाथरवट, चांभार, रसायनवैद्य, शस्त्रवैद्य, ज्योतिषी इ. लोक नेमलेले असत. परंतु गरजेपेक्षा अधिक माणसे किंवा बाजारबुणगे किल्ल्यावर ठेवायचे नाहीत अशी शिवाजीची सक्त सूचना होती. आरमार आज्ञापत्रामध्ये अमात्यांनी आरमाराविषयी स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे. ‘ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ अशा मोजक्या शब्दात अमात्यांनी आरमाराचे महत्त्व विशद केले आहे. इ.स. १६५९ मध्ये शिवाजीने आरमाराचा पाया घातला. भिवंडी, कल्याण व पनवेल या ठिकाणी लढाऊ जहाजे बांधली १६६५ मध्ये शिवाजीजवळ ८५ लहान व ३ मोठी गलबते होती. नंतर ५ वर्षात महाराजांनी आरमारी सामर्थ्य एवढे वाढवले की १६७० मध्ये महाराजांच्या आरमारात १६० जहाजे असल्याचा उल्लेख सापडतो. सभासदांच्या माहितीप्रमाणे महाराजांच्या आरमारात ४०० जहाजे होती. दर्यासारंग आणि मायनाक या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दोनशे जहाजांचे आरमार होते. आरमाराचे सुभे केलेले असून प्रत्येक सुभ्यामध्ये पाच गुराबा व पंधरा गलबते असत. महाराजांचे आरमारी सामर्थ्य एवढे वाढले की, पोर्तुगीजांना, इंग्रजांना आणि सिद्दींना या आरमाराची भीती वाटू लागली होती. ‘समुद्रामध्ये शिवरायाच्या कार्याचे स्वरूप ११३

महाराजांनी एक लष्कर उभारले,' असे सभासदाने अभिमानाने लिहून ठेवले आहे. आरमाराचे महत्त्व ओळखणारा मध्ययुगातील तो एक महान राज्यकर्ता होता. म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ-सरकार यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते. अर्थव्यवस्था स्वराज्याची बांधणी करताना भक्कम अर्थव्यवस्था उभारण्याचे अलौकिक कार्यही शिवाजी महाराजांनी पार पाडले. त्यांच्या मृत्युसमयी खजिन्यामध्ये किती दौलत होती याची यादीच सभासदाने व इतर बखरकारांनी दिलेली आहे. महसूलाचे उत्पन्न हे सर्वात मोठे उत्पन्न होते. स्वराज्यातील जमिनीची मोजणी करून त्यावर सारा निश्चित करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांच्याकडे सोपविले. जमीन मोजणीसाठी पगारी अधिकारी नेमले होते. जमिनीची प्रथम प्रतवारी ठरवून त्या जमिनीतून येणाऱ्या पिकाचा अंदाज घेतला जात असे. त्यावर शेतसारा ठरविण्यात येत असे. या पद्धतीला 'अण्णाजी पंतांची धारा' असे नाव मिळाले होते. शेती व्यवसायाला उत्तेजन देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रोत्साहन दिले. गरीब शेतकऱ्यांना नांगर, बैल आणि बी-बियाणे पुरविण्याच्या आज्ञा शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना केलेल्या होत्या. दुष्काळाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना सारा माफ केला जात असे. राज्याच्या उत्पन्नाचे दुसरे महत्त्वाचे साधन म्हणजे चौथाई, सरदेशमुखी. ही साधने शिवपूर्वकालापासूनच अस्तित्वात होती. सरहद्दीवरच्या दुबळ्या राज्यकर्त्यांकडून त्यांच्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा वसूल करून घेणे म्हणजे चौथाई होय. या चौथाईच्या मोबदल्यात दुर्बल राज्यकर्त्यांना सुरक्षितता लाभत असे आणि या सुरक्षिततेपायी छोटे राज्यकर्ते स्वखुषीने चौथाई देण्यास तयार असत. शिवाजी महाराजांनी चौथाई पद्धतीचा पुरस्कार करून राज्याचे उत्पन्न वाढविले. चौथाईप्रमाणे दुसरे साधन म्हणजे सरदेशमुखी होय. सुभ्यातील एकूण उत्पन्नाच्या १/१० भागाला सरदेशमुखी असे म्हणत. शिवाजी महाराजांच्या काळात कोकणामध्ये अनेक सरदेशमुख होते. महसूल गोळा करण्याचा मोबदला म्हणून १/१० भाग ते आपल्याकडे ठेवत असत. स्वराज्याची स्थापना आणि विस्तार झाल्यानंतर सरदेशमुखीचे अधिकार शिवाजी महाराजांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे स्वराज्याच्या उत्पन्नामध्ये भर पडली. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कर म्हणजे उत्पन्नाची साधनेच होती करांमध्ये प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर ११४ छत्रपती शिवाजी महाराज

असे दोन प्रकार होते. शिवाय प्रासंगिक कर बसविण्याचा अधिकारही महाराजांनी राखून ठेवला होता. इनामपट्टी, मिरासपट्टी, देशमुखपट्टी यासारखे कर प्रत्यक्ष कर होते. अप्रत्यक्ष करामध्ये चुंगी, वांगी, फसकी, पळकी, उरीदलाली, सेवाधारा यासारखे कितीतरी कर होते. धान्य, फळफळावळ, कापडचोपड, गुरेढोरे यांच्या विक्रीवरही कर लादलेले होते. मिठावरही कर होता. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आणि कारागिरांवरही कर होते. वीणकराला मागपट्टी, चांभाराला पायपोशी तर तेल्याला तेलपट्टी याप्रकारचे कर द्यावे लागत. बलुतेदारांना कारूक नावाचा कर द्यावा लागत असे. करांचे ओझे गरिबांवर पडू नये याची काळजी घेतली जात असे. राज्याभिषेक प्रसंगी सिंहासनपट्टी नावाचा प्रासंगिक कर महाराजांनी बसविलेला आढळतो. करामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढत असे. म्हणून कर देणाऱ्या व्यक्तींच्या अडीअडचणींचाही विचार केला जात असे. उदा. दुष्काळाचे वर्ष असेल किंवा शत्रूच्या स्वारीमुळे मुलुख, उध्वस्त झाला असेल तर कर माफ केले जात. शेतकऱ्यांप्रमाणे स्वराज्यातील व्यापारी वर्गही संपन्न असला पाहिजे, त्यांच्या व्यापाराला विस्तारित क्षेत्र मिळाले पाहिजे याकडेही महाराजांचे विशेष लक्ष असे. बारदेशातील मीठ तेथील व्यापारी स्वराज्यात कमी दराने विकत असत. त्यामुळे स्वराज्यातील मिठाचा व्यापार बुडू लागला तेव्हा या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी बारदेशी मिठावर महाराजांनी जबरदस्त आयातकर बसविला. त्यामुळे स्वराज्यातील व्यापाऱ्यांचे मीठ चांगले खपू लागले व हा व्यापार उर्जितावस्थेत आला. अशाप्रकारे व्यापाराच्या उत्कर्षाबाबत शिवाजी महाराज प्रयत्नशील असले तरी व्यापार हा सचोटीचा असला पाहिजे त्यामध्ये ग्राहकांची लुबाडणूक होता कामा नये याकडेही त्यांचे लक्ष होते. कोकणात नारळ, सुपारीच्या व्यापारामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्याने शिवाजी महाराजांनी सुभेदाराची कानउघाडणी केली होती. उत्पन्नाचा मोठा भाग संरक्षण व्यवस्थेवर खर्च केला जात असे. किल्ले बांधणे, दुरुस्त करणे, आरमार वाढविण, युद्ध साहित्याची खरेदी करणे यावर बराच खर्च केला जात असे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाटबंधारे बांधणे गरीब शेतकऱ्यांना बैल, नांगर, बी-बियाणे पुरवणे, गरजू शेतकऱ्यांना कर्जे देणे, मर्दुमकी गाजविणाऱ्या सैनिकांना बक्षिसे देणे यावरही खर्च केला जात असे. स्वराज्याच्या आर्थिक उत्पन्नाची अनेकविध साधने महाराजांनी निर्माण केली असली तरी तिजोरीवरचा ताण सारखा वाढत रहात असे. त्याचे कारण म्हणजे महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले होते. ते निर्माण करीत असताना आदिलशहा, मुघल यासारख्या बलाढ्य शत्रूंबरोबर सातत्याने संघर्ष करावा लागत शिवरायांच्या कार्याचे स्वरूप ११५

असे. किल्लेबांधणीवर, लष्करावर, हत्यारांच्या खरेदीवर बराच खर्च करावा लागत असे. त्यामुळे राज्याचे उत्पन्न अपुरे पडत असे. अशा वेळी मुघल प्रदेशातील सधन शहरावर स्वारी करून लूट करणे, तसेच केवळ पैशाच्या लोभाने किनारपट्टीवर वखार टाकणाऱ्या पाश्चात्यांच्या वखारींची लूट करणे हे उपाय शिवाजी महाराजांनी अंमलात आणलेले होते. सुरतेची त्यांनी दोन वेळा लूट केली. तसेच राजापूर, धरणगाव, हुबळी इत्यादी ठिकाणी वखारीवर हल्ले केले. व्यापारी पेठा लुटल्या. त्यामागे स्वराज्याचे उत्पन्न वाढविणे आणि शत्रूंना दहशत बसविणे असा दुहेरी हेतू शिवाजी महाराजांनी साध्य केला होता. राज्याभिषेक प्रसंगी शिवराई नावाचे चलन महाराजांनी सुरू केले. त्याशिवाय सोन्याचे होनही सिंहासनारूढ झाल्यानंतर सुरू केले. याशिवाय विजयनगरपासून बहमनी-मुघल सत्तेपर्यंत सर्वांची नाणी स्वराज्यामध्ये व्यवहारासाठी चालू होती. लष्करी व्यवस्था स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करण्यासाठी कार्यक्षम लष्कराची नितांत आवश्यकता होती. शिवाजी महाराजांचे लष्कर अत्यंत आटोपशीर होते. अष्टप्रधानांपैकी दोन प्रधान सोडले तर प्रत्येक प्रधानाने युद्धशास्त्र पारंगत असले पाहिजे आणि युद्धप्रसंगी रणांगणावर आले पाहिजे असा शिवाजी महाराजांचा दंडक होता. दहा सैनिकांवर नाईक नावाचा अधिकारी असे. त्यानंतर चढत्या क्रमाने हवालदार, जुमलेदार, हजारी आणि सरनौबत असे अधिकारी असत. शिवाजी महाराजांचे अश्वदल अत्यंत प्रभावी होते. ज्याकडे स्वतःचे घोडे होते, त्याला शिलेदार असे म्हणत आणि ज्यांच्याकडे सरकारी घोडे होते त्याला बारगीर असे म्हणत. पंचवीस बारगीरांवर एक हवालदार असे. त्यानंतर क्रमाक्रमाने जुमला बारगीर, हजारी बारगीर आणि सरनौबत बारगीर असे अधिकारी होते. शिवाजीचा लष्करी तळ अत्यंत साध्या प्रकारचा असे. बहुतेक सैनिक उघड्यावर रहात असत. महाराजांसाठी एखादा तंबू असे किंवा पुष्कळप्रसंगी झाडाला कापड टांगून सावली तयार करून महाराज आश्रय घेत असत. स्वारीच्या वेळी बायकापोरे न घेण्याचा त्यांचा दंडक असे. स्वारीचे प्रसंगी कधीकधी प्रत्येक घोडेस्वाराकडे दोन घोडे असत. त्यामुळे जलद गतीने आक्रमण करणे सोयीचे असे. महाराजांचे हेरखाते विलक्षण कार्यक्षम होते. स्वतः शिवाजी महाराजच वेष पालटून हेर बनत असत. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. ११६ छत्रपती शिवाजी महाराज

परप्रांतीय लोकही शिवाजीसाठी हेरगिरी करत. उदा. वल्लभ गंगादास हा सुरतेचा व्यापारी शिवाजीसाठी हेरगिरी करत होता. काही पोर्तुगीजही महाराजांचे हेर होते. हेरांनी खात्रीची बातमी आणल्यास व चातुर्य दाखविल्यास त्यांना भरपूर बक्षिसे देण्यात येत असत. हेरांना शिवाजी भरपूर पगार देत असे असा उल्लेख इंग्रजांच्या पत्रातून आढळतो. धार्मिक धोरण शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण अत्यंत सहिष्णुतेचे होते. सर्व धर्म श्रेष्ठ असून परमेश्वर हा एकच आहे असा महान विचार महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये आढळतो. ते पत्रात लिहितात की, 'मशिदीमध्ये परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी भक्तजन बांग देतात तर मंदिरामध्ये घंटानाद करतात. ही सृष्टी म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेले एक उत्कृष्ट चित्र आहे.' अशाप्रकारचे मौलिक विचार शिवाजी महाराजांचे होते. स्वराज्यामध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा महाराजांनी दिलेली होती. साधुसंतांचा आदर करणे, सांस्कृतिक परंपरा जतन करणे आणि धर्मस्थानांचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे महाराज मानत असत. हिंदू मंदिराप्रमाणे मुसलमानांच्या धर्मस्थानांनाही त्यांनी उदारपणे देणग्या दिलेल्या आढळतात. सभासदाने आपल्या बखरीमध्ये महाराजांनी धर्मादाय व्यवस्था कशी लावली होती त्याचे वर्णन केलेले आहे, 'मुलखात देव देवस्थान जागाजागा होती त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक, स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर, मशीदी, त्यांचे दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालविले...' सर्व धर्मांना श्रेष्ठ मानत असल्यामुळे शिवाजी महाराज सहिष्णू वृत्तीचे होते. म्हणूनच आपल्या पदरी कितीतरी मुसलमान सरदार त्यांनी नेमले होते. दौलतखान हा आरमाराचा प्रमुख होता. तर मदारी मेहतर हा महाराजांचा आवडता सेवक होता. शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाची समकालीन दरबारी लेखकांनी स्तुती केलेली आढळते. खाफीखान लिहितो की, 'शिवाजीने आपल्या सैनिकांकरीता असा सक्त नियम केला होता की, सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूटालूट करण्यास जातील तेथे तेथे त्यांनी मशीदीस, कुराणग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशीस अगर त्रास देऊ नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ त्याच्या हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकराचे स्वाधीन करीत असे.' शिवाजी महाराजांनी अनेक मंदिर बांधण्यास उत्तेजन दिले. रायगडावर जगदिश्वराचे मंदिर बांधले. सप्तकोटीश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. प्रतापगडावर शिवरायाच्या कार्याचे स्वरूप ११७

तुळजाभवानीचे मंदिर बांधले दक्षिणेच्या. स्वारीत जिंजीच्या शिवमंदिराची पुनर्स्थापना केली. तेथील दीपोत्सव सुरू केला. शिवाजी महाराजांनी अनेक साधुसंतांना वर्षासने दिलेली आढळतात. चिंचवडचे मोरया गोसावी, पारगावचे मौनीबुवा, केळशीचे बाबा याकुत या सत्पुरुषांवर महाराजांची श्रद्धा होती. संत तुकारामाचाही महाराजांना आदर होता. समर्थ रामदार स्वामीविषयी त्यांच्या मनात विलक्षण श्रद्धा होती. म्हणूनच युवराज संभाजीला युवराज संभाजीला सज्जनगडावर पाठविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे कार्य परस्परपूरक होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कार्यासाठी मावळ भागातील सर्वसामान्य लोकांना प्रेरित केले, त्यांना स्वातंत्र्याचा मंत्र सांगितला आणि त्यांचा स्वाभिमान जागृत केला. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे जीवनाविषयी व देशकार्याविषयी उदासीन झालेल्या जनतेला रामदास स्वामींनी क्षत्रियांची कर्तव्ये सांगितली आणि प्रपंचाचा अर्थ समजावून सांगितला. बलोपासना आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी समर्थांनी सामान्य लोकांना प्रेरणा दिली, मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि आखाडे स्थापन करण्यास उद्युक्त केले. शिवाजीच्या धार्मिक धोरणाचा एक विशेष म्हणजे अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता त्यांना मान्य नव्हती. शहाजीच्या मृत्यूनंतर जिजाबाई जेव्हा सती जाण्याची तयारी करू लागली तेव्हा महाराजांनी तिला त्या विचारापासून परावृत्त केले. परधर्मात गेलेल्या स्वकीयांना शुद्धीकरण करून पुन्हा आपल्या धर्मात सामावून घेण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच पुरोगामी होती. शिवाजी महाराजांवर रागावून नेताजी पालकर मुघलांकडे गेला होता. औरंगजेबाने त्याचे धर्मांतर करून त्याला मुसलमान केले आणि मुघलातर्फे लढण्यासाठी काबुलच्या सरहद्दीवर पाठविले. काही वर्षांनी नेताजी पालकरला पश्चात्ताप झाला आणि तो शिवाजी महाराजांकडे परत आला. महाराजांनी उदारपणे क्षमा केली. एवढेच नव्हे तर त्याचे शुद्धीकरण करून त्याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतले. मुघलाकडे बरीच वर्षे असलेला आणि मुसलमान बनून मुघलांतर्फे काबूलकडे लढणारा हा पराक्रमी पुरुष आपल्याकडे विश्वासाने परत आला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला पुन्हा स्वराज्य कार्यात सामावून घेतले. शुद्धीकरणाची शिवाजी महाराजांनी सुरू केलेली परंपरा भावी काळातील छत्रपतींनी चालू ठेवली याचे पुरावे इतिहासामध्ये मिळतात. संस्कृती रक्षणाचे आणि आत्मसन्मान वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही शिवाजी महाराजांनी केलेले आढळते. तत्कालीन मराठी भाषेमध्ये, विशेषतः राजकीय पत्रव्यवहारामध्ये फारसी शब्दांचा भरणा एवढा वाढला होता की मराठी ११८ छत्रपती शिवाजी महाराज

भाषा झाकाळून गेली होती. भाषेचे शुद्धीकरण करण्यासाठी रघुनाथ पंडिताकडून 'राज्यव्यवहारकोश' महाराजांनी तयार करवून घेतला. राज्याभिषेकापासून नवीन कालगणना सुरू केली. व्याकरण, ज्योतिष या विषयावरील ग्रंथ लिहून घेतले. जातीजातीमधील तंटेबखेडे दूर करण्यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केलेले आढळतात. ब्राह्मण आणि प्रभू या दोन उच्च जातींमध्ये वर्षानुवर्षे कलह चाललेला होता. शिवाजी महाराजांनी गागाभट्टाच्या सहाय्याने तो कलह दूर केला आणि या दोन्ही जातीत सामंजस्य निर्माण केले. गुलामगिरीची प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा महाराजांनी प्रयत्न केलेले आढळतात. न्याय व्यवस्था न्यायव्यवस्थेबाबत शिवाजी महाराजांनी पंचायतपद्धतीच्या न्यायव्यवस्थेला प्राधान्य दिलेले आढळते. पंचायतपद्धती ही परंपरागत न्यायपद्धती होती. रूढीपरंपरेप्रमाणे चालत आलेले कायदे आणि प्रत्येक जातीनिहाय रूढ असलेले कायदे यांचा विचार करून गावपंचायत न्यायदान करीत असे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दगाबाजी करणे किंवा शत्रुपक्षाला जाऊन मिळणे यांची चौकशी करण्याचे काम सुभेदाराकडे किंवा देशाधिकाऱ्याकडे असे शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळाकडे न्यायाधीश हा एक प्रधान होता. स्वराज्यातील न्यायदानाची जबाबदारी न्यायाधीश या प्रधानावर असे. अत्यंत महत्त्वाचे खटले प्रत्यक्ष महाराजांसमोर चालत असत. गोतसभेचे काही निवाडे महाराजांच्या उपस्थितीत झालेले आढळतात. धर्मविषयक खटले पंडीतराव या प्रधानापुढे चालत असत. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील ब्रह्मवृंद त्या त्या भागातील धर्मविषयक न्यायनिवाडे करीत असत. नैतिक गुन्ह्याविषयी स्वतः महाराज अत्यंत संवेदनशील होते. स्वराज्याची स्थापन केली त्या सुमारास एका गावच्या पाटलाने व्याभिचार केल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याचा एक हात व एक पाय तोडून महाराजांनी कडक शिक्षा केली होती. स्वराज्याशी बेइमान होणाऱ्या अधिकाऱ्यांना ते कडक शासन करीत असत. अफजलप्रकरणी खंडोजी खोपडे या देशमुखाचे हातपाय तोडून त्यांनी बेइमानीचे फळ दिले होते. स्वराज्यातील स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी शत्रुपक्षातील स्त्रियांना आणि मुलांना जर कोणी पकडून आणले तर त्यांनाही महाराज शिक्षा करीत असत आणि साडी चोळीचा सन्मान देऊन स्त्रियांना परत पाठवीत असत. खाफीखान लिहितो की, 'शत्रू पक्षाकडील स्त्री सैनिकांनी पकडून आणली तर त्या स्त्रीचा सन्मान करून महाराज तिला तिच्या नातलगांकडे पाठवून देत असत. शिवरायाच्या कार्याचे स्वरूप ११९

नुतन सृष्टीचा जनक केवळ ३०-३५ वर्षांच्या काळात स्वराज्याची स्थापना करून त्याचा चौफेर विस्तार करण्याचे अलौकीक कार्य शिवाजी महाराजांनी केले. शेकडो वर्षे पारतंत्र्याच्या मगरमिठीत सापडलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. अस्मिता जागृत केली. स्वाभिमान शिकविला आणि नवा महाराष्ट्र उभा केला. केवळ स्वतंत्र राज्य स्थापन करणे एवढेच शिवाजी महाराजांचे ध्येय नव्हते तर राज्यातील सर्व सामान्य जनता सुखी झाली पाहिजे हे त्यांच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते. सामान्य जनतेला काडीचाही उपसर्ग पोहचू नये, शेतकऱ्यांची दैन्यावस्था संपली पाहिजे, स्वराज्यातील व्यापार समृद्ध झाला पाहिजे, साधुसंतांना निर्भयपणे उपासना करता आली पाहिजे, सर्व जातींना संरक्षण मिळाले पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान राखला गेला पाहिजे असे कितीतरी पैलू शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये होते. विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धिस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरूष होते असे म्हणणे सार्थ ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपात पहात होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे 'महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली.' समारोप “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, न्यायदानात निःस्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली, पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले, सर्व धर्मांना समान लेखले, साधुसंतांचा यथोचित आदर केला, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरूष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरूष होता.” ❑❑❑ १२० छत्रपती शिवाजी महाराज

नाव : प्रल्हाद नरहर देशपांडे जन्मस्थळ : पंढरपूर (जि. सोलापूर) जन्मतारीख : १७ सप्टेंबर १९३६ शिक्षण : एम्.ए.पीएच.डी. अध्यापन काळ : १९६९-१९९६, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे पीएच.डी. : पाच विद्यार्थी पीएच.डी. उत्तीर्ण मार्गदर्शक माजी अध्यक्ष : अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद व संस्थापक सदस्य अध्यक्ष व : खानदेश इतिहास परिषद, भारतीय विद्या प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष : अ. म. इतिहास परिषदेचे यवतमाळ अधिवेशन, १९९९ समिती सदस्य : पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यशवंतराव (भूतपूर्व) चव्हाण मुक्त विद्यापीठ, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य तंजावर पेपर्स कमिटी इत्यादी मुख्य चिटणीस : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे इतिहास विषयक : १४ ग्रंथ महत्त्वाचे ग्रंथ : (१) शिवाजी महाराजांची पत्रे (२) महाराष्ट्र संस्कृती (३) मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष कथासंग्रह : २ अनेक शोधनिबंध, ललित साहित्य प्रकाशित. संपादक : 'संशोधक' त्रैमासिक (२२ वर्षांपासून संपादन) या त्रैमासिकाला महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार मिळाला. 'राजगड' आणि 'रायगड' ही दोन पुस्तके महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून प्रकाशित. RAJA BADSAL