छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
उल्लेखावरून शिवाजी साक्षर होता हे स्पष्ट होते. ९१ कलमी बखरीमध्ये शहाजीच्या आज्ञेप्रमाणे दादोजी कोंडदेवाने चिरंजीवास म्हणजे शिवाजीस शहाणे केले असा उल्लेख आहे. हा एकच पुरावा शिवाजीच्या साक्षरतेची खात्री पटविण्यास पुरेसा आहे. बारा मावळांवर प्रभुत्व इ. स. १६४०-४१ मध्ये शिवाजी आणि जिजाबाई शहाजीच्या बोलावण्यावरून बंगलोरला गेले होते. तेथेच निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी शिवाजीचा विवाह झाला. त्यानंतर इ.स. १६४२ मध्ये जिजाबाई व शिवाजी पुण्यास परतले. वर सांगितल्याप्रमाणे त्यांचेबरोबर शामराज निळकंठ, सोनोपंत डबीर वगैरे मंडळी तैनातीसाठी होते. पुण्यास आल्यानंतर शिवाजीच्या कर्तृत्वाला प्रारंभ झाला. या सुमारास शिवाजीचे वय केवळ १२ वर्षांचे होते. दादोजी कोंडदेवच्या अनुभवाचा लाभ घेऊन या १२ वर्षांच्या मुलाने पुण्याच्या परिसरातील १२ मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणले. सभासदाने असे म्हटले आहे की ‘पुण्यास येताच शिवाजीने १२ मावळे जिंकले’. वास्तविक पाहता हा १२ मावळांचा प्रदेश शहाजीच्या मूळ जहागिरीमध्ये नव्हता. शहाजी महाराजांच्या जहागिरीत इंदापूर, पुणे, सुपे व चाकण एवढे चार परागणे होते. हा मुलूख म्हणजे आजचे इंदापूर, भीमथडी, दौंड, पुरंदर, हवेली हे तालुके आणि भीमेच्या दक्षिणेकडील खेड तालुक्याचा पूर्वभाग यातला मुलूख. शहाजीच्या जहागिरीच्या मावळत्या बाजूस डोंगराळ प्रदेश होता. आजचे मुळशी, वेल्हे आणि भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुके व वाई हा सातारा जिल्ह्यातील प्रदेश शहाजीच्या मूळच्या जहागिरीत नव्हते. परंतु दादोजी कोंडदेवच्या सुभेदारीमध्ये होते. हा प्रदेश मावळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. त्यातील बारा मावळे म्हणजे अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कोरबारसे मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, गुंजण मावळे, कानद खोरे, वेळवंड खोरे, हिरडस मावळ व रोहिड खोरे. दादोजी कोंडदेव सुभेदार या नात्याने मावळ प्रदेशाची व्यवस्था पहात असत. दादोजीने शेतकऱ्यांना अभयदान दिले. लावणी-संचणीची उत्कृष्ट व्यवस्था केली. चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मावळ भागातील देशमुखाशी ममतेने वागून त्यांना आपलेसे केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या देशमुखांना कडक शासने केली. अशाप्रकारे मावळ प्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्याचे कार्य दादोजी कोंडदेवने केले. या काळात बाल शिवाजी दादोजी बरोबर मावळच्या दुर्गम १८ छत्रपती शिवाजी महाराज
डोंगराळ प्रदेशात फिरत होता. या परिसराची अचूक माहिती या काळातच शिवाजीला झालीय. स्वराज्य कार्यास प्रारंभ १७ एप्रिल १६४५ रोजी शिवाजीने दादोजी नरसप्रभू देशपांडे यास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असा स्पष्ट उल्लेख असून या पत्रातच हिंदवी स्वराज्य हाही शब्द आलेला आहे. परंतु राजवाड्यासारखे इतिहासकार हे पत्रच संशयास्पद किंवा बनावट मानतात. शिवाय शिवाजीच्या दुसऱ्या कोणत्याही पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य हा शब्द आलेला नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित १६४५ पासून शिवाजीच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना आकार घेऊ लागली होती. २८ जानेवारी १६४६ या तारखेचे शिवाजीचे न्यायनिवाडाविषयक एक पत्र उपलब्ध असून ह्या पत्राच्या शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते. प्रतिपच्चंद लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥ शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ॥ पत्राच्या अखेरीस 'मर्यादेयं विराजते' ही दुसरी मुद्रा दिसून येते. शिवाजीची उपरोक्त मुद्रा म्हणजे त्याच्या स्वराज्य कार्याचा प्रारंभ झाल्याची साक्ष आहे. अस्सल पुराव्यांची छाननी केल्यास १६४७ पासून शिवाजीने स्वराज्यकार्य द्रुतगतीने सुरू केलेले आढळते. ७ मार्च १६४७ रोजी दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहाजीच्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी शिवाजीवर आली. स्वतंत्र वृत्तीच्या शिवाजीने स्वराज्य स्थापण्याचा धाडशी उद्योग हाती घेऊन आदिलशहासारख्या शत्रूंना आश्चर्यचकीत केले. १६४७ मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले शिवाजीने ताब्यात घेतले. १६४७ च्या दिवाळीत पुरंदरचा किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला. याचवर्षी पुण्याचा हवालदार आणि सिंहगडचा किल्लेदार यांच्याशी स्नेह जोडून शिवाजीने कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला. अशाप्रकारे केवळ एका वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड हे चार महत्त्वाचे किल्ले शिवाजीने ताब्यात घेतले. शिवाजीचे किल्ले घेण्याचे धोरण आदिलशहास मोठे भयप्रद वाटले. शिवाजीच्या या हालचालीला शहाजीची फूस आहे असा संशयही आदिलशहाला आला. तेव्हा आदिलशहाने मुस्ताफा खान व बाजी घोरपडे यांना कर्नाटकात शिवरायांचा उदय १९
पाठवून शहाजीला कैद केले. आणि त्यानंतर अफजलखानाने शहाजीला पायात बेड्या घालून विजापूरला आणले. शहाजीला पकडल्यानंतर आदिलशहाने शिवाजीविरुद्ध फत्तेखान या सरदारास पाठविले. शिवाजी पुरंदरच्या किल्ल्यावर असल्याचे समजताच फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला. पण शिवाजीच्या मावळ्यांनी असा प्रखर प्रतिकार केला की फत्तेखानाला पळून जावे लागले. आदिलशहाने शहाजीचा थोरला पुत्र संभाजी याचेविरुद्धही फऱ्हादखान आणि तानाजी दुरे यांना पाठविले होते. पण हे दोघेही अपयश पदरात घेऊन परत आले. या पराभवामुळे आदिलशहा अधिकच संतप्त झाला. शहाजीला किती दिवस अटकेत ठेवावे हा प्रश्नही आदिलशहापुढे होता. कारण आदिलशाहीतील मराठा सरदारांमध्ये असंतोष वाढू लागला होता. तेव्हा शहाजीची सुटका करण्यासाठी शिवाजी व संभाजी यांच्यावर दडपण आणून महत्त्वाचे किल्ले परत मिळवावेत आणि आपली प्रतिष्ठा सांभाळावी असा विचार आदिलशहाने केला. त्याप्रमाणे कोंढाणा, बंगळूर व कंदर्पी हे ३ किल्ले शिवाजी आणि संभाजी यांनी आपल्या ताब्यात द्यावेत म्हणजे शहाजीची सुटका करण्यात येईल अशी अट त्याने घातली. हे ३ किल्ले ताब्यात घेतल्यावर शिवाजी आणि शहाजी या दोघांच्याही हालचालीवर नियंत्रण करता येईल अशी आदिलशहाची अटकळ होती. शहाजीची सुटका महत्त्वपूर्ण असल्यामुळे शिवाजी आणि संभाजीने हे तीनही किल्ले आदिलशहास दिले. त्यानंतर आदिलशहाने शहाजीची सुटका केली. सुटकेनंतर कर्नाटकात येऊन शहाजीने पुन्हा आपला दबदबा निर्माण केला. शिवाजी महाराजांनाही कोंढाणा गेल्याचे विशेष दुःख झाले नाही. कारण पुरंदरसारखा महत्त्वाचा किल्ला अद्याप शिवाजीच्या ताब्यात होता. तूर्त आदिलशहाच्या वाटेस न जाता जनतेवर जुलूम करणाऱ्या उन्मत्त मराठा सरदारांना वठणीवर आणण्याचे धोरण शिवाजीने स्विकारले आणि त्याप्रमाणे आपला मोहरा जावळीच्या चंद्रराव मोऱ्याकडे वळविला. २० छत्रपती शिवाजी महाराज
४. स्वराज्याचा विस्तार जावळीचे चंद्रराव मोरे जावळीच्या प्रदेशावर सरदार मोरे यांचा अंमल होता. या मोरे घराण्यातील पुरुषांना चंद्रराव हा पिढीजात किताब होता. शिवाजीने स्वराज्यकार्यास प्रारंभ केला, त्या सुमारास जावळीवर दौलतराव मोरे (चंद्रराव) यांचा अंमल होता. या दौलतरावच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न निर्माण झाला. कारण दौलतराव निपुत्रीक होता. तेव्हा त्याच्या पत्नीने शिवथरकर मोऱ्यांपैकी यशवंतराव यास दत्तक घेऊन त्याला जावळीच्या जहांगिरीची सूत्रे दिली. विशेष म्हणजे या यशवंतरावास शिवाजीने पाठिंबा देऊन आपला प्रभाव जावळी प्रदेशात वाढविण्यास सुरुवात केली. मोरे घराण्यातील काही पुरुष यशवंतरावविरुद्ध बंड करून उठले. त्यामुळे जावळी प्रदेशात एक नवा संघर्ष सुरू झाला. या सुमारास अफजलखान हा वाईचा सुभेदार होता. शिवाजीच्या हालचाली ओळखून खानाने यशवंतरावाची जहागिरी हिसकावून घेण्याचा घाट घातला. परंतु स्वतः यशवंतराव धूर्त असल्यामुळे तो स्वतः आदिलशहाशी अत्यंत नम्रतेने व लीनतेने वागत होता. त्यामुळे खानाला त्याचेविरुद्ध कारवाई करणे अशक्यप्राय वाटू लागले. त्यात आदिलशहाने १६५५ मध्ये अफजलखानाला कर्नाटकाच्या कामगिरीवर पाठविले. आदिलशहाची मर्जी संपादन करण्यासाठी यशवंतराव मोरे शिवाजीच्या प्रदेशावर लहानसहान हल्ले करू लागला. शिवाजीचे सहकारी सिलिंबकर देशमुख यांच्याशी गुंजणमावळच्या देशमुखीवरून यशवंतरावाने भांडण उकरून काढले. सर्वात चीड आणण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवाजीच्या जहागिरीतील गुन्हेगारांना आश्रय देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. मोसे खोऱ्यातील रंगो त्रिमल या गावकुलकर्ण्याने अनैतिक कृत्य केले होते. त्याला पकडून शिक्षा करण्याची शिवाजीची इच्छा होती. या रंगो त्रिमलला यशवंतरावाने आश्रय दिला. तेव्हा जावळीच्या या उन्मत्त जहागिरदाराला शासन करण्याचे शिवाजीने ठरविले. २१
जावळी प्रदेशावर एकाचवेळी चारी बाजूने हल्ला करण्याची योजना शिवाजीने आखली. त्यासाठी बांदल, सिलिंबकर देशमुख आणि संभाजी कावजी हा महालकरी यांची नेमणूक शिवाजीने केली. ठरल्याप्रमाणे शिवाजीच्या मावळ्यांनी एकाचवेळी चारी बाजूंनी जावळी प्रदेशावर हल्ला केला. यशवंतराव मोरे आपली दोन मुले बाजी व कृष्णाजी यांच्यासह रायगडकडे पळून गेला. जानेवारी १६५६ मध्ये शिवाजीने जावळीचा मुलूख ताब्यात घेतला. शिवाजीचे सैन्य यशवंतरावाचा पाठलाग करीत रायगडापर्यंत गेले. मोऱ्यांनी हा किल्ला ३ महिने लढविला, पण शेवटी शिवाजीला शरण गेला आणि रायगडचा किल्ला त्याने मे इ.स.१६५६ मध्ये शिवाजीच्या ताब्यात दिला. जावळीच्या मोऱ्यांचे प्रकरण येथेच थांबावयास हवे होते. परंतु यशवंतरावाने शिवाजीविरुद्ध कारवाया चालू ठेवल्या. त्याचा राग येऊन शिवाजीने २७ ऑगस्ट इ.स.१६५६ रोजी यशवंतरावास ठार मारले आणि जावळी खोऱ्यावर आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. जावळी विजयामुळे शिवाजीच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशाचा मोठा विस्तार झाला. जावळीवर विजय मिळवून कोंडेनळीचा घाट, ढवळा घाट, सापळखिंड, हातलोटचा घाट, पार घाट इ. महत्त्वाच्या घाटांवर आणि खिंडीवर शिवाजीने प्रभुत्व संपादन केले. याशिवाय रायगडसारखा बुलंद किल्ला शिवाजीच्या ताब्यात आला. केवळ प्रदेश जिंकून घेणे आणि सत्ता वाढविणे एवढेच शिवाजीचे धोरण नव्हते. आपल्या स्वामित्वाखाली आलेल्या नव्या प्रदेशातील लोकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहाणे हाही शिवाजीचा उदात्त हेतू होता. सभासदाने आपल्या बखरीत म्हटले आहे की, 'जावळी सर केली. मावळे लोकांस कौल देऊन संचणी केली. प्रतापगड म्हणून नवाच वसविला.' या प्रतापगडावर शिवाजीने तुळजा भवानीचे मंदिर बांधले. जावळीचा विजय हा शिवाजीच्या आयुष्यातील मोठा विजय म्हणावा लागेल. कारण या विजयामुळे शिवाजीच्या मूळ लहान जहागिरीचा मोठा विस्तार झाला आणि स्वतंत्र राज्य स्थापनास अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली. या विजयामुळे शिवाजीचा आत्मविश्वास वाढला. जुलमी आणि उन्मत्त जहागिरदारांवर वचक निर्माण झाला. त्याचप्रमाणे शिवाजीस आपली ताकद आजमाविता आली. आदिलशहालाही शिवाजीचे वाढते बळ पाहून मोठी चिंता वाटू लागली. विशेष म्हणजे जावळीचा प्रदेश ताब्यात आल्यामुळे घाटमाथ्याप्रमाणे कोकणपट्टीचा काही प्रदेश शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाला आणि त्याच्या राज्याची हद्द २२ छत्रपती शिवाजी महाराज
थेट समुद्रापर्यंत जाऊन भिडली. त्यामुळे पश्चिमकिनाऱ्यावर सत्ता गाजविणाऱ्या जंजिऱ्याचे सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगीज यांनाही शिवाजीच्या सामर्थ्याचा धाक वाटू लागला. इंग्रज, फ्रेंच आणि डच या पाश्चात्य व्यापाऱ्यांच्या वखारीही पश्चिम किनाऱ्यावरील मोक्याच्या बंदरातून होत्या. हे पाश्चात्य व्यापारी शिवाजीचे वाढते सामर्थ्य पाहून सावध झाले. अशाप्रकारे जावळी विजयामुळे शिवाजीचा दरारा महाराष्ट्राच्या देश आणि कोकण या दोन्ही भागात निर्माण झाला. शत्रूला आपल्या पराक्रमाने आश्चर्यचकीत करून त्यांना नामोहरम करावयाचे आणि जोपर्यंत तो बेसावध आहे तोपर्यंत त्याच्या प्रदेशात जास्तीत जास्त घुसखोरी करावयाची हे शिवाजीच्या डावपेचाचे मुख्य सूत्र होते. त्या सूत्राप्रमाणे जावळी ताब्यात आल्यावर फार वेळ न दवडता ९ सप्टेंबर १६५६ रोजी संभाजी मोहिते यांचेकडून शिवाजीने वडिलोपार्जित सुपे परगणा ताब्यात घेतला. त्यामुळे आदिलशहाप्रमाणे मुघल सत्ताधिशालाही शिवाजीची दहशत वाटू लागली. शिवाजी एकामागून एक नेत्रदिपक विजय मिळवत होता. या काळात विजापूरचा सुलतान महंमद आदिलशहा हा असाध्य रोगाने आजारी होता. विजापूरच्या दरबारात बचबचपूरी माजली होती. या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन शिवाजीने कर्नाटक प्रदेशात आक्रमण सुरु केले. नोव्हेंबर १६५६ मध्ये महंमद आदिलशहा मृत्यू पावला त्यावेळी शिवाजी कर्नाटक स्वारीवर होता. विजापूरच्या नव्या सुलतानाने अली आदिलशहाने शिवाजीच्या हालचालींना कर्नाटकात पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. तरीपण १६५९ पर्यंत शिवाजीने कर्नाटकावर लहानमोठ्या स्वाऱ्या केल्या या सुमारास दिल्लीचा बादशहा शहाजहान यांचा मुलगा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. शिवाजीचा आणि त्याचा प्रत्यक्ष संघर्ष झाला नाही. पण ज्यावेळी औरंगजेबाने बिदर आणि कल्याणी या आदिलशाही प्रदेशावर हल्ले केले त्यावेळी जुन्नर या मुघलांच्या महत्त्वाच्या केंद्रावर हल्ला करुन शिवाजीने औरंगजेबाला चकीत केले. शिवाजी वाढते वर्चस्व महागात पडेल हे लक्षात घेऊन औरंगजेबाने शिवाजी विरुद्ध सरदार पाठविले. त्याचबरोबर विजापूरच्या आदिलशहाला शिवाजीच्या हालचालींना पायबंद घालण्याचा इशारा त्याने दिला. अशा परिस्थितीत औरंगजेबालाच शिवाजीबरोबर वरकरणी सलोखा प्रस्थापित करावा लागला. कारण शहाजहान बादशहा आजारी असल्याची वार्ता कळल्यावर औरंगजेबाने आपले दक्षिणेतील राजकारण तात्पुरते स्थगीत केले आणि दिल्लीकडे प्रयाण केले. दिल्लीला येताच कुटील डावपेच खेळून शहाजहान बादशहाला त्याने नजरकैदेत ठेवले आणि ५ जून १६५९ रोजी स्वतःला मुघल बादशहा म्हणून जाहीर करून घेतले. स्वराज्याचा विस्तार २३
शिवाजीने सोनोपंत वकीलास औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीस पाठविले. औरंगजेबाने जुलै १६५९ मध्ये शिवाजीला मानाची वस्त्रे पाठविली. अशाप्रकारे शिवाजी आणि औरंगजेब यांच्यामध्ये वरकरणी सलोखा निर्माण झाला. परंतु शिवाजीने आपले आक्रमणाचे धोरण कायम ठेवून कोकणातील कल्याण-भिवंडीपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणला. तसेच माहुली व इतर काही किल्ले ताब्यात घेतले. शिवाजीचा दरारा वाढला कोकणामध्ये शिवाजीची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत याची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठविले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केल्याने लखम सावंताची परिस्थिती अधिकच बिकट झाली. या संकटाला तोंड देण्यासाठी त्याने ५ मार्च १६५९ रोजी शिवाजीशी तह केला आणि त्याचे मांडलिकत्व पत्करले. लखम सावंताला मदत करून शिवाजीने रुस्तुमजमापासून त्याचे रक्षण केले. कोकणातील शिवाजीचे वाढते वर्चस्व पाहून आदिलशहाच्या दरबारात खळबळ निर्माण झाली. शेवटी शिवाजीचा बंदोबस्तासाठी अफजलखान यास पाठविण्याचे विजापूर दरबारने निश्चित केले. अफझल प्रसंग विजापूर दरबारने अफझलखानाची शिवाजीवर हेतुपुरस्सर नेमणूक केली. त्याकाळात आदिलशहाच्या दरबारात जे काही मोजके नामवंत सरदार होते त्यामध्ये अफझलखानाचा क्रमांक वरचा होता. शिवाय अफझलखान हा प्रथमपासून शिवाजीचा द्वेष करीत होता. जावळीवर शिवाजीने वर्चस्व निर्माण केले ही गोष्ट खानाला अजिबात आवडली नाही. खान शिवाजीचाच नव्हे तर शहाजीचाही द्वेष करीत असे. शहाजीला कर्नाटकातून पायात बेड्या घालून विजापूरच्या दरबारात आणण्यामध्ये खानानेच पुढाकार घेतला होता. कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत शिवाजीचा भाऊ संभाजी हा मारला गेला, या घटनेलाही खानाची कारवाई कारणीभूत होती. अशाप्रकारे खान हा भोसले घराण्याचाच वैरी होता. म्हणूनच शिवाजीला पकडण्याचा विडा त्याने विजापूरच्या दरबारात उचलला. सभासदाने आपल्या बखरीत खानाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे, “शिवाजी काय, चढे घोडियानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो.” ‘तारिखे २४ छत्रपती शिवाजी महाराज
अली'चा कर्ता रुहूल्ला हा लिहितो की, “बादशहाने अफझलखानाला जातेवेळी सांगितले होते की, शिवाजीने वाटेल ते सांगितले तरी त्याचे बिलकुल न ऐकता त्याचा नाश करावा.” डच पत्रव्यवहारामध्येही शिवाजीचा नाश करण्यासाठीच विजापूर दरबाराने अफझलखानाची नेमणूक केली होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तारिखे अली, डच पत्रव्यवहार, आदिलशाही फर्मानि इ. साधनांच्या आधारे असे स्पष्ट दिसून येते की, खानाने शिवाजीचा नाश करावा म्हणून त्याची नेमणूक विजापूर दरबाराने केली होती. शिवाजीची सावधगिरी विजापूरहून निघताना अफझलखानाने शिवाजीच्या प्रदेशात दहशत निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचप्रमाणे धर्मस्थळांना इजा करून शिवाजीला डिवचण्याचे क्षुद्र राजकारण त्याने केले. तुळजापूर, माणकेश्वर, करकंब, भोसे, पंढरपूर इ. धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख अज्ञानदासाच्या पोवाड्यात आढळतो. तुळजापूर आणि पंढरपूर या दोन धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख सभासदाने केला आहे. वाईकडे येताना फलटणजवळ मलवडी या ठिकाणी बजाजी निंबाळकर यास खानाने पकडले आणि हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. परंतु खानाच्या बरोबर असलेले मराठे सरदार नाईकजी राजेपांढरे यांच्या मध्यस्थीमुळे बजाजीची सुटका झाली. खानाच्या साऱ्या हालचाली शिवाजी अत्यंत सावधपणे पहात होता. आपल्या जनतेमध्ये दहशत निर्माण करून आणि धर्मस्थळांना उपद्रव देऊन खान आपल्याला अस्वस्थ आणि संतप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे हे शिवाजीने ओळखले. खानाची पावले ओळखून त्याचा प्रतिकार करण्यासाठी सावधगिरीचा मार्ग शिवाजीने स्वीकारला. १६५९ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी शिवाजीने जावळी खोऱ्यात आपला मुक्काम हलविला. लष्करी डावपेचाच्या दृष्टीकोनातून जावळीचा प्रदेश शिवाजीच्या दृष्टीने मोठा सोईचा होता. खानानेसुद्धा जावळीचा प्रदेशच शिवाजीची कोंडी करण्यास सोईचा आहे असाच विचार केलेला होता. कारण खानाने वाईची सुभेदारी केलेली होती. त्यामुळे जावळी भागातील दऱ्याखोऱ्यांची त्याला माहिती होती. सुभेदारी करीत असताना जावळी आणि वाई भागातील देशमुखांना खानाने आपल्या कब्जात आणले होते. शिवाय आदिलशहाच्या फर्मानाप्रमाणे या भागातील देशमुख खानाला मदत करतील अशी अपेक्षा होती. खानाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. स्वराज्याचा विस्तार २५
जावळीच्या मोऱ्यांपैकी प्रतापराव मोरे हा खानास येऊन मिळाला होता. जावळीच्या खोऱ्याचा बारीकसारीक तपशील प्रतापरावाला माहित होता. वाई- जावळी या प्रदेशाची निवडही खानाने हेतुपुरस्सरच केली. खानाजवळ १२,००० अश्वदळ आणि १०,००० पायदळ होते. शिवाय ७५ मोठ्या तोफा आणि सुमारे ४०० लहान पहाडी तोफा खानाजवळ होत्या. शिवाजीकडे १०,००० अश्वदळ व १०,००० पायदळ होते. वाईला आल्यानंतर खानाने शिवाजीच्या राज्यात धुमाकूळ घालण्यासाठी वेगवेगळ्या भागात शिरवळ भागात पांढरे, तर सुपे भागात जाधव, सासवडकडे खराडे तर पुण्याकडे हिलाल आणि कोकणामध्ये सैदखान ह्यांना खानाने दहशत निर्माण करण्यासाठी ससैन्य पाठविले. खानाच्या या सरदारांनी शिवाजीच्या राज्यात धुमाकूळ घातला. आपल्या प्रदेशाची नासाडी चाललेली पाहून शिवाजी नामोहरम होईल असा खानाचा कयास होता. पण खानाच्या सरदारांनी उठविलेल्या या वावटळीकडे शिवाजीने पूर्ण दुर्लक्ष केले. तेव्हा शिवाजीची प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय खानाने घेतला. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा प्रथम शिवाजीला जाऊन भेटला. शिवाजीने भेटीची अनुकूलता दर्शविली आणि त्यानंतर आपला वकील पंताजी गोपीनाथ याला खानाकडे पाठविले. वकीलांच्या भेटीगाठी चालू असताना खानाच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा शिवाजीने प्रयत्न चालविला. शहाजीला खानाने दिलेली वागणूक आणि थोरला भाऊ संभाजी याच्या पारिपत्यास कारणीभूत झालेल्या खानाच्या कारवाया शिवाजीला माहित होत्या. खान दगाबाजी करण्यात पटाईत आहे याचीही कल्पना शिवाजीला होती. कर्नाटकातील शिऱ्याचा राजा कस्तुरीरंगा याला भेटीस बोलावून १६३८ मध्ये खानाने त्याला दगाबाजीने मारले होते. शिवाजीचे वकील पंताजी गोपीनाथ यांनी खानाच्या गोटाची चाहूल घेऊन भेट घेण्यापाठीमागे खानाचा अंतस्थ हेतू काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला. सभासदाने आपल्या बखरीत म्हटले आहे की, 'पंताजी पंताने खानाच्या मनात दुष्टबुद्धी आहे' असा इशारा शिवाजीला दिला होता. त्यामुळे शिवाजीने अधिक सावधगिरी बाळगण्याचे ठरविले. अफझलखानाचा वध खान आणि शिवाजी यांच्या वकीलांनी भेटीगाठी घेऊन भेटीची तारीख १० नोव्हेंबर १६५९ ही निश्चित केली. शिवाजी आणि खान यांच्या भेटीचा संपूर्ण तपशील दोन्ही वकिलांनी ठरविला. प्रतापगडाच्या माचीवर मार्गशिर्ष २६ छत्रपती शिवाजी महाराज
शु. ॥ सप्तमी, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्हाच्या वेळी शिवाजी आणि अफझलखान यांची भेट होईल असे ठरविण्यात आले आणि त्यावेळी दोघांजवळ प्रत्येकी दोन सेवक राहतील, प्रत्येकाचे १० अंगरक्षक बाणाच्या टप्प्यापलीकडे उभे रहातील, दोघांनीही सशस्त्र यावे असा तपशील ठरविण्यात आला व तो दोघांनाही मान्य झाला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी मध्यान्हाच्यावेळी अफझलखान प्रतापगडच्या माचीवर येऊन पोहचला. शिवाजीनेही खानाच्या भेटीची तयारी केली. स्वसंरक्षणासाठी त्याने चिलखत आणि शिरस्त्राण घातले. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात कृपाण अशी दोन शस्त्रे शिवाजीने घेतली. जिऊमहाला आणि संभाजी कावजी हे दोन हुद्देकरी बरोबर घेतले. खानाच्या बरोबरही दोन हुद्देकरी होते पण त्याशिवाय सय्यद बंडा हा धारकरीही होता. शिवाजीने हरकत घेतल्यावर सय्यद बंडाला मंडपाबाहेर पाठविण्यात आले. प्रतापगडच्या माचीवर खानासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला होता. या शामियान्यातच शिवाजी व अफझलखान यांची भेट होणार होती. ठरल्याप्रमाणे भर मध्यान्हाच्या वेळी शिवाजीने खानाला भेटण्यासाठी शामियान्यात प्रवेश केला. शिवाजीला पहाताच खानाने आलिंगन देण्यासाठी हात पसरविले. शिवाजी अत्यंत सावधपणे पुढे गेला. खानाने शिवाजीला बाहुपाशात घेऊन त्याचे मस्तक काखेत दाबून धरले. त्यानंतर खानाने शिवाजीच्या डाव्या कुशीत जमदाड (खंजीर) खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु अंगात चिलखत असल्यामुळे तो वार शिवाजीला लागला नाही. यावेळी सावधचित्त असलेल्या शिवाजीने मोठ्या चपळाईने आपली मान सोडवून घेतली आणि आपल्या हातात असलेली कृपाण खानाच्या पोटात खुपसून त्याचा वध केला. खानाच्या सेवकाने शिवाजीवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा वार चुकवून शिवाजीने त्याला ठार मारले. खान पडल्याचे लक्षात येताच सय्यद बंडा हा मोठ्या त्वेषाने धावून आला. पण जीऊमहालाने त्याला मध्येच अडवून ठार केले. खानाचा वध झाल्यावर शिवाजीने किल्ल्यावरून इशारतीच्या तोफा डागल्या. पूर्वनियोजित संकेताप्रमाणे शिवाजीचे सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलमय प्रदेशात विखुरलेले होते. इशारतीचे आवाज येताच शिवाजीच्या सैन्याने खानाच्या सैन्यावर हल्ला केला. कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव, सिलिंबकर देशमुख इ. सरदारांनी अतुल पराक्रम गाजवून खानाच्या सैन्याची अक्षरशः वाताहत केली. अशाप्रकारे अचानक युद्धाला तोंड द्यावे लागेल स्वराज्याचा विस्तार २७
असे विजापूरी सैन्याच्या स्वप्नातही नव्हते. त्यामुळे त्यांची अक्षरशः फजिती झाली. विजापूरी फौज सैरावैरा धावत सुटली. खानाचा मुलगा फाजलखान हा प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने निसटून गेला. खानाकडील हत्ती, उंट, घोडी व लाखो रुपयांचे जडजवाहीर मराठ्यांना लुटीत मिळाले. विजापुरी सैन्यातील अनेक सैनिक व अंमलदार शिवाजीला शरण आले. त्यांना अभय देण्यात आले. युद्ध संपल्यावर युद्धात ज्यांनी बहुमोल कामगिरी बजावली अशा शूर मराठ्यांना शिवाजीने भरपूर बक्षिसी दिली. पण त्याचबरोबर ज्यांनी विश्वासघात केला त्यांना कडक शासनही केले. खंडोजी खोपडे या देशमुखाने विश्वासघात करून खानाला मदत केली होती. शिक्षा म्हणून त्याचा एक हात व एक पाय तोडण्यात आला. पंताजी गोपीनाथ यांना अलंकार व वस्त्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. १६६० च्या अखेरीस शिवाजीने जाहिरनामा काढला. त्यान्वये अफजलखानाचा वध होण्यापूर्वी पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती या परगण्यातील ज्या ज्या हिंदूंकडे आणि मुसलमानाकडे इनामे आहेत ती पुढेही तशीच चालत राहतील असे जाहिर करण्यात आले. मराठ्यांच्या इतिहासात अफझलप्रसंगाला विशेष महत्त्व आहे. या घटनेनंतर सारा मावळ प्रदेश आणि जावळी खोऱ्याचा प्रदेश शिवाजीच्या पूर्ण स्वामित्वाखाली आला. पारतंत्र्यात खितपत असलेल्या या भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला. शिवाजीविषयी मोठा आदरभाव जनतेमध्ये निर्माण झाला. या भागातील देशमुख, देशपांड्यांसारख्या वतनदारांनाही शिवाजीची महती कळून आली आणि बहुसंख्य वतनदारांनी शिवाजीचे स्वामित्व मान्य केले. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने स्वराज्य आकारास आले. शिवाजीच्या सरदारांतही मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. याचे प्रतिक म्हणजे या घटनेनंतर केवळ १५ दिवसात पन्हाळ्यासारखा दुर्गम किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. (२८ नोव्हेंबर १६५९) खानाच्या लष्करातले पांढरे, खराटे, सिद्दी हिलाल यासारखे अनेक सरदार शिवाजीकडे चाकरीसाठी आले. त्यामुळे शिवाजीच्या सामर्थ्यात भर तर पडलीच, परंतु आदिलशहासारखा बलाढ्य शत्रूही भयचकीत झाला. पन्हाळ्यात शिवाजी मोठा पराक्रम गाजवून शत्रूला चकीत करायचे आणि शत्रू बेसावध झालेला पाहून त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावयाचा हा शिवाजीच्या रणनीतीचा भाग होता. अफझलप्रसंग घडल्यानंतर शिवाजीने एकदम तीन स्वाऱ्यांची २८ छत्रपती शिवाजी महाराज
आखणी केली. जानेवारी १६६० मध्येच नेताजी पालकरला विजापूरच्या प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. नेताजीने लक्ष्मीश्वरपर्यंत मजल मारून अनेक ठिकाणी खंडण्या वसूल केल्या. याच महिन्यात एक तुकडी शिवाजीने कोकणमध्ये पाठविली. राजापूर बंदरात खानाची काही जहाजे होती. ती ताब्यात घेण्यासाठी या तुकडीची रवानगी करण्यात आली होती. तिसरी स्वारी शिवाजीने स्वतःच्या नेतृत्त्वाखाली काढली. मिरजेपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून विजापूर दरबारात मोठी खळबळ शिवाजीने उडवली. तेव्हा आदिलशहाने सिद्दी जौहर या बलाढ्य सरदाराची शिवाजीविरुद्ध नेमणूक केली. प्रचंड तयारीनिशी सिद्दी जौहर शिवाजीशी सामना करण्यासाठी निघाला. ती बातमी कळताच शिवाजीने पन्हाळा किल्ल्याचा आश्रय घेतला. तेव्हा मार्च १६६० च्या प्रारंभी सिद्दी जौहरने पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा घातला. सिद्दी जौहरबरोबर सिद्दी मसऊद, भाईखान आणि अफझलखानाचा मुलगा फाजलखान तसेच बाजी घोरपडे हे नावाजलेले सरदार होते. जौहरचे एकूण सैन्य १५,००० असल्याचा उल्लेख समकालीन इंग्रजी पत्रामध्ये सापडतो. विशेष म्हणजे इंग्रज वखारवाल्यांनी हेन्री रेव्हिंग्टन याला तोफा व दारूगोळा देऊन जौहरच्या मदतीसाठी पाठविले. पन्हाळा किल्ल्यात शिवाजीसमवेत ५- ६ हजार एवढे सैन्य होते. किल्ल्याला वेढा घालून ३ महिने झाले तरी प्रत्यक्ष चढाई जौहरकडून होत नव्हती. पावसाळा तोंडाशी आल्यामुळे सिद्दी जौहर वेढा काढून घेईल असे शिवाजीला वाटत होते. परंतु पावसाळ्यातही वेढा चालू राहिल अशी तजवीज सिद्दी जौहरने करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवाजापुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला. नेमक्या या संधीचा फायदा घेऊन मुघलांतर्फे बलाढ्य सरदार शायिस्तेखान हा प्रचंड फौज घेऊन शिवाजीच्या प्रदेशात धुमाकूळ घालून पुण्यापर्यंत येऊन थडकला होता. अशाप्रकारे दुहेरी संकटात शिवाजी सापडला होता. राजमाता जिजाबाईंच्या आज्ञेप्रमाणे नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल यांनी बाहेरून जौहरचा वेढा मोडून काढण्याची शिकस्त केली पण त्यांना यश आले नाही. पन्हाळ्यातून सुटका सिद्दी जौहरशी तहाची बोलणी सुरू केल्यावर वेढ्याला शिथिलता येईल अशी शिवाजीची अटकळ होती आणि वेढ्याला शिथिलता प्राप्त झाल्यावर एखादे अलौकीक साहस करून आपली सुटका करून घेता येईल असा बेत शिवाजीने आखला, जून १६६० च्या अखेरीस शिवाजीने जौहरशी तहाची स्वराज्याचा विस्तार २९
२. तोरणा दुर्ग विजय व जावळी का अधिग्रहण
बोलणी सुरू केली. शिवाजीच्या अपेक्षेप्रमाणे वेढ्याला काहीशी शिथिलता प्राप्त झाली. ते पावसाळ्याचे दिवस होते. आषाढ महिन्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे तर वेढ्याला अधिकच शिथिलता आली. या संधीचा फायदा घेऊन पन्हाळ्याहून निसटून जाण्याचे शिवाजीने ठरविले. आषाढ वद्य प्रतिपदा शके १५८२ म्हणजे १२ जुलै १६६० रोजी गुरुवारी मध्यरात्री निवडक लोकांसह गस्तवाल्यांची नजर चुकवत शिवाजीने पन्हाळ्याहून सुटका करून घेतली. काळीकुट्ट रात्र, वादळी हवा, विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस अशा या निसर्गाच्या रौद्र तांडवाला तोंड देत आडवाटेने शिवाजी राजेंनी विशालगडाकडे कूच केली. काही वेळाने शिवाजी गडावरून निसटल्याचे सिद्दी जौहरच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब सिद्दी मसऊद यांना मोठी फौज देऊन शिवाजीच्या पाठलागावर पाठविले. पन्हाळा ते विशालगड हे अंतर ४० मैलांचे होते. जवळजवळ ३५ मैल अंतर कापून शिवाजी गजापूरच्या खिंडीपर्यंत पोहचला. अद्याप ५-६ मैल अंतर तोडावयाचे होते. तेवढ्यात सिद्दी मसऊदच्या फौजेची चाहूल लागली. प्रसंग मोठा बाका होता. अशा या अवघड प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे याने शिवाजीला निर्धास्तपणे विशालगडाकडे जाण्यास सांगितले आणि निवडक लोकांनिशी गजापूरखिंडीत सिद्दी मसऊदचे सैन्य रोखून धरण्याचा निर्णय घेतला. शिवाजी निवडक लोकांनिशी मोठ्या गतीने विशालगडाकडे निघाला. पण विशालगडाच्या पायथ्याशी आणखी एक मोठे संकट शिवाजीपुढे उभे राहिले. आदिलशहातर्फे जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे या दोन मराठे सरदारांनी विशालगडला अगोदरच वेढा घालून ठेवला होता. या दोन्ही मराठा सरदारांबरोबर शिवाजीने निकराचे युद्ध केले. तिकडे बाजीप्रभूने पराक्रमाची शिकस्त करून गजापूरची खिंड रोखून धरली. त्याच्या समवेत बांदल देशमुखाचे निधड्या छातीचे सैन्य होते. ९१ कलमी बखरीत म्हटल्याप्रमाणे, प्रहर दीडप्रहर हे युद्ध चालले याचा अर्थ शिवाजी विशालगडावर पोहचेपर्यंत बाजी प्रभू शर्थीने लढत राहिला. त्याला अनेक जखमा झाल्या. एक घाव मर्मी लागून तो कोसळला. त्याचवेळी गडावर पोहचल्याची खूण म्हणून शिवाजीने इशारतीचे आवाज केले. राजे गडावर पोहोचले या आनंदात बाजीप्रभूने प्राण सोडले. सिद्दी मसऊद गजापूर खिंड ओलांडून विशालगडावर पोहोचला. परंतु गड अवघड असल्यामुळे आणि मराठ्यांनी निकराने विरोध केल्याने त्याला हताश होऊन परत जावे लागले. विशालगडाहून नंतर शिवाजीने राजगडाकडे ३० छत्रपती शिवाजी महाराज
प्रयाण केले या सुमारास मुघलांतर्फे शायिस्तेखान पुण्यात शिवाजीच्याच वाड्यात मुक्काम ठोकून बसला होता. त्याचे संकट दूर करणे अत्यंत निकडीचे होते म्हणून सप्टेंबर १६६० मध्ये सिद्दी जौहरशी तह करून पन्हाळा किल्ला शिवाजीने आदिलशहाच्या हवाली केला. पन्हाळ्याहून सुटका हे शिवाजीच्या अद्भूत साहस, अप्रतिम बुद्धीकौशल्य, विलक्षण पराक्रम, प्रचंड आत्मविश्वास याचे प्रतिक होते. शिवाजीच्या या अद्भूत साहसानंतर आदिलशहाची दैना उडाली तर दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला दक्षिणेतील सत्तेची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच पुण्यात तळ ठोकून बसलेल्या आपल्या मामाला म्हणजे शायिस्तेखानाला शिवाजीचा बंदोबस्त करण्याविषयी त्याने फर्माविले. □□□ स्वराज्याचा विस्तार ३१
५. बलाढ्य शत्रूवर मात जून १६६० मध्ये शिवाजी पन्हाळ्यावर अडकला असल्याचे पाहून मुघल सुभेदार शायिस्तेखान याने शिवाजीच्या प्रदेशावर स्वारी काढली नगरहून पुण्याच्या रोखाने येत असतांना त्याने अनेक गावे बेचिराख केली. पुरंधर किल्ल्याला वेढा घातला पण तो किल्ला त्याला जिंकता आला नाही. त्यानंतर शिवाजीची राजधानी राजगड या किल्ल्यालाही वेढा घालण्याचा त्याचा विचार होता. पण वेढा न घातला जवळपासचा प्रदेश बेचिराख करून त्याने दहशत निर्माण केली आणि तेथून तो पुणे शहरात आला व तेथे तळ ठोकला. दिल्लीहून औरंगजेबाचा तगादा आल्यानंतर शायिस्तेखानाने एक छोटी स्वारी काढली. पुणे-जुन्नर रस्त्यावर असलेल्या चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला. तेथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने मोठ्या हिकमतीने किल्ला लढविला. चाकणचा किल्ला भूईकोट असून आकाराने लहान आहे. तरीपण जवळजवळ दोन महिने वेढा देऊनही शायिस्तेखानाला किल्ला जिंकता आला नाही. अखेर १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ल्याच्या तटाला सुरुंग लाऊन शायिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकून घेतला आणि पुण्यास परतून शिवाजीच्या राहत्या वाड्यात-लाल महालात-मुक्काम ठोकला. उंबरखिंड शायिस्तेखान चाकणच्या विजयामुळे मोठ्या आनंदात होता. त्याचा हा आनंद आणखी एका कारणामुळे वृध्दिंगत झाला. मुघल सरदार कारतलबखान यास शायिस्तेखानाने मराठवाड्यातील परिंडा हा किल्ला जिंकण्यासाठी पाठविले होते. नोव्हेंबर १६६० मध्ये कारतलबखानाने परिंडा जिंकून घेतला आणि मोठ्या दिमाखाने हा विजय मिळवून तो शायिस्तेखानाकडे आला. पुणे परिसरात प्रभाव वाढविल्यानंतर शायिस्तेखानाची नजर कोकण भागाकडे वळेल याची शिवाजीला खात्री होती आणि म्हणून कोकणच्या रक्षणासाठी शिवाजीने मोक्याच्या मार्गावर संरक्षण यंत्रणा उभारल्या. कारतलबखान परतल्यावर ३२
शायिस्तेखानाने त्याची पाठ थोपटली आणि त्याला कोकणच्या मोहिमेवर पाठविले. त्याच्या समवेत चव्हाण, गाडे, कोकाटे, जाधव इ. मराठे सरदार तसेच माहूरची देशमुख स्त्री रायबागीण हीदेखील कारतलबखानाच्या स्वारीमध्ये सामील झाली. पराक्रमी स्त्री म्हणून रायबागीणचा नावलौकीक होता. कारतलबखानाने घाटमाथा ओलांडून तळकोकणाकडे जाण्यासाठी नेहमीचा हमरस्ता स्वीकारला. या मार्गावर शिवाजीचे अनेक किल्ले होते. एखाद्या किल्ल्यातून शिवाजीच्या लोकांनी प्रतिकार केला तर तो सहज जिंकून घेता येईल अशी घमेंड कारतलबखानात होती. घाटमाथ्याहून जात असतांना लोहगड, तुंग, तिकोणा इत्यादी किल्ले ओलांडून मुघल फौज पुढे गेली. परंतु मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांतून कोणताही प्रतिकार झाला नाही तेव्हा मराठे आपल्याला घाबरले असा समज करून घेऊन मोठ्या उन्मादाने कारतलबखान आंबेनळीच्या घाटापर्यंत पोहचला. आंबेनळीच्या घाटातून कोकणात उतरण्यासाठी घनदाट जंगलातून जावे लागते. या घनदाट अरण्यात मोघल फौज घुसताच चारी बाजूंनी हल्ला करण्याची योजना शिवाजीने आखली होती. या घनदाट अरण्यालाच उंबरखिंड या नावाने ओळखले जात होते. शिवभारतामध्ये परमानंदाने उंबरखिंडीच्या लढाईचे तपशिलवार वर्णन केलेले आहे. कारतलबखानाची फौज उंबरखिंडीत घुसल्यानंतर शिवाजीच्या योजनेप्रमाणे मराठ्यांनी चारी बाजूंनी एकदम हल्ला चढविला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुघलांची दाणादाण उडाली. कारतलबखान व रायबागीण दोघेही नामोहरम झाले. दोघेही शिवाजीला शरण आले. मुघल सरदाराकडून खंडण्या वसूल करून शिवाजीने सर्वांना पुण्याकडे परतवून लावले. अशाप्रकारे उंबरखिंडीच्या लढाईत मुघलांची फजिती झाली. इंग्रजांना धडा सिद्दी जौहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांनी सिद्दी जौहरला मदत केली होती. हे शल्य शिवाजीच्या मनात डाचत होते. शिवाय विशालगडाजवळ पालवणचा राजा जसवंतसिंग दळवी आणि शृंगारपूरचा राजा सुर्यराव सुर्वे ह्यांनी शिवाजीच्या मार्गात विघ्न आणले होते. त्याचा रागही शिवाजीच्या मनामध्ये होता. उंबरखिंडीची लढाई झाल्यानंतर शिवाजीने थेट दक्षिण कोकणाकडे कूच केली. संगमेश्वरच्या ठाण्यावर पिलाजी निळकंठराव आणि तानाजी मालुसरे यांना सूर्यराव सुर्वे याचा बंदोबस्त करण्यासाठी ठेवले. राजापूरला पोहचल्यानंतर शिवाजीने सर्व स्थानिक अंमलदारांकडून आणि पाश्चात्त्य व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करण्यास सुरुवात केली. इंग्रज बलाढ्य शत्रूवर मात ३३
व्यापाऱ्यांनी खंडणी देण्याची टाळाटाळ केली. पन्हाळ्यावर तोफगोळा देऊन जौहरच्या मदतीस आलेला हेन्री रेव्हिंगटन हा त्या वेळी राजापूर येथे होता. शिवाजीने त्याला व आणखी ७ इंग्रजांना कैद केले. इंग्रजांची वखार उकरून पुरून ठेवलेले द्रव्य शिवाजीने प्राप्त करून घेतले. कैद केलेल्या इंग्रजांना सोनगडच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले. हे इंग्रज बरेच दिवस शिवाजीच्या कैदेत होते. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट ॲण्ड्र्यूज याने या इंग्रज कैद्यांना कळविले की तुम्ही शिवाजीविरुद्ध जौहरला जी मदत केली त्याचे फळ तुम्ही भोगत आहात. या सर्व इंग्रजांची मोठी दयनीय अवस्था झाली. दोघे तर कैदेतच मेले. बाकीच्यांची १६६३च्या जानेवारीत सुटका झाली. शिवाजीच्या या कृतीमुळे राजापूरचे इंग्रजवखारवाले इतके धास्तवले की पुढे त्यांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला. राजापूरच्या इंग्रजांना धडा शिकवून शिवाजी परत संगमेश्वराकडे आला. जसवंतसिंग दळवीला नामोहरम करून पालवणचे राज्य त्याने जिंकून घेतले. त्याचप्रमाणे सूर्यराव सुर्वे याचेही पारिपत्य केले. अशाप्रकारे आपल्या मार्गात विघ्न आणणाऱ्या मराठे सरदारांनाही शिवाजीने धडा शिकविला. शिवाजीचा हा पराक्रम पाहून आदिलशहा एवढा नामोहरम झाला की मे १६६१ मध्ये त्याने मराठ्यांबरोबर मित्रत्वाचा तह केला. आता शायिस्तेखानाला धडा शिकविणे बाकी होते. शायिस्तेखानाची फजिती उंबरखिंडीच्या लढाईत मोठा पराभव पाऊन कारतलबखान पुण्यास परतला. त्या लढाईत मुघलांची तारांबळ उडालेली ऐकून शायिस्तेखानाचा राग अनावर झाला. आणखी काही मुघल सरदार त्याने शिवाजीच्या पाठलागावर कोकणात पाठविले. त्यापैकी सरदार बुलाखी याने पेणजवळ असलेल्या देईरी गडास वेढा घातला. परंतु मराठा सरदार कावजी कोंढाळकर याने हा वेढा मोडून काढला. मे १६६२ मध्ये नामदारखान नावाच्या सरदारास शायिस्तेखानाने उत्तरकोकणच्या मोहिमेवर पाठविले. नामदारखान जेव्हा पेणजवळ येऊन पोहचला तेव्हा अचानकपणे शिवाजीने मिरे डोंगराच्या बाजूने त्याचेवर जबरदस्त हल्ला केला. तरीपण नामदारखानने आपला बचाव केला तेव्हा मोरोपंत पिंगळे व मोरो सोनदेव यांना नामदारखानाचा बिमोड करण्यासाठी शिवाजीने पाठविले. परंतु नेमक्या याच सुमारास सिंहगडावर काही फंदफितुरी झाल्यामुळे या दोघांनाही सिंहगडाकडे जाणे भाग पडले. ३४ छत्रपती शिवाजी महाराज
इकडे पुण्यामध्ये शायिस्तेखानाने दहशत निर्माण केली होती. शिवाजीचे लोक फोडण्यासाठी आणि किल्ले ताब्यात घेण्यासाठी लाचलुचपतीच्या मार्गाचा त्याने अवलंब सुरू केला होता. त्याचेच एक प्रतिक म्हणजे सिंहगडावर फंदफितुरी झाली होती. शायिस्तेखानाचा पुण्यातील मुक्काम शिवाजीला धोकादायक वाटू लागला. काहीतरी विलक्षण साहस करून शायिस्तेखानाला पळवून लावायचे असे शिवाजीने ठरविले. ५ एप्रिल १६६३ रोजी मध्यरात्री निवडक लोक बरोबर घेऊन शिवाजीने अचानकपणे लाल महालात प्रवेश केला. ते दिवस रमजान महिन्याचे असल्यामुळे दिवसभराचा उपवास सोडून शायिस्तेखान, त्याच्या कुटुंबातील सर्व मंडळी, नोकरचाकर निद्राधीन झालेले होते. शिवाजीने लालमहालात म्हणजे आपल्याच वाड्यात प्रवेश केला होता. त्याला वाड्याचे सर्व दरवाजे आणि दालने माहित होती. अंधारातून शिवाजीची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शायिस्तेखानाच्या लोकांना लागली. मग एकच गडबड उडाली. सर्वजण जागे झाले. पळापळ सुरू झाली. स्वतः शायिस्तेखान याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला. त्याची परिणती खानाची एका हाताची बोटे तुटण्यामध्ये झाली. जो तो जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळू लागला. काही जण मराठ्यांच्या हल्ल्यात बळी पडले, काहीजण शिताफीने निसटले. बघता बघता वाडा रिकामा झाला. पुण्यात असलेल्या मुघल सैन्याला नेमके काय झाले हे समजलेच नाही. शिवाजीने हल्ला केला हे समजल्यावर ‘गनिम कोठे आहे?’ अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले. या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी आणि त्याचे लोकही ‘गनिम कोठे आहे?’ असे ओरडत गर्दीमध्ये मिसळून गेले. फजित झालेल्या शायिस्तेखानाने शेवटी आपल्या लोकांसह अहमदनगरची वाट पकडली. या संदर्भात शिवाजीचे उद्गार सभासदाने आपल्या बखरीत नमूद केले आहे, ‘फते होऊन आलो. शास्ताखानास शास्त केली. पातशाहाने नाव ठेविले परंतु नाव यथार्थ ठेविले नाही. ते नाव आपण शास्त करून नाव रुजू केले.’ पुण्याहून परतल्यावर शायिस्तेखान नगरलाही थांबला नाही. त्याने थेट दिल्लीचा रस्ता पकडला. औरंगजेबाला त्याच्या फजितीची हकिकत समजली होतीच. त्याने खानाला भेटण्यास नकार दिला आणि बंगालच्या सुभेदारीवर त्याची नेमणूक केली. शायिस्तेखानाच्या पराभवामुळे दक्षिणेत शिवाजी हा एक बलाढ्य शत्रू निर्माण झाला याची औरंगजेबाला खात्री पटली. औरंगजेबाने बलाढ्य शत्रूवर मात ३५
शाहजादा मुअज्जम याला शायिस्तेखानाच्या जागी दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमले. विलक्षण साहस आणि अद्भूत पराक्रम गाजवून आपल्या शत्रूंना चकित करावयाचे आणि स्वतः यशाच्या धुंदीत न राहता गोंधळून गेलेल्या शत्रूच्या प्रदेशात सतत हल्ले करावयाचे हे शिवाजीचे खास तंत्र होते. शायिस्तेखान दिल्लीच्या रस्त्याला लागल्याबरोबरच शिवाजीने कोकणभागावर स्वारी केली आणि कुडाळ, वेंगुर्ला इ. ठाणी जिंकून घेतली. सुरतेची पहिली लूट सुरत हे व्यापारी पेठ म्हणून सोळाव्या ते सतराव्या शतकात गाजलेले शहर होते. आर्थिक व्यवहारासाठी ते प्रसिद्ध होते. भारतातील पेढीसंबंधीचे व्यवहार या शहरातून चालत असत. शिवाय मुघल साम्राज्यातील वाहतुकीचे बंदर या दृष्टीने सुरत प्रसिद्ध होते. त्यामुळे डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी पाश्चात्यांच्या वखारी सुरत बंदरामध्ये होत्या. मुघलांच्या आश्रयामुळे हे पाश्चात्त्य वखारवाले उन्मत्तपणे वागत असत. या वखारवाल्यांना धडा शिकवला तर मुघलांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल आणि आपले महत्त्व त्यांना कळून चुकेल अशी शिवाजीची अटकळ होती. शिवाय सुरतेसारख्या समृद्ध शहरावर हल्ला करून आपल्याला चांगल्यापैकी लूट मिळेल याचीही शिवाजीला खात्री होती. मुघल सुभेदार शायिस्तेखान फजित होऊन दिल्लीकडे परतल्यावर मुघल सरदार जसंवतसिंग याने आपली बहादुरी दर्शविण्यासाठी सिंहगडला वेढा घातला होता. जसंवतसिंगाच्या वेढ्याला कोणतीही किंमत न देता शिवाजीने अचानकपणे सुरतेवर हल्ला केला. हा अचानक झालेला हल्ला पाहून मुघल सेनेची दाणादाण उडाली. पाश्चात्य वखारवाले भयभयीत झाले आणि सधन पेढीवाले आपली मालमत्ता कडेकोट बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. ६ जानेवारी ते १० जानेवारी १६६४ असे तब्बल ४ दिवस सुरत शहर शिवाजीच्या ताब्यात होते. या स्वारीमध्ये शिवाजीने प्रचंड लूट केली. शिवाजीने केलेल्या लुटीची तपशीलवार माहिती समकालीन डच व इंग्रज यांच्या पत्रातून आढळते. या लुटीला इंग्रज प्रतिनिधी अँटनी स्मिथ याने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठ्यांनी त्याला पकडले आणि ३०० रुपये दंड घेऊन त्याची मुक्तता केली. शिवाजीच्या सुरतेवरील हल्ल्यामुळे नेमके कोणते नुकसान झाले याचा अंदाज समकालीन साधनांवरून येतो. पाश्चात्य वखारवाल्यांचे नेमके किती नुकसान झाले हे पहाण्यासारखे आहे. डच कंपनीचे ३६ छत्रपती शिवाजी महाराज
नुकसान सुमारे २०,००० रुपये झाले. तर इंग्रज कंपनीचे नुकसान केवळ १००० पौंड झाले. हे आकडे लक्षात घेतल्यास परकीय वखारवाल्यांनी शिवाजीने केलेल्या लुटीचा वृत्तांत देतांना किती कांगावा केला होता हे लक्षात येते. चार दिवस शहरामध्ये मुक्काम ठोकून १० जानेवारी १६६४ रोजी शिवाजी स्वराज्याकडे परतला. परत जातांना त्यांनी लूट समुद्रमार्गे नेली असा उल्लेख पोर्तुगीज दप्तरात सापडतो. शिवाजीच्या स्वारीच्या संदर्भात वखारवाल्यांनी बराच मनोरंजक मजकूर लिहून ठेवला आहे. शिवाजीच्या लष्करी तळाविषयी डचांनी लिहीले आहे की, “शिवाजी सुरतेबाहेर दोन कोसांवर उतरला होता. त्याचाच फक्त शामियाना होता. इतर सर्व अधिकारी उघड्यावर रहात होते.” शिवाजीची छावणी अत्यंत सुटसुटीत व तात्पुरती असून लष्करातील लोकांपेक्षाही मजूर, बैल आणि रिकामे घोडे यांचा भरणा अधिक आहे अशी नोंद डचांनी केलेली आढळते. शिवाजीने सुरतेची लूट केली त्यावेळी औरंगजेब दिल्लीला नव्हता हे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. सुरतेच्या लुटीचे परिणाम औरंगजेब ज्यावेळी दिल्लीला परतला त्यावेळी त्याला सुरतेच्या लुटीची हकिकत समजली. सुरतेवर आपली सत्ता असतांना शिवाजीने आपले शहर लुटावे आणि आपल्या आश्रयाने रहाणाऱ्या पाश्चात्त्य वखारवाल्यांना उपद्रव द्यावा याचा विलक्षण संताप औरंगजेबाला झाला. सुरत शहराला तटबंदी बांधण्याचा त्याने हुकूम दिला. पाश्चात्य व्यापारांना एक वर्षाची जकात औरंगजेबाने माफ केली. शिवाय पुढील वर्षापासून अडीच टक्के जकाती ऐवजी दोन टक्के, जकात घेतली जाईल असा हुकूमही त्याने काढला. इंग्रज वखारवाल्यांनी तर शिवाजीची फार मोठी दहशत घेतली. आपली मुख्य व्यापारी पेठ सुरतेहून मुंबईला हलविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १६६४ मध्येच पोर्तुगीजांकडून मुंबई बेट इंग्रजांना मिळाले होते. मुंबईला कचेरी हलविल्यानंतर शिवाजीकडून आपल्याला संरक्षण मिळेल असा इंग्रजांचा कयास होता. शिवाजीने अलौकिक साहस करून शिघ्र गतीने सुरतेवर हल्ला केला, लूट केली आणि तितक्याच शीघ्र गतीने तो स्वराज्याला परतला. या घटनेचा पाश्चात्य वखारीतील सर्वसामान्य कामगारावरही मोठा परिणाम झाला. शिवाजीविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. ‘शिवाजीचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत’ असा अद्भूत उल्लेख एका पत्रात आलेला आढळतो. थोडक्यात मुघल प्रदेशात सर्वसामान्य बलाढ्य शत्रूवर मात ३७