छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
झुंज देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता अस्तित्वात नव्हती. अशा परिस्थितीत शून्यातून स्वराज्य निर्माण करून केवळ शाही राजवटींनाच नव्हे तर दिल्लीतील प्रबळ मुघल सत्तेलाही आव्हान केले. पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले यांनाही नामोहरम केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून एक समर्थ सार्वभौम मराठा राज्य उदयास आणले याची ग्वाही दिली. या घटनेमुळे शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाल्या. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात लावलेले हे स्वराज्याचे रोपटे पहाता पहाता बहरले, कालांतराने मोठे झाले, त्याचा वृक्ष होऊन त्या वृक्षाच्या अनेकविध फांद्या भारताच्या वेगवेगळ्या भागात पसरल्या आणि मराठी राज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शिवराज्याभिषेकाची घटना सुवर्णाक्षरांनी नमूद करण्यासारखी आहे. एका वाक्यात सांगावयाचे झाले तर 'शिवराज्याभिषेकामुळे नवे युग अवतरले.' दुसरा राज्याभिषेक राज्याभिषेकाचा मोठा सोहळा पार पडल्यानंतर काही तंत्रमार्गी ब्राह्मणांच्या आणि साधूंच्या आग्रहामुळे शिवाजीला दुसरा राज्याभिषेक करून घ्यावा लागला. या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती इतर कोणत्याही साधनात उपलब्ध नाही. ज्येष्ठ महिन्यात झालेल्या मोठ्या अभिषेकानंतर शिवाजीने दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने आश्विन शुद्ध पंचमी २४ सप्टेंबर १६७४ रोजी करून घेतला अशी माहिती 'शिवराज्याभिषेक कल्पतरू' नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथामध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपूरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'गागाभटाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरित परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजराचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, शिवाजीची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू तसेच राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाबाई हिचा झालेला मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असे अनुमान निघते की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधीपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांना पौराणिक किंवा तांत्रिक ७८ छत्रपती शिवाजी महाराज
अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. गागाभट्टाच्या अभिषेकाने काही तांत्रिक चुका दर्शविल्या. त्यामुळे दुर्दैवी घटना घडत आहेत असा निष्कर्ष या पुरोहितांनी काढला असावा. धार्मिक विधीविषयी अशा प्रकारचे मतभेद नसावेत म्हणून शिवाजी महाराजांनी दुसऱ्या राज्याभिषेकाला मान्यता दिली असली पाहिजे. त्याप्रमाणे २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. परंतु या राज्याभिषेकाचा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्य वखारवाल्यांनी किंवा फारसी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाचा ओझरताही उल्लेख केलेला आढळत नाही. विशेष म्हणजे विश्वसनीय अशा सभासद बखरीमध्ये किंवा ९१ कलमी बखरीतही या दुसऱ्या राज्याभिषेकाचे वर्णन नाही. शिवचरित्रातील अनेक घटना अचूक पद्धतीने जेथे शकावलीमध्ये नोंदविलेल्या आढळतात. त्यातही या दुसऱ्या राज्याभिषेकाची तिथी दिलेली नाही किंवा ओझरता उल्लेखही नाही. थोडक्यात हा दुसरा राज्याभिषेक तंत्रमार्गी पुरोहितांच्या समाधानासाठी शिवाजी महाराजांनी करवून घेतला ही गोष्ट स्पष्ट होते. आपल्या मुलाने - शिवाजीने शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून आपले राज्य हे सार्वभौम राज्य आहे हे सिद्ध केले या गोष्टीचा सर्वात मोठा आनंद राजमाता जिजाबाईला होणे साहजिक आहे. या सुमारास जिजामातेचे वय ७०च्या घरात होते. आपल्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा पाहिल्यानंतर या माऊलीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल यात शंका नाही. राज्याभिषेकानंतर केवळ १२च दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाईचा पाचाड येथे रहात्या घरी मृत्यू झाला. या शोककारक घटनेमुळे रायगडवरील उत्साहाचे वातावरण संपुष्टात झाले. संभाजी राजांची मुंज पुढे ढकलण्यात आली. राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर शिवाजी महाराजांना मातृवियोगामुळे दुःख झाले. पण थोर पुरुषाला आपले मन घट्ट करून कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि आपण स्वतंत्र, सार्वभौम राजे आहोत असे जाहिर केले ही गोष्ट महाराजांच्या शत्रूंना सहन होण्यासारखी नव्हती. मुघल, आदिलशहा आणि इतर शत्रूंनी महाराजांविरोधी कारवाया सुरू केल्या. अर्थात या गोष्टींची शिवाजी महाराजांना कल्पना होतीच. म्हणून १६७४च्या भर पावसाळ्यात त्यांनी आपल्या शत्रूविरुद्ध मोहिमा आखण्यास प्रारंभ केला. ☐☐☐ शिवराज्याभिषेक ७९
११. कर्नाटक स्वारी शिवाजीने ६ जून १६७४ रोजी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि आपण स्वतंत्र सार्वभौम राजे आहोत असे त्यांनी निःसंदिग्धपणे जाहिर केले. महाराजांच्या या कृतीचा मुघलांना राग येणे स्वाभाविक होते. औरंगजेब तर अतिशय प्रक्षुब्ध झाला. दक्षिणेत असलेल्या आपल्या सरदाराला - बहादूरखानला- शिवाजीविरुद्ध आक्रमक धोरण अंगिकारण्याचा त्याने इशारा दिला. बहादूरखान पेडगाव येथे छावणी करून राहिलेला होता. तो स्वतः ऐषारामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजीविरुद्ध मोहिम काढण्यामध्ये दिरंगाई करीत होता. औरंगजेबाकडून निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर बहादूरखानाने आक्रमणाची जय्यत तयारी सुरू केली. परंतु ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी अश्वदलाचे एक पथक पाठवून बहादूरखानाची छावणी लुटली. त्या लुटीमध्ये सुमारे १ कोटीचा खजिना मराठ्यांच्या हाती आला. या लुटीच्या प्रकारामुळे बहादूरखान चांगलाच हबकला. दरम्यान मराठ्यांनी खानदेशपर्यंत स्वारी करून धरणगाव लुटले आणि मराठ्यांचे हे पथक थेट बऱ्हाणपूरपर्यंत गेले. अशा प्रकारची दहशत मुघली प्रदेशात निर्माण होत असताना शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणीची मागणी केली. दुसऱ्या बाजूने शिवाजीच्या आदेशानुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी रामनगरपर्यंत मजल मारली आणि वसईच्या पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली. थोडक्यात राज्याभिषेकाचा सोहळा संपतो न संपतो तोच मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशात चांगलीच दहशत निर्माण केली. फोंड्याची लढाई औरंगजेबाच्या चिथावणीमुळे आदिलशाही दरबारातील सरदारही शिवाजीविरुद्ध लहानमोठ्या कारवाया करीतच होते. फोंड्याच्या सुभेदाराने शिवाजीच्या राज्यातील एका व्यापाऱ्याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. शिवाजीने आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित याला दोन हजार अश्वदळ देऊन ८०
फोंड्याकडे पाठविले. दत्ताजी पंडित फोंड्यापर्यंत जाऊन पोहोचतो न पोहोचतो तोच खुद्द शिवाजी महाराज वायुगतीने निवडक सैन्यदल घेऊन फोंड्यापर्यंत आले आणि त्यांनी फोंड्याला वेढा घातला. हा वेढा चालू असताना शिवाजी महाराजांनी एक पथक कर्नाटक प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. त्यामुळे दोन आघाड्यांवर तोंड देण्याची पाळी आदिलशहावर आली. फोंड्याचा किल्ला दुर्गम असल्यामुळे आणि किल्ल्याचा खंदक पार करण्यास अवघड असल्यामुळे फोंड्याचा वेढा प्रदीर्घ काळ चालू ठेवावा लागला. खंदक भरून काढण्यात आला. किल्ल्याच्या तटावर चढण्यासाठी ५०० शिड्या तयार करण्यात आल्या. अशी तयारी पूर्ण झाल्यानंतर १७ एप्रिल १६७५ रोजी किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावून शिवाजी महाराजांनी फोंडा जिंकला. हा महत्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर कुठलीही विश्रांती न घेता शिवाजी महाराजांनी कर्नाटकात घोडदौड सुरू केली व केवळ १५ दिवसात अंकोला, शिवेश्वर इत्यादी किल्ले जिंकून घेतले. बहलोल विरुद्ध बहादूर औरंगजेबाने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी बहादूरखानला दक्षिणेत पाठविले तसेच शिवाजीला धडा शिकविण्याची प्रतिज्ञा करून विजापूरी सरदार बहलोलखान याने कोल्हापूर भागात मराठ्यांची नाकेबंदी सुरू केली. बहादूरखानाने बहलोलखानाची मदत घेऊन शिवाजीविरुद्ध आक्रमण करावे अशी औरंगजेबाची इच्छा होती. दरम्यान जानेवारी १६७५ मध्ये विजापूर दरबारात एक रक्तरंजित क्रांती घडली. बहलोलखानाने खवासखानाला ठार मारून विजापूर दरबारची राजकीय सूत्रे आपल्या हाती घेतली. बहादूरखानाने पूर्वी शिवाजीविरुद्ध हालचाली करण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे खवासखानाशी सख्य जोडले होते त्यामुळे या दोघात मैत्रीची भावना निर्माण झाली होती. परंतु बहलोलखानाने खवासखानाला ठार मारल्याबरोबर बहादूरखानाला त्याच्याविषयी चीड निर्माण झाली. दोघांमधील वैमनस्य वाढत चालले. याचा परिणाम असा झाला की बहलोलखानाने बहादूरखानाविरुद्ध शिवाजीकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने मुघलसत्ता ही पहिल्या क्रमांकाची शत्रू असून आदिलशाही आणि कुतूबशाही या शाही राजवटी दक्षिणेतील असल्यामुळे त्यांच्याशी सख्य जोडणे अधिक सोयीचे होते. म्हणून बहलोलखानाचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. मराठ्यांची मदत घेऊन जून १६७६ मध्ये बहलोलखानाने बहादूरखानाचा पराभव केला. या विजयानंतर लगेच जुलै १६७६ मध्ये बहलोलखानाने शिवाजीशी कर्नाटक स्वारी ८१
तह केला. या तहाप्रमाणे शिवाजी महाराजांचे राज्य आणि आदिलशाही राज्य यांची सीमा कृष्णा नदीपर्यंत निश्चित केली. कृष्णा नदीच्या उत्तरेकडील मुलूख शिवाजीस मिळाला. अशाप्रकारे शिवाजी आणि आदिलशाही यांच्यामध्ये सख्य निर्माण झाले. आता कुतूबशहाशी सख्य जोडून संपूर्ण दक्षिण देश मुघली वर्चस्वातून मुक्त करण्याचा शिवाजी महाराजांनी निर्धार केला. कर्नाटक स्वारीची तयारी आपल्या स्वराज्याचा विस्तार कर्नाटकापर्यंत करावा अशी महत्त्वाकांक्षा शिवाजी महाराज बाळगून होते. पूर्वी समुद्रमार्गे त्यांनी बसनूरपर्यंत स्वारी केली होती. त्यांच्या उत्तेजनामुळे मराठ्यांनी कारवारपर्यंत धडक मारली होती. महाराजांचे पिताजी शहाजी राजे यांची बंगलोर ही जहागिरी होती. त्यांच्या पश्चात महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हा बंगलोरच्या जहागिरीचा मालक होता. त्याने तंजावरपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून आपले मुख्य ठाणे तंजावर हेच केले. व्यंकोजी राजे विजापूरच्या आदिलशहाशी एकनिष्ठ असल्याचे भासवत होते. शिवाजी महाराजांना आपल्या सावत्र भावाचा पराक्रम माहित होता. त्याला स्वराज्यकार्यात सामील करून घेतले तर संपूर्ण दक्षिण भागात स्वराज्याचा विस्तार होईल आणि मुघल किंवा आदिलशहा नामोहरम होतील अशी महाराजांची अपेक्षा होती. मुघल हे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत याची खूणगाठ महाराजांनी मनाशी बांधली होती. म्हणून बहादूरखानाविरुद्ध विजापूरचा सरदार बहलोलखान याला महाराजांनी मदत केली होती. बहलोलखानाने वरकरणी मराठ्यांशी सलोखा जरी जोडलेला होता, तरी विजापूरच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व वाढविण्यास त्याने सुरुवात केली. अनेक पठाण सरदार बहलोलखानाच्या प्रेरणेने आदिलशाहीत दाखल झाले. त्यामुळे विजापूरदरबारात पठाणांचे वर्चस्व वाढू लागले. आदिलशहा काय किंवा कुतुबशहा काय यांच्या राजवटी पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून दक्षिण भारतामध्ये होत्या आणि या राजवटीत दख्खनी लोकांचाच वर्षानुवर्षे प्रभाव होता. परंतु जानेवारी १६७५ मध्ये जी रक्तरंजित क्रांती विजापूर दरबारामध्ये झाली, तेव्हापासून पठाणांचा भरणा आदिलशाहीच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. विजापूर दरबारातील पठाणांचे वाढते वर्चस्व शिवाजी महाराजांना धोक्याचे वाटत होते. कुतुबशहाच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व नव्हते. कुतुबशहाच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशात दख्खनी मुसलमान आणि हिंदू अधिकारी यांचे वर्चस्व होते. प्रत्यक्ष कुतुबशहाच्या दरबारात हिंदूंनाही ८२ छत्रपती शिवाजी महाराज
मानाच्या जागा दिल्या जात होत्या. मादण्णा आणि अकण्णा नावाचे दोन हिंदू मुत्सद्दी कुतुबशहाचे दोन प्रमुख सल्लागार होते. दक्षिणेचे राजकारण करताना शिवाजी महाराजांनी कुतुबशहाशी मित्रत्वाचे संबंध राखले होते. विजापूर दरबाराची सूत्रे हाती आल्यावर बहलोलखानाने आक्रमक धोरण स्वीकारले. कुतुबशहाच्या प्रदेशात धुडगूस घालण्यासाठी पठाणांची तुकडी पाठविली. चंदीचंदावरकडे कुतुबशाही प्रदेशात पठाणांनी बंडखोरी सुरू केली होती तेव्हा दक्षिणेत आदिलशाहीबरोबर कुतुबशाहीलाही पठाणांच्या घुसखोरीचा धोका निर्माण झाला होता. अर्थात हा धोका शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालाही निर्माण झाला होता. हा धोका नाहीसा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एका नव्या राजकीय सूत्राची मांडणी केली. ते सूत्र म्हणजे दक्षिण देश दक्षिण्यांच्याच स्वामित्वाखाली असला पाहिजे. 'दक्षिण्यांची दक्षिण' हे सूत्र त्यांनी आपल्या भावी राजकारणासाठी निश्चित केले. 'दक्षिण पातशाही तो राखली पाहिजे' हे शिवाजीच्या मुघलविषयक धोरणाचे आता मुख्य सूत्र झाले होते. मार्च १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यास जे पत्र लिहिले त्या पत्रात या सूत्राचे स्पष्टीकरण महाराजांनी केलेले आहे. 'दक्षणचे पादशाहीस पठाण जाला, ही गोष्ट बरी नव्हे! ...आपली पातशाही जितकी वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणांची नेस्तनाबूद करणे; दक्षणची पादशाही आम्हा दक्षिण्यांच्या हाती राहे ते करावे.' शिवाजी महाराजांचे नेमके धोरण या पत्रावरून स्पष्ट होते आणि या धोरणाला अनुसरून मार्च १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्यास जाऊन कुतुबशहाची भेट घेतली. प्रत्यक्ष भेटीमध्ये दक्षिण भागात पठाणांचा धोका कसा निर्माण झाला आहे याची जाणीव महाराजांनी कुतुबशहास आणि मादण्णा प्रधानास करून दिली. त्यानंतर कर्नाटक मोहिमेची कडेकोट तयारी करण्याचे त्यांनी ठरविले. तंजावरचा राजा व्यंकोजी भोसले हा आपला सावत्र भाऊ असून शक्य झाल्यास त्यालाही स्वराज्यकार्यात ओढून घ्यावयाचे; शक्य न झाल्यास आपल्या पित्याच्या कर्नाटकातील जहागिरीचा वाटा त्याच्याकडे मागावयाचा म्हणजे काहीतरी युक्तीप्रयुक्ती होऊन व्यंकोजीला आपल्याकडे वळवायचे असाही एक हेतू शिवाजी महाराजांनी मनात बाळगला होता. कर्नाटकसारख्या दूरवरच्या प्रदेशात मोहीम काढावयाची असल्यामुळे समर्थ शत्रूंना काहीकाळ तरी स्वस्थ बसवावे म्हणजे त्यांच्याकडून आक्रमण होणार नाही असा दूरगामी विचार शिवाजी महाराजांनी केला. विशेषतः मुघलांचा धोका उद्भवण्याची अधिक शक्यता होती. म्हणून डिसेंबर १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल सरदार बहादूरखान याचेबरोबर सलोख्याचा तह केला. कर्नाटक कर्नाटक स्वारी ८३
मोहीम प्रदिर्घ काळ चालणार असल्यामुळे स्वराज्याची कडेकोट व्यवस्था महाराजांनी लावली. मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक आणि युवराज संभाजी यांच्यावर स्वराज्यामध्ये सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविली. अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. प्रथम भागानगरला जाऊन कुतूबशहाची भेट घेतली आणि आपल्या मोहिमेस त्याचा पाठिंबा मिळविला. कुतूबशहाचा सेनापती मिर्झा महंमद हाही ससैन्य महाराजांच्या मोहिमेत सामील झाला. कर्नाटककडे जाताना श्रीशैल याठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे महाराजांनी दर्शन घेतले. त्यानंतर अनंतपूर, मंदियाळ, कडप्पा, तिरूपती या मार्गाने मे १६७७च्या पहिल्या आठवड्यात शिवाजी महाराज मद्रासजवळ पोहोचले. तेथून त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी सैन्याचे एक पथक पाठविले. वास्तविक पाहता जिंजीचा किल्ला अतिशय अभेद्य असून सहजासहजी जिंकण्यासारखा नाही. परंतु जिंजीचा किल्लेदार नसीर महंमदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात १३ मे १६७७ रोजी जिंजीचा किल्ला मराठ्यांना देऊन टाकला. जिंजी जिंकल्यानंतर वेलोरचा किल्ला शिवाजीने जिंकण्याचे ठरविले. हा किल्लाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. किल्ल्याच्या खंदकात खोलवर पाणी असून त्या पाण्यात सुसरी आणि इतर जलचर प्राणी फिरत होते. सभासदाने म्हटले आहे की, ‘या तोडीचा गड पृथ्वीवर दुसरा नाही.’ अशा या अवघड किल्ल्याला मराठ्यांनी चिवटपणे वेढा घातला. परंतु किल्ला लवकर हाती येण्याची शक्यता वाटेना. तेव्हा या वेढ्याची जबाबदारी महाराजांनी रघुनाथराव व आनंदराव यांच्यावर सोपविली आणि स्वतः शेरखान लोदी या सरदाराच्या पाठलागावर निघाले. २६ जून १६७७ रोजी शेरखानाचा सर्व सरंजाम मराठ्यांच्या हाती लागला. स्वतः शेरखान शिवाजी महाराजांना शरण गेला. त्यानंतर महाराजांनी मदुरेपर्यंत जाऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले. व्यंकोजीचा प्रश्न व्यंकोजीला आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याची शिवाजी महाराजांची इच्छा होती. परंतु महाराज कर्नाटक मोहिमेवर निघाल्यापासून व्यंकोजीला त्यांच्या हेतूविषयी शंका वाटत होती. मोहिमेत ज्यावेळी तंजावरपासून नऊ मैल अंतरावर कावेरीच्या काठी महाराजांचा मुक्काम होता, तेव्हा त्यांनी व्यंकोजीला मुद्दाम भेटीसाठी बोलावले. महाराजांच्या मुक्कामापासून तंजावर ८४ छत्रपती शिवाजी महाराज
केवळ ८-९ मैल दूर होते. तेव्हा आपल्या राजधानीपासून सुरक्षित अंतर असलेल्या महाराजांच्या तळापर्यंत जाणे व्यंकोजीला अवघड नव्हते. व्यंकोजीने शिवाजी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्याच्याशी दिलखुलासपणे बातचीत केली. शहाजीच्या कर्नाटक जहागिरीतील वाटाही मागितला. त्यापूर्वीही वकीलामार्फत व्यंकोजीशी महाराजांचे बोलणे झाले होते. ही सर्व बोलणी सामोपचारपद्धतीने झाली होती. पाँडेचरी येथील फ्रेंच अधिकारी मार्टिन याने आपल्या डायरीमध्ये शिवाजी आणि व्यंकोजी यांच्या भेटीचा तपशील लिहून ठेवला आहे. बोलणी चालू असताना अचानकपणे महाराजांना न सांगताच व्यंकोजी पळून गेला. याचे दुःख महाराजांना किती झाले याची कल्पना सभासदाच्या लिखाणावरून येण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांचे उद्गार सभासदाने नमूद करून ठेवले आहे. 'व्यंकोजीला पकडण्याचा किंवा त्याची बिरूदे हिसकावून घेण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असे असताना न सांगता व्यंकोजी राजे का पळाले?' अशी खंत महाराजांनी व्यक्त केलेली आढळते. व्यंकोजीच्या पलायनाविषयी शिवाजी महाराजांनी जे मत व्यक्त केले ते सभासदाने लिहून ठेवले आहे. 'उगी उठून पळून गेले. अति धाकटे ते धाकटे, बुद्धीही धाकटेपणास योग्य केली.' व्यंकोजी पळून गेल्याचे दुःख शिवाजी महाराजांना अतोनात झाले. परंतु स्वतः व्यंकोजीने मात्र मराठ्यांविरुद्ध लढा देण्याची तयारी केली. कावेरीच्या परिसरात संताजी भोसले याचे लष्कर होते. त्याच्यावर १५ नोव्हेंबर १६७७ रोजी व्यंकोजीने हल्ला केला आणि त्याला पळवून लावले. संताजी त्यावेळी बेसावध होता. यशस्वी माघार घेतल्यानंतर त्याने पुन्हा तयारी केली आणि वलीगंडपूर येथे झालेल्या लढाईत व्यंकोजीचा पराभव केला. अशाप्रकारे व्यंकोजीचा पराभव झालेला असला तरी शिवाजीला त्याचेबद्दल माया वाटत होती आणि म्हणून एक सविस्तर पत्र लिहून शिवाजीने व्यंकोजीला लिहिले, 'दुर्योधनासारखी बुद्धी करून, तुम्ही युद्ध केले...... झाले ते झाले आता हट्ट न करणे' दरम्यान मराठ्यांनी व्यंकोजीची अनेक ठाणी जिंकून घेतली. शेवटी व्यंकोजीने रघुनाथपंत हणमंते यांचेमार्फत शिवाजीबरोबर तह केला. ऐन पावसाळ्यातही शिवाजीची कर्नाटक मोहिम चालू होती. जुलै १६७७च्या सुमारास शिवाजीने तिरूमलवाडीतून वृद्धाचलम् या मार्गाने पोर्टोनोव्हा या ठिकाणी शिवाजी महाराज आले. ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्काटवर महाराजांनी प्रभुत्व संपादन केले. पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर १६७७ मध्ये आरणी, होसकोट, शीरे, बाळापूर इत्यादी पश्चिम-दक्षिण जोडणारी स्थळे कर्नाटक स्वारी ८५
ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेची सांगता केली. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे एक खास वैशिष्ट्य दिसून येते. जो प्रदेश जिंकला आहे किंवा जे किल्ले जिंकले आहे त्यांची उत्तम व्यवस्था लावून दिल्याशिवाय शिवाजी महाराज पुढे जात नसत. कर्नाटक मोहिमेवर असताना जो प्रदेश आपल्या ताब्यात आला त्याची चोख व्यवस्था लावण्याचे कार्य शिवाजीने प्रथम केले. संताजी भोसले याला कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशावर सुभेदार म्हणून नेमले आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांची निवड केली जिंकलेल्या किल्ल्यांची शिवाजीने कशी व्यवस्था लावली याची माहिती मद्रासमधील समकालीन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेली आढळते. जिंजी किल्ला जिंकताना काही बुरूज कोसळले होते, तटांना खिंडारे पडली होती, परंतु महाराजांनी कारागीर लावून किल्ल्याची उत्तम डागडूजी केली. एवढेच नव्हे तर पहिल्यापेक्षा किल्ला अधिक भक्कम केला. मिशनऱ्यांनी असेही लिहून ठेवले आहे की, 'अनेक, नवे भुईकोट व डोंगरी किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले.' 'केवळ किल्ल्यांची डागडुजी आणि प्रशासन व्यवस्था एवढ्या कार्यावरच महाराज संतुष्ट राहत नाहीत. रयतेचा किंवा सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना, सैनिकांना ते सूचना देत असत, निष्पाप लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेण्यास सांगत. जानेवारी १६७८ मध्ये म्हैसूरमार्गे महाराष्ट्राकडे परत येताना बेळगाव जिल्ह्यात महाराजांनी प्रवेश केला. तेथून संपगावमार्गे पुढे जात असताना बेलवाडी येथील सावित्रीबाई देसाई हिने शिवाजीविरुद्ध युद्ध पुकारले. ही देसाई स्त्री एवढी पराक्रमी होती की बेलवाडीचा छोटासा किल्ला तिने २७ दिवस लढविला. शेवटी शिवाजीपुढे तिला माघार घ्यावी लागली. शिवाजीने या देसाई स्त्रीचे मोठे कौतुक केले. या प्रसंगाचे शिल्पांकन बेलवाडीच्या परिसरात अनेक ठिकाणी झालेले आढळते. एप्रिल १६७८ मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडांवर आले आणि तेथून मे महिन्यात रायगडावर गेले. अशाप्रकारे शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम जवळजवळ दीड वर्षे सुरू होती असे म्हणावे लागते. ही मोहीम यशस्वी झाल्याने शिवाजीचा दरारा दक्षिणेत सर्वदूर निर्माण झाला. पाश्चात्य वखारवाले अधिक सावध झाले. एका समकालीन इंग्रजीपत्रात तर ८६ छत्रपती शिवाजी महाराज
असा उल्लेख आहे की, 'अल्पकाळातच सुरतेपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशाचा शिवाजी स्वामी होईल यात शंका वाटत नाही.' कर्नाटक मोहिमेबाबत आणखी एका इंग्रजी पत्रातील उल्लेख पहा, 'स्पेनमध्ये सिझर ज्याप्रमाणे आला, त्याने पाहिले आणि जिंकले त्याप्रमाणे कर्नाटकात शिवाजी आला, त्याने पाहिले आणि जिंकले' थोडक्यात राज्याभिषेकानंतर दक्षिण हिंदुस्थानात मोठा विस्तार करून शिवाजीने आपल्या स्वराज्याची इमारत पक्की केली. संभाजी मुघलांना मिळाला कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजीला संगमेश्वरास पाठविले होते. महाराज स्वारीहून परत येईपर्यंत तो संगमेश्वरलाच राहिला होता. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते असे समकालीन मराठी व फारसी साधनांवरून दिसून येते. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर निघण्यापूर्वीच दोघांमध्ये वितुष्ट आले असावे असे वाटते. संभाजी संगमेश्वरला स्वतःच्या इच्छेनुसार गेला होता असे दिसते. युवराज संभाजीवर शिवाजी महाराजांचा विश्वासही होता कारण कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी इंग्रज वखारवाल्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी महाराजांनी संभाजीवर सोपविली होती. साधारणपणे असे दिसून येते की, कर्नाटक मोहिम आटोपून शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले आणि तेव्हापासून त्यांचे मन संभाजीविषयी कलुषीत झाले. रायगडावर असताना प्रधानांचे आणि संभाजीचे काही कारणामुळे बिनसले होते. कदाचित कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर प्रधानांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी महाराजांजवळ संभाजीविषयी कागाळ्या केल्या असाव्यात. अर्थात अशा कागळ्यांमुळे गैरसमज करून घेण्याचा शिवाजी महाराजांचा स्वभाव नव्हता. स्वतः संभाजीच्याही काही तक्रारी होत्या. परंतु या तक्रारींना विशेष महत्त्व शिवाजी महाराजांनी दिले नाही. थोडक्यात शिवाजी आणि संभाजी यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते, हे मात्र निश्चित, कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर महाराजांनी संभाजीला सज्जनगडाकडे पाठविले तेथे समर्थ रामदासांच्या सहवासात संभाजीची चित्तवृत्ती शांत होईल असा शिवाजी महाराजांचा कयास असावा. परंतु संभाजी जेव्हा सज्जनगडाकडे गेला तेव्हा समर्थ रामदास तेथे नव्हतेच. अगोदरच उद्विग्न झालेल्या संभाजीचे सज्जनगडावर मन रमेना. संभाजीच्या या मनःस्थितीचा अंदाज मुघलसरदार दिलेरखान याला आला होता आणि म्हणून आपले हस्तक संभाजीकडे पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न दिलेरखानने चालू केला. कर्नाटक स्वारी ८७
शिवाजी महाराज आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा समज झाल्यामुळे संभाजीने मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिम आटोपून १६७८ च्या पावसाळ्यापूर्वी स्वराज्यात आले संभाजी १६७९च्या प्रारंभी केव्हातरी मुघलांना जाऊन मिळाला. संभाजी आपल्याकडे आल्यानंतर दिलेरखानाला विलक्षण आनंद झाला. त्याने ताबडतोब मराठ्यांविरुद्ध मोहिम उघडण्याचा निर्णय घेतला. पण याच वेळेला मुघल आणि आदिलशहा यांच्यातही संघर्ष चालू होता. तरीपण आदिलशाहीविरुद्ध मोहीम चालू असताना मराठ्यांना डिवचण्यासाठी दिलेरखानाने १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड किल्ल्याला वेढा दिला. यावेळी भूपाळगडावर फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार होता. याच किल्लेदाराने चाकणचा किल्ला मोठ्या हिकमतीने लढवून शायिस्तेखानास जेरीस आणले होते. परंतु यावेळी दिलेरखान संभाजीस बरोबर घेऊन आल्यामुळे त्याने किल्ला खानाच्या स्वाधीन केला. ही बेइमानी केल्याबद्दल शिवाजी महाराजांनी फिरंगोजीला तोफेच्या तोंडी दिले अशी हकिकत ९१ कलमी बखरीत आलेली आहे. भूपाळगड ताब्यात आल्यानंतर दिलेरखानाने आदिलशाहीविरुद्ध चाललेली मोहिम अधिक तीव्र केली. मंगळवेढा वगैरे प्रदेश जिंकून घेऊन ऑक्टोबर १६७९ पर्यंत दिलेरखानाने थेट विजापूरपर्यंत धडक मारली. या सर्व मोहिमेत संभाजी दिलेरखानाबरोबर होता अथणी शहर लुटण्यामध्ये दिलेरखानास संभाजीने मदत केली. या सर्व वार्ता शिवाजी महाराजांस समजत होत्या. संभाजी आपणास सोडून गेला याचे त्यांना विलक्षण दुःख झाले होते. परंतु संभाजीच्या मानी स्वभावास मुघलांची चाकरी परवडणार नाही याची महाराजांना पूर्ण खात्री होती. काही दिवसांनी दिलेरखानाचे उत्तान वागणे संभाजीला पटेनासे झाले. कोणत्यातरी दिलेरखान आणि संभाजी यांच्यात झगडा झाला. याच काळात औरंगजेबाने संभाजीस कैद करण्याचाही घाट घातला होता. मुघलांच्या या राजकारणात संभाजी पूर्णपणे विटला. शिवाजी महाराजांनी काही माणसे संभाजीच्या मागावर ठेवलेली होती. गुपचूपपणे संभाजीला ती भेटतही होती. त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होती. अशी माहिती भीमसेन सक्सेना या औरंगजेबाच्या दरबारी लेखकाने लिहून ठेवलेली आहे. अथणीजवळ छावणी असताना एके दिवशी संभाजी महाराजांच्या माणसांबरोबर गुपचूपपणे दिलेरखानास सोडून बाहेर पडला आणि पन्हाळ्यास परत आला. त्याला भेटण्यासाठी शिवाजी राजे पुरंदरहून पन्हाळ्यास आले. १३ जानेवारी १६८० रोजी पिता-पुत्रांची भेट झाली. शिवाजी महाराजांनी पूर्वीप्रमाणे पाश्चात्य वखारवाल्यांशी बोलणी करण्याचा संभाजीला अधिकार दिला. ८८ छत्रपती शिवाजी महाराज
मुघलांविरूद्ध आघाडी कर्नाटकाची मोहीम हाती घेण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी 'दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधिशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे' असे धोरण निश्चित केले होते. 'दक्षिण्यांची दक्षिण' हे त्यांच्या नव्या राजकारणाचे सूत्र होते. त्या अनुषंगाने मुघलांविरूद्ध कुतुबशहा आणि आदिलशहा यांना मदत करण्याचे धोरण महाराजांनी स्विकारले होते. संभाजी राजे मध्यंतरी मुघलांना जाऊन मिळाल्यामुळे विलक्षण पेच महाराजांपुढे निर्माण झाला होता. परंतु संभाजी मुघलांकडे फार काळ राहू शकला नाही. तो परत येताच शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध नवी आघाडी उभारली. आदिलशहाला मदत करण्यासाठी थेट विजापूरपर्यंत जाऊन मुघली फौजांची दाणादाण उडवली. त्यानंतर मराठवाड्यात थेट जालन्यापर्यंत जाऊन तेथील पेठ लुटली. आणि मुघलांमध्ये दहशत निर्माण केली. याच काळात शिवाजीच्या आज्ञेप्रमाणे मोरोपंत पेशव्याने खानदेशात शिरून धरणगाव, चोपडा ही शहरे लुटली. मलकापूर पर्यंतचा प्रदेश काबीज करून बागलाणामध्ये मुघलांचा पुरता बिमोड केला. अहिवंतसारखे किल्ले जिंकून घेतले आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशावर हुकूमत निर्माण केली. या नव्या मोहिमेमुळे दिलेरखान मोठ्या पेचात सापडला होता. कारण मराठ्यांनी त्याची रसद तोडून पूर्ण नाकेबंदी केलेली होती. औरंगजेबाच्या आदेशानुसार रणमस्तखान हा सरदार मोठी फौज घेऊन दिलेरखानाच्या मदतीसाठी निघाला होता. परंतु वाटेतच मराठ्यांनी रणमस्तखानास गाठले आणि त्याच्या फौजेवर असाकाही चौफेर हल्ला केली की त्यामुळे त्याला औरंगाबादकडे पळून जावे लागले अशाप्रकारे मुघलांच्या पदरात नामुष्की आली. शेवटी मुघलांनी आदिलशाहीविरुद्ध मोहिम थांबविली आणि फेब्रुवारी १६८० मध्ये विजापूरचा वेढा उठविला. मुघलांसारख्या जबरदस्त शत्रूचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजी महाराज रायगडकडे परतले. काही घरगुती मंगलकार्ये त्यांना उरकायची होती म्हणून राजधानी रायगडवरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी तर महाराजांचे सख्य झाले होते. १६८० च्या प्रारंभी क्रमांक एकचा शत्रू मुघल नामोहरम झाला होता आणि १६८० च्या प्रारंभापर्यंत पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले यांनाही शिवाजी महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले होते. □□□ कर्नाटक स्वारी ८९
५. आगरा पलायन, तानाजी सिंहगढ़ विजय व राज्याभिषेक
१२. सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज १७ व्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये केंद्रस्थानी असलेली मुघल सत्ता अत्यंत प्रभावशाली होती. विशेषतः संपूर्ण उत्तर भारतामध्ये मुघलांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले होते. राजस्थान किंवा बुंदेलखंड येथील राजपूत राजांनी मुघलांचे मांडलीकत्व पत्करले होते. एवढेच नव्हे तर अनेक शूर राजपूत सरदार मुघलांच्या राज्यविस्तारासाठी मोठ्या निष्ठेने पराक्रम गाजवत होते. दक्षिण भारतामध्ये बहमनी राज्याच्या विभाजनानंतर जी पातशाही राज्ये निर्माण झाली होती त्यापैकी निजामशाही, कुतूबशाही आणि आदिलशाही ही तीन शाही राज्ये सतराव्या शतकामध्ये अस्तित्वात होती. या शतकाच्या प्रारंभी मुघल सम्राट अकबराने दक्षिणेत आक्रमण करून खानदेशातील फारुकी सत्ता नष्ट केली आणि मुघल सत्तेचा दक्षिणेत विस्तार सुरू केला. त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत आक्रमण करून निजामशाहीला आव्हान दिले. अशाप्रकारे दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांपुढे मुघलांचे आक्रमण ही एक मोठी समस्या निर्माण झाली. सम्राट अकबरानंतर शहाजहानने १६३६ मध्ये दक्षिणेची स्वारी काढली आणि आदिलशहाबरोबर तात्पुरता तह करून त्याच्या मदतीने निजामशाही नष्ट केली. निजामशाहीचा प्रदेश शहाजहान आणि आदिलशहा यांनी आपापसात वाटून घेतला. निजामशाही नष्ट झाल्यामुळे आदिलशाही व कुतुबशाही ही दोन शाही राज्ये दक्षिणेमध्ये शिल्लक राहिली. शहाजहाननंतर मुघल सत्ताधीश बनलेल्या औरंगजेबाने दक्षिणेतील दोन्ही शाही राज्ये नष्ट करण्याची महत्वाकांक्षा प्रथमपासून बाळगली. अशाप्रकारे दक्षिण भारतात मुघलांचा प्रभाव वाढत होता. विजयनगरचे साम्राज्य १६ व्या शतकाच्या मध्यात म्हणजे १५६५ मध्ये दक्षिणेतील शाही राजवटींनी तालीकोटच्या लढाईत निर्णायक विजय मिळवून नष्ट केले. त्यामुळे प्रभावशाली स्थानिक सत्ता एकही शिल्लक राहिली नाही. अशा या राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अत्यंत सामर्थ्यशाली अशा मुघलसत्तेला तसेच आदिलशाहीला टक्कर देऊन आपल्या राज्याला बळकटी ९०
तर आणलीच परंतु राज्याचा विस्तार करून आदिलशहा व मुघल यांना जबरदस्त आव्हान दिले. अशा प्रकारे स्वतंत्र राज्य स्थापन करून शिवाजीने दक्षिणेत क्रांती घडवून आणली. त्याच्या नेत्रदिपक विजयामुळे इतर लहानमोठे सत्ताधीशही हादरले. विशेषतः शिवाजीच्या राज्याची सीमा समुद्रापर्यंत जाऊन भिडल्यानंतर गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्दी या दोन्ही सत्ताधिशांना चिंता वाटू लागली. पोर्तुगिजांनी गोव्याला राज्य स्थापन केले. पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. त्यांच्याजवळ समर्थ आरमार असल्यामुळे मुघलांनाही पोर्तुगिजांचा धाक वाटत होता. हज यात्रा करणाऱ्या भारतातील मुसलमानांना पोर्तुगिजांकडून परवाने घ्यावे लागत. मुघलांचे स्वतंत्र आरमार नसल्यामुळे पोर्तुगिजांशी त्यांनी नेहमीच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. जंजिऱ्याचे सिद्दी हे अत्यंत साहसी वृत्तीचे दर्यावर्दी राज्यकर्ते होते. जंजिऱ्यासारख्या अभेद्य किल्ल्यामध्ये त्यांची राजधानी होती. सिद्दी हे अत्यंत पराक्रमी व धाडसी असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरील मोक्याच्या ठिकाणी त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पोर्तुगीजांप्रमाणे सिद्दींचे आरमारही अत्यंत प्रभावशाली होते. मुघलांनी राजकारणाच्या सोयीसाठी सिद्दींशी तह करून आरमारप्रमुख म्हणून त्यांना मान्यता दिली होती. शिवाजी महाराजांनी जेव्हा आपले स्वतंत्र आरमार उभारण्यास सुरुवात केली आणि पश्चिम किनाऱ्यालगतची काही स्थळे व किल्ले ताब्यात घेतली तेव्हा सिद्दींना शिवाजीच्या राज्यविस्ताराची भिती वाटू लागली. त्यातून सिद्दी व मराठे असा संघर्ष सुरू झाला. पोर्तुगिजांनाही शिवाजीच्या हेतूविषयी नेहमीच शंका येत राहिली. प्रारंभी शिवाजीचे आरमार उभे करण्यासाठी पोर्तुगिजांनी त्याला तंत्रज्ञ पुरविले पण ज्यावेळी शिवाजीचे आरमार तुल्यबळ होत आहे हे लक्षात आल्यावर आपल्या तंत्रज्ञांना पोर्तुगिजांनी माघारी बोलावून घेतले. त्यांनी वरकरणी शिवाजीशी सलोख्याचे संबंध जरी जोडले होते तरी अंतर्यामी शिवाजीविरुद्ध त्यांच्या कारवाया चालू होत्या अशाप्रकारे पश्चिम किनाऱ्यावर सिद्दी व पोर्तुगीज हे दोन सत्ताधीश शिवाजीचे शत्रू होते. युरोपात प्रबोधनाचे युग अवतरल्यानंतर विशेषतः नव्या समुद्रमार्गांचा शोध लागल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांमध्ये भारताबरोबर व्यापारी संबंध जोडण्याची ईर्ष्या निर्माण झाली. पोर्तुगीजही प्रथम व्यापारासाठीच भारतात आले. त्यानंतर डच, इंग्रज व फ्रेंच यांनीही भारताशी व्यापारी संबंध जुळवून भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर मोक्याच्या ठिकाणी व्यापारी वखारी प्रस्थापित केल्या. आपला व्यापार सुरळीत आणि सुरक्षित राखण्यासाठी पाश्चात्य वखारवाल्यांनी सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९१
आदिलशहा, कुतुबशहा आणि मुघल या सत्ताधिशांशी सलोख्याचे संबंध ठेवले. त्यांच्याकडून परवाने मिळविले आणि वेळोवेळी त्यांना नजराणे दिले. भारतातील राजकीय घडामोडींमध्ये ते जरी भाग घेत नव्हते तरी जागरूक आणि सावध राहाण्याची काळजी घेत होते. शिवाजीने जेव्हा स्वराज्याची उभारणी केली आणि राज्याचा विस्तार सुरू केला तेव्हा ते पाश्चात्य वखारवाले सावध झाले. शिवाजीकडून आपल्या वखारींना उपद्रव पोहचू नये म्हणून कधी नरमाईचे, कधी चढाईचे तर कधी सामोपचाराचे धोरण स्वीकारू लागले. विशेषतः शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केल्यानंतर पाश्चात्य वखारवाल्यांना अधिक काळजी वाटू लागली. डचांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध जोडले. इंग्रजांनी आपले व्यापारी केंद्र सुरतहून मुंबईला हलविले. शिवाजीची कृपादृष्टी आपल्याला लाभावी हा त्यामागे इंग्रजांचा हेतू होता. दक्षिण स्वारीच्या वेळी फ्रेंचांचेही शिवाजीबरोबर संबंध आले. थोडक्यात स्वराज्याचा विस्तार करतांना मुघल सत्ताधिश, शाही राज्यकर्ते, पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले या सर्वांच्याच राजकारणाविषयी शिवाजी महाराजांना सावध रहावे लागले. त्यापैकी सिद्दी हे अतिशय आक्रमक व घुसखोर असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांच्याशी मोठ्या हिकमतीने लढावे लागले. सिद्दींशी पहिला संघर्ष सिद्दी हे मुळचे आफ्रिकेतील ॲबिसिनिया या प्रांतातील होते. ते धर्माने मुसलमान असून दर्यावर्दी जीवन जगत होते. ॲबिसिनियन या शब्दावरूनच सिद्दी असे म्हटले जाऊ लागले. १५ व्या शतकात ते भारतामध्ये आले आणि निजामशाहीच्या राजवटीत दंडाराजपुरी या ठिकाणी सिद्दींनी आपले केंद्र प्रस्थापित केले. शहाजहानने निजामशाही नष्ट केल्यानंतर दंडाराजपुरीच्या सिद्दींनी स्वतंत्रपणे वागण्यास सुरुवात केली. सिद्दींचे आरमारी सामर्थ्य जबरदस्त असल्यामुळे प्रथम आदिलशहाने नंतर मुघलांनीही आरमारप्रमुख म्हणून सिद्दींना मान्यता दिली. दंडाराजपुरीजवळ असलेला जंजिऱ्याचा किल्ला सिद्दींनी राजधानीसाठी निवडला. १६५९ मध्ये शिवाजीने अफझलखानाचा वध केला. तेव्हा खानाची जहाजे ताब्यात घेण्यासाठी शिवाजीची माणसे समुद्रापर्यंत पोहचली. कोकणामध्ये शिवाजीचा राज्यविस्तार होईल याची चिंता सिद्दींना वाटू लागली. त्या सुमारास सिद्दी फतेखान हा जंजिऱ्याचा प्रमुख होता. त्याने शिवाजीच्या प्रदेशावर हल्ला करण्याची योजना आखली होती. परंतु खानाच्या वधानंतर जी धामधूम झाली ९२ छत्रपती शिवाजी महाराज
त्यामध्ये फतेखानाने आपली योजना स्थगित केली. १६६० मध्ये सिद्दी जोहरने शिवाजी पन्हाळ्याच्या किल्ल्यात असतांना जबरदस्त वेढा घालून त्याची नाकेबंदी केली. ती संधी साधून फतेखानाने शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. काय सावंत हा मराठा सरदार सिद्दी फतेखानाच्या मदतीस आला. परंतु शिवाजीच्या वतीने बाजी पासलकर याने पराक्रमाची शर्थ केली. सिद्दी फतेखानाचा डाव उधळून लावला. काय सावंत या लढाईत मारला गेला तर बाजी पासलकरने विजय मिळविण्यासाठी प्राणाची आहुती दिली. शेवटी मराठ्यांच्या प्रखर प्रतिकारापुढे फतेखानाला माघार घ्यावी लागली. या पहिल्या संघर्षानंतर सिद्दी आणि मराठे यांच्यामधील वैमनस्य वाढत चालले. कोकणामध्ये दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून लहान मोठ्या चकमकी घडू लागल्या. या चकमकीचे उल्लेख बखरीमधून आणि समकालीन साधनांमधून आढळत जरी असले तरी याचा नेमका कालखंड समजू शकत नाही. सिद्दीचे उपद्व्याप वाढल्यानंतर शिवाजीने रघुनाथपंथ बल्लाळ यांना कोकणामध्ये पाठविले. त्यांनी कोकणातील मोक्याचे किल्ले घेऊन दंडाराजपुरीवर वर्चस्व निर्माण केले आणि तेथून जंजिऱ्याच्या किल्ल्यावर तोफांचा भडीमार सुरू केला. तेव्हा सिद्दी शरण आले आणि त्यांनी पंताबरोबर तह केला. हा तह नेमका केव्हा झाला आणि तहाचा तपशील काय होता याची माहिती मिळू शकत नाही. हा तह झाल्यावर काही काळ सिद्दीकडून मराठ्यांना कोणताच उपद्रव झाला नाही. परंतु लवकरच सिद्दींनी आपले सामर्थ्य एकवटले. दरम्यान रघुनाथ बल्लाळाचा मृत्यू झाल्यामुळे कोकणातल्या प्रदेशावर मराठ्यांची पकड काही प्रमाणात सैल झाली. त्याचा फायदा घेऊन सिद्दींनी मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले सुरू केले. सिद्दींचा वाढता उपद्रव पाहून शिवाजीने व्यंकोजी दत्तो याला सिद्दींचे पारिपत्य करण्यास पाठविले. कोकणात शिरून व्यंकोजी दत्तोने सिद्दींबरोबर युद्ध सुरू केले. या युद्धात अनेक हबशी मारले गेले. खुद्द व्यंकोजी दत्तोने पराक्रमाची शर्थ केली. युद्धात त्याला अनेक जखमा झाल्या. सिद्दींनी शेवटी माघार घेऊन तहाची बोलणी सुरू केली. परंतु सिद्दींची कायमची खोडकी मोडल्याशिवाय तह करावयाचा नाही असा निर्धार महाराजांनी केला होता. सिद्दींचे मुख्य केंद्र म्हणजे जंजिरा, हा किल्ला जिंकून घेतल्यावर सिद्दींचे सामर्थ्य पूर्णतः खच्ची होईल अशी शिवाजीची खात्री होती. म्हणून सिद्दीशी पहिला संघर्ष झाला तेव्हापासून जंजिरा जिंकण्याचे शिवाजीचे प्रयत्न चालू होते. आग्र्याहून परत आल्यानंतर सिद्दींचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीने कोकणात हालचाली सुरु केल्या. १६६९च्या पावसाळ्याच्या प्रारंभी दंडाराजपूरी हे ठिकाण सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९३
मराठ्यांनी वर्चस्वाखाली आणले आणि तेथून जंजिऱ्यावर हल्ला करण्याची तयारी केली. ऑक्टोबर १६६९ मध्ये मराठ्यांनी सिद्दींची रसद तोडून अक्षरशः कोंडी केली. सिद्दीच्या सैनिकांची उपासमार सुरू झाली. तरीपण सिद्दींनी माघार घेतली नाही उलट मुघलांकडून शिवाजीवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मध्येच सिद्दी प्रमुखाने एक शक्कल लढविली. मुंबईकर इंग्रजांनी दंडाराजपूरी विकत घ्यावी म्हणून त्याने निकराचे प्रयत्न केले. पण शिवाजीशी वैर करण्याची अजिबात इच्छा नसल्याने इंग्रजांनी सिद्दी प्रमुखांच्या या प्रस्तावास मान्यता दिली नाही. मुघल आणि आदिलशहा या दोघांकडूनही सिद्दींना मदत मिळेनासी झाली. अशाप्रकारे सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर सिद्दी प्रमुख फतेखान याने जंजिरा किल्ला शिवाजीच्या ताब्यात देण्याचा निश्चय केला. त्याने तहाची बोलणी सुरू केली. जंजिरा किल्ल्याच्या मोबदल्यात मोठी जहागिरी देण्याचे शिवाजीने आमिष दाखविले. परंतु जंजिऱ्यातच अंतर्गत वाद निर्माण होऊन फतेखानाविरुद्ध बंड झाले. फतेखान शिवाजीबरोबर तह करीत आहे ही कल्पना तीन प्रमुख सिद्दी सरदारांना अजिबात मान्य नव्हती. हे तीन सरदार म्हणजे सिद्दी संबूळ, सिद्दी कासीम आणि सिद्दी खैरियात. या तिन्ही सरदारांनी फतेखानाला विरोध तर केलाच, पण त्याला कैद करून जंजिऱ्याची सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. सिद्दी संबूळ हा जंजिऱ्याचा प्रमुख झाला. मुघल सरदार औरंगजेबानेही त्याला तातडीने मान्यता दिली आणि शिवाजी विरुद्ध मदत करण्याचे आश्वासन दिले. जंजिऱ्याची पूर्ण सत्ता हाती आल्यावर आक्रमक धोरण स्वीकारून दंडाराजपूरी मराठ्यांकडून परत घेण्याचा सिद्दी संबूळने निश्चय केला. फेब्रुवारी १६७१ मध्ये दंडाराजपुरी येथे होळीचा उत्सव चालू होता. या उत्सवामध्ये मराठे दंग होते. ही संधी साधून सिद्दी संबूळ याने दंडाराजपुरीवर हल्ला करण्याचे ठरविले. सिद्दी खैरियत जमिनीच्या मार्गाने तर सिद्दी कासीम समुद्रमार्गाने दंडाराजपुरी किल्ल्याजवळ पोहचले. मराठे बेसावध असताना त्यांनी अचानकपणे हल्ला केला. मराठ्यांनी आपला बचाव करण्याचा शर्थीने प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. शेवटी दंडाराजपुरी सिद्दींनी ताब्यात घेतली. दंडाराजपुरी सिद्दींकडे गेल्यामुळे जंजिऱ्यावर हल्ला करण्याची कल्पना काही काळ शिवाजीला सोडून द्यावी लागली. सिद्दींनी दंडाराजपुरी घेतल्यावर औरंगजेबाने सढळ हाताने सिद्दींना मदत सुरू केली. त्यांचे आरमारी सामर्थ्य वाढावे म्हणून ३६ जहाजे दिली. या सुमारास मराठ्यांचेही आरमारी सामर्थ्य वाढू लागले. सिद्दी संबूळने मराठ्यांच्या आरमारावर हल्ले सुरू केले. त्यातून ९४ छत्रपती शिवाजी महाराज
सिद्दी व मराठे यांच्यामध्ये आरमारी लढाया सुरू झाल्या. विशेष म्हणजे इंग्रजांनी शिवाजीविरुद्ध सिद्दींना मदत सुरू केली. मार्च १६७४ मध्ये सिद्दी संबूळने सातवली नदीत असलेल्या मराठ्यांच्या आरमारावर जोरदार हल्ला केला. त्यावेळी दौलतखान हा मराठ्यांचा आरमारप्रमुख होता. त्याने मोठा पराक्रम गाजवून सिद्दींचा हल्ला परतावून लावला. स्वतः दौलतखान व सिद्दी संबूळ दोघेही जखमी झाले. मराठ्यांनी आपल्या आरमाराचा बचाव केला. सिद्दी विरोधी लढा देण्यात आपले लोक कमी पडणार नाही हे ओळखून १६७५ मध्ये शिवाजीने जंजिऱ्यावर हल्ला करण्याची पुन्हा तयारी केली. ५७ जहाजांचे जंगी आरमार घेऊन शिवाजीने जंजिरा किल्ल्याला वेढा घातला. परंतु किल्ल्यावरून तोफांचा जबरदस्त मारा करून आणि समुद्रातून लढाऊ जहाजांच्या सहाय्याने हल्ला करून सिद्दी संबूळने शिवाजीचा वेढा मोडून काढला. जंजिरा जिंकणे हे शिवाजीचे एक स्वप्न होते. पण ते साकार होण्याची चिन्हे दिसेनात. पुढील वर्षी म्हणजे १६७६ मध्ये शिवाजीने मोरोपंत पिंगळे यांना १०,००० फौज घेऊन जंजिरा जिंकण्यासाठी पाठविले. किल्ल्याला वेढा देऊन मोरोपंतांनी तोफांचा भडीमार सुरू केला. या प्रसंगी लाय पाटील नावाचा एका सामान्य मराठ्याने रात्रीतून किल्ल्याचा तट चढून जाण्यासाठी शिड्या लावण्याची करामत केली. परंतु ऐनवेळी ही योजना फसली. मराठे तटापर्यंत चढू शकले नाहीत. मुघलांकडून ऐनवेळी सिद्दीना कुमक मिळाली आणि मोरोपंतांना माघार घ्यावी लागली. त्यानंतरही दौलतखानाला पाठवून जंजिरा जिंकण्याचा शिवाजीने प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. शेवटी शिवाजीचे हे स्वप्न अपूरेच राहिले. खांदेरी-उंदेरी १६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने शिवाजीकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्याने सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उद्भवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजीने सुरू केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९५
घेऊन शिवाजीला विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलतखान याने २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखानाला माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला. पोर्तुगीज आणि शिवाजी पोर्तुगिजांनी गोव्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. शिवाय कोकणातील वसई हे मोक्याचे केंद्र ही त्यांच्या ताब्यात होते. आधुनिक सुसज्ज आरमार पोर्तुगिजांकडे असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यांवर त्यांचे वर्चस्व होते. मुघलांनी पोर्तुगिजांच्या समुद्र वर्चस्वाला अप्रत्यक्षपणे मान्यता दिली होती. शिवाजीने आपले आरमार उभारण्यासाठी प्रारंभी पोतुगिजांचीच मदत घेतली होती. परंतु जेव्हा शिवाजीचे आरमार तुल्यबळ होऊ लागले, तेव्हा पोर्तुगिजांना शिवाजीच्या हेतूविषयी शंका वाटू लागली. आपले लहानसे राज्य सुरक्षित राखण्यासाठी एतद्देशीय राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे पोर्तुगिजांचे धोरण होते. त्यामुळे कधी कधी त्यांना दुटप्पी वर्तन करावे लागे. मुघल आणि आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध असताना पोर्तुगिजांनी शिवाजीबरोबरही वरकरणी मित्रत्वाचे संबंध जोडले होते. परंतु शिवजीच्या शत्रूंना आपल्या प्रदेशात आश्रय देऊन त्यांना मराठ्याच्या विरुद्ध चिथावणे शिवाजीविरुद्ध अप्रत्यक्षपणे सिद्दींना मदत करणे,त्यांना शस्त्रात्रे पुरविणे यासारख्या कारवाया पोर्तुगीज करीत असत. ज्यावेळी शिवाजीने दंडाराजपुरीस वेढा घातला होता, त्यावेळी पोर्तुगिजांनी धान्य आणि दारूगोळा यांची मदत सिद्दींना केली. पोर्तुगिजांच्या या दुटप्पी धोरणाचा शिवाजीला चांगलाच अनुभव आलेला होता. मुळातच विदेशी व्यापाऱ्याविषयी शिवाजीचे मत प्रतिकूल होते. संधी येताच हे विदेशी व्यापारी ताब्यात आलेल्या प्रदेशावर घट्ट पाय रोवून बसतील आणि पुढे कोणत्याही परिस्थितीत हाती आलेले ठाणे सोडणार नाही अशी शिवाजीची धारणा होती. त्यामुळे पोर्तुगिजांवर शिवाजीचा अजिबात विश्वास नव्हता तरीपण प्रसंगी पोर्तुगीजांना चुचकारून ९६ छत्रपती शिवाजी महाराज
त्यांची मदत घेण्याचे राजकारणही शिवाजीला करावे लागत असे आणि म्हणून त्याने पोर्तुगीजांशी उघड शत्रुत्व कधीच स्वीकारले नाही. सुरतेची लूट, स्वराज्यात आणतांना पोर्तुगिजांनी शिवाजीला अप्रत्यक्ष मदत केली. १६६६ मध्ये जेव्हा शिवाजी आग्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आला तेव्हा गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने शिवाजीची तुलना अलेक्झांडर आणि सिझर यांच्याबरोबर केली होती आणि शिवाजीचे मनःपूर्वक अभिनंदन केले होते. वरकरणी मैत्रीचा देखावा चालू असतांना शिवाजीच्या विरोधकांना आश्रय देण्याचे धोरणही पोर्तुगिजांनी आंगिकारले होते. लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू इत्यादींना आश्रय देऊन शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्यास पोर्तुगीज त्यांना उतेजन देत होते. या गोष्टीची शिवाजीला विलक्षण चीड आली होती. शिवाय बारदेश भागातील हिंदूंचे सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्नही पोर्तुगीज करीत होते. त्याचाही शिवाजीला अतिशय राग आलेला होता. म्हणून नोव्हेंबर १६६७ मध्ये शिवाजीने बारदेशवर स्वारी केली. या स्वारीमध्ये मराठ्यांनी बारदेशमधील अनेक गावे लुटली. लखम सावंत, केशव नाईक वगैरे सुरक्षित ठिकाणी पळून गेले. पोर्तुगिजांनी पराभव कबूल करून शिवाजीशी तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंत आणि केशव नाईक यांना पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरविण्यात आले आणि त्याप्रमाणे या दोन्ही देसायांना गोव्याबाहेर हाकलून देण्यात आले. एक धाडसी योजना प्रत्यक्ष गोव्यामध्येच उठाव करून पोर्तुगिजांना धडा शिकविण्याचा शिवाजीने निश्चय केला. नोव्हेंबर १६६८ मध्ये सुमारे चार-पाचशे लोक शिवाजीने गोव्यात पाठवून दिले त्यानंतरही आणखी काही लोक पाठविले. ही संख्या बरीच वाढल्यानंतर या लोकांनी अचानकपणे गोव्यात उठाव करावा आणि पोर्तुगिजांची सत्ता उध्वस्त करावी अशी योजना शिवाजीने आखली होती. परंतु शिवाजीच्या या योजनेचा सुगावा गोव्याच्या व्हाइसरॉयला लागला. त्याने बारकाईने तपास शिवाजीचे लोक शोधून काढले. त्यानंतर शिवाजीच्या वकीलाला भर दरबारात बोलावून त्याची नालस्ती केली आणि त्याला हाकलून दिले. शिवाजीच्या सर्व लोकांनाही गोव्याबाहेर काढून दिले. अशाप्रकारे ही धाडसी योजना फसली. त्यानंतरही प्रत्यक्ष गोव्यावर स्वारी करण्याचा शिवाजीचा मानस होता. परंतु मुघलांबरोबर संघर्ष चालू असल्यामुळे त्याने सबुरीचे धोरण स्वीकारले आणि फेब्रुवारी १६७० मध्ये पोर्तुगिजांशी सलोख्याचा तह केला. सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९७